Monday, August 10, 2026

PM Modi : ‘नरेंद्र’ नावाचीच भीती वाटतेय.... पाकिस्तानी बॉक्सरचा किस्सा ऐकून मोदींनाही फुटलं हसू

PM Modi : ‘नरेंद्र’ नावाचीच भीती वाटतेय.... पाकिस्तानी बॉक्सरचा किस्सा ऐकून मोदींनाही फुटलं हसू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले. यावेळी भारतीय बॉक्सर नरेंद्र बेरवाल याने पाकिस्तानच्या बॉक्सरसोबत झालेल्या सामन्याचा एक भन्नाट किस्सा सांगितला. हा किस्सा ऐकताना पंतप्रधान मोदींनाही आपले हसू आवरता आले नाही.

स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे पार पडलेल्या कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी करत देशाची मान उंचावली. भारताने या स्पर्धेत एकूण 39 पदकांची कमाई केली. यामध्ये 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्यपदकांचा समावेश आहे. पदकतालिकेत भारताने चौथे स्थान पटकावले.

या स्पर्धेत नरेंद्र बेरवालने भारतासाठी रौप्यपदक जिंकले. मोदींसोबतच्या संवादादरम्यान त्याने 2015 मधील वर्ल्ड मिलिटरी गेम्समधील एक आठवण सांगितली. नरेंद्र म्हणाला की, त्याचा पहिलाच सामना पाकिस्तानच्या बॉक्सरविरुद्ध होता. मिलिटरी गेम्स असल्याने त्यावेळी अधिकाऱ्यांचे फोन आले होते. “काहीही झालं तरी पाकिस्तानकडून हरायचं नाही,” असा स्पष्ट संदेश त्याला देण्यात आला होता.

नरेंद्रने सांगितले की, त्याने पहिल्याच दोन राऊंडमध्ये सामना जिंकला. मात्र, या चुरशीच्या लढतीत दोन्ही बॉक्सरच्या चेहऱ्यावर कट पडले. त्यामुळे सामना संपल्यानंतर दोघांनाही उपचारासाठी एकाच रुग्णालयात जावे लागले. तिथे टाके घालत असताना पाकिस्तानी बॉक्सरने नरेंद्रला एक मजेशीर प्रश्न विचारला.

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

“एक सांगू का?” असे त्याने विचारले. त्यावर नरेंद्रने होकार दिला. त्यानंतर पाकिस्तानी बॉक्सर म्हणाला, “तुझे नाव नरेंद्र, तुझ्या कोचचे नाव नरेंद्र आणि तुमच्या पंतप्रधानांचे नावही नरेंद्र. मला आता या नरेंद्र नावाचा तिरस्कार वाटू लागलाय!”

हा किस्सा नरेंद्र बेरवालने मोदींसमोर सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला आणि खुद्द पंतप्रधान मोदींनाही हसू आवरता आले नाही. खेळाडूंच्या मेहनतीचे कौतुक करत मोदींनी त्यांच्या अनुभवांवरही संवाद साधला. भारतीय खेळाडूंच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे देशभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >