Wednesday, August 12, 2026

अजिंक्य रहाणेची नवी इनिंग सुरू होणार

अजिंक्य रहाणेची नवी इनिंग सुरू होणार

मुंबई : भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे आता खेळाडू म्हणून नव्हे, तर समालोचकाच्या नव्या भूमिकेत क्रिकेटप्रेमींच्या भेटीला येणार आहे. श्रीलंका दौऱ्यातील भारताच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेदरम्यान रहाणे कसोटी समालोचनाच्या क्षेत्रात पदार्पण करणार आहे. १५ ते २७ ऑगस्टदरम्यान होणारी ही मालिका सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित होणार असून, ‘सोनी लिव्ह’वरही तिचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. (Ajinkya Rahane)

जवळपास १८ वर्षांच्या प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीला नुकताच पूर्णविराम दिल्यानंतर रहाणेने आता आपल्या अनुभवाचा नवा उपयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताकडून ८५ कसोटी सामने खेळलेल्या रहाणेने ५,०७७ धावा केल्या असून, त्यात १२ शतके आणि २६ अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटी क्रिकेटमधील प्रदीर्घ अनुभवामुळे सामन्यातील परिस्थिती, खेळाडूंची रणनीती आणि निर्णायक क्षणांचे विश्लेषण तो प्रभावीपणे करू शकणार आहे. (Cricket)

‘कसोटी क्रिकेट हा क्रिकेटमधील सर्वोच्च प्रकार आहे. अनेक वर्षे या प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व केल्यानंतर आता वेगळ्या दृष्टिकोनातून खेळाकडे पाहण्याची संधी मिळत आहे, याचा आनंद आहे,’ असे रहाणेने म्हटले आहे. मैदानावरील निर्णय, रणनीती आणि सामन्याचा निकाल बदलणाऱ्या क्षणांचे बारकावे चाहत्यांसमोर मांडण्याची उत्सुकता असल्याचेही त्याने सांगितले. (Ajinkya Rahane)

कर्णधार म्हणूनही रहाणेची कारकीर्द उल्लेखनीय राहिली. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने चार कसोटी सामने जिंकले, दोन सामने अनिर्णित राहिले आणि त्याच्या नेतृत्वाखाली भारताचा पराभव झाला नाही. २०२०-२१ च्या बॉर्डर-गावसकर मालिकेतील मेलबर्न कसोटीतील शानदार पुनरागमन आणि ब्रिस्बेनमधील गाबा कसोटीत ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक पराभव हे त्याच्या नेतृत्वातील विशेष क्षण ठरले.

रहाणेने भारतासाठी ९० एकदिवसीय सामन्यांत २,९६२ धावा, तर २० टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत ३७५ धावा केल्या आहेत. तिन्ही प्रकारांत मिळून त्याच्या नावावर १९५ आंतरराष्ट्रीय सामन्यांत ८,४१४ धावा आहेत. इंडियन प्रीमियर लीगमध्येही त्याने ५,३६७ धावा केल्या असून, २०२३ मध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या विजेतेपदाच्या मोहिमेत त्याचा महत्त्वाचा सहभाग होता. आता मैदानावरील अनुभव, नेतृत्वाची शिदोरी आणि कसोटी क्रिकेटची सखोल जाण घेऊन रहाणे समालोचनाच्या नव्या इनिंगला सुरुवात करणार आहे. (Ajinkya Rahane)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >