Saturday, June 13, 2026

Ind Vs Pak Womens T-20 World Cup : भारतीय संघाला सलामीच्या लढतीत पाकिस्तानचे आव्हान; संघात मोठे बदल होण्याची शक्यता

Ind Vs Pak Womens T-20 World Cup : भारतीय संघाला सलामीच्या लढतीत पाकिस्तानचे आव्हान; संघात मोठे बदल होण्याची शक्यता

बर्मिंगहॅम : भारतीय महिला संघ रविवारी(१४ जून)आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. गट १ च्या पहिल्या सामन्यात त्यांची टक्कर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. या जागतिक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतीही स्पर्धात्मक चुरस दिसत नाही. पाकिस्तान विरुद्ध भारताची आधीची कामगिरी चांगली आहे, पण हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघ कोणतीही चूक न करता विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

पाकिस्तानवर भारताचा दबदबा

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 16 टी-२० सामने खेळले गेले आहेत. यात भारतीय महिला संघाने १३ सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानने तीन सामने जिंकले आहेत. टी- २० विश्वचषकाच्या इतिहासातील या दोन्ही संघात आठ सामने झाले आहेत. भारताने सहा वेळा विजय मिळवला आहे, तर पाकिस्तानने केवळ दोनदा वेळा विजय मिळवला आहे. याआधी २०२४ च्या टी-२० विश्वचषकातही भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक सामना झाला होता. या सामन्यात भारतीय महिला संघाने पाकिस्तानवर सहा विकेट्सने दणदणीत विजय मिळवला.(IND VS AFG)

भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध सलामीवीर स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा यांच्याकडून एका भक्कम सुरुवातीची अपेक्षा करत असेल. फेब्रुवारीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८२ धावा केल्यानंतर, मंधानाने पुढील सहा सामन्यांमध्ये १३, १२, ३७, ०, ३२ आणि ८ धावा केल्या. शफालीने जोहान्सबर्गमध्ये ६४ धावा केल्यानंतर, पुढील पाच सामन्यांमध्ये ९, ४, २, २२ आणि ११ धावा केल्या. हरमनप्रीत कौरने दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्ध अर्धशतके झळकावून पुनरागमन केले होते. जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष आणि भारती फुलमाली यांच्यावरही धावा करण्याची जबाबदारी असेल. भारत या सामन्यासाठी भारतीला अंतिम ११ क्रिकेटपटूंमध्ये स्थान देण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली, भारत सलग दुसऱ्या आयसीसी विजेतेपदाच्या शोधात आहे. पाकिस्तानविरुद्धही भारताची कामगिरी उत्कृष्ट आहे आणि ही लय कायम ठेवणे संघासाठी फायदेशीर ठरेल. भारताच्या पहिल्या सामन्यातील विजयामुळे त्यांचे मनोधैर्य वाढेल. भारतीय संघ एका कठीण गटात आहे, ज्यात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेसारखे बलाढ्य संघ आहेत. भारतासाठी दिलासादायक बाब ही आहे की, गेल्या वर्षीच्या एकदिवसीय विश्वचषक विजेत्या संघातील बहुतेक क्रिकेटपटू या टी-२० विश्वचषक संघातही आहेत. भारतीय संघ आपल्या अंतिम ११ क्रिकेटपटूंमध्ये मोठे बदल करण्याची शक्यता कमी आहे.

भारताची संभाव्य प्लेइंग -११

शेफाली वर्मा, स्मृती मंधना, यास्तिका भाटिया, जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, राधा यादव, अरुंधती रेड्डी, श्री चरणी, क्रांती गौड.

Comments
Add Comment