Wednesday, July 8, 2026

Central Railway : मुसळधार पावसानंतर रेल्वेची शर्यत! लोणावळा–कर्जत मार्गावर १,१०० हून अधिक कामगारांचे युद्धपातळीवर काम; एक रेल्वे मार्ग सुरू

Central Railway : मुसळधार पावसानंतर रेल्वेची शर्यत! लोणावळा–कर्जत मार्गावर १,१०० हून अधिक कामगारांचे युद्धपातळीवर काम; एक रेल्वे मार्ग सुरू

मुंबई : लोणावळा–कर्जत घाट विभागात मुसळधार पावसामुळे झालेल्या दरडी कोसळण्याच्या घटनेनंतर मध्य रेल्वेने रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. १,१०० हून अधिक कामगार, अवजड यंत्रसामग्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सुरू असलेल्या या मोहिमेत ७ जुलै २०२६ रोजी रात्री १०.३० वाजता एक रेल्वे मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. उर्वरित दोन मार्ग पूर्ववत करण्यासाठी अखंड प्रयत्न सुरू आहेत. (Central Railway)

">६ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे लोणावळा–कर्जत घाट विभागातील अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून अनेक गाड्या रद्द करणे, मार्ग बदलणे, शॉर्ट टर्मिनेशन आणि वेळापत्रकात बदल करण्याचे निर्णय घ्यावे लागले. (Central Railway)

दरम्यान, पहिला 'डाऊन' मार्गावरील रेल्वे प्रवास ८ जुलै रोजी मध्यरात्री १२.४५ वाजता गाडी क्रमांक 11013 लोकमान्य टिळक टर्मिनस–कोइम्बतूर एक्सप्रेसने ताशी ३० किमी वेगाच्या मर्यादेसह सुरू केला. त्यानंतर 11041 दादर–साईनगर शिर्डी एक्सप्रेस रात्री १.५७ वाजता मार्गस्थ झाली. 'अप' मार्गावर 12702 हैदराबाद–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हुसैनसागर एक्सप्रेस पहाटे ५.०९ वाजता रवाना करण्यात आली. (Central Railway)

मुसळधार पाऊस, कमी दृश्यमानता आणि वेगवान वाऱ्यांचा सामना करत मध्य रेल्वेचे कर्मचारी घाट विभागात अहोरात्र कार्यरत आहेत. पुनर्स्थापना मोहिमेसाठी १,१०० हून अधिक कामगार तैनात करण्यात आले असून त्यांना रेनकोट, गमबूट आणि इतर सुरक्षा साहित्य पुरवण्यात आले आहे. तसेच त्यांच्या मुक्कामासाठी तंबू, चहा-अल्पोपाहार तसेच नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. (Central Railway)

दरडीचा ढिगारा हटवण्यासाठी आणि रेल्वे मार्ग लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी आधुनिक अवजड यंत्रसामग्रीचा वापर केला जात आहे. यामध्ये बोल्डर स्पेशल रेल्वे, बॅलास्ट रॅक, अत्याधुनिक युनिमॅट आणि डुओमॅटिक ट्रॅक टॅम्पिंग मशीन, ३६० अंश फिरणाऱ्या आठ पोकलेन मशीन आणि १२ जेसीबींचा समावेश आहे. तसेच कामगारांना घटनास्थळी पोहोचवण्यासाठी विशेष रेल्वे गाड्याही चालवण्यात येत आहेत. (Central Railway)

मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित राहून संपूर्ण कामावर बारकाईने लक्ष ठेवत आहेत. रेल्वे सेवा शक्य तितक्या लवकर पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी सर्व यंत्रणा समन्वयाने कार्यरत आहेत. (Central Railway)

प्रवाशांनी गाड्यांच्या अद्ययावत माहितीसाठी रेल्वे हेल्पलाइन किंवा NTES ॲपचा वापर करावा, तसेच मध्य रेल्वेच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरील अपडेट्स पाहावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे. (Central Railway)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >