Monday, May 25, 2026

CM Devendra Fadnavis : नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि पुण्याच्या जागेविषयी शिवसेना-राष्ट्रवादीशी चर्चा सुरू

CM Devendra Fadnavis : नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि पुण्याच्या जागेविषयी शिवसेना-राष्ट्रवादीशी चर्चा सुरू

विधानपरिषद निवडणुकीसंदर्भात एकत्रित बसून मार्ग काढू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी जाहीर झालेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर हालचालींना वेग आला आहे. "विधानपरिषद निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भात महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू आहे. सध्या नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या दोन महत्त्वाच्या जागांवर शिवसेनेसोबत (शिंदे गट) आमची चर्चा सुरू आहे, तर पुण्याच्या जागेबाबत राष्ट्रवादी काँग्रेससोबत (NCP) (अजित पवार गट) वाटाघाटी सुरू आहेत. या जागांवर अद्याप अंतिम तोडगा निघालेला नसला, तरी आम्ही तिन्ही पक्षांचे नेते एकत्रित बसून यातून सन्मानजनक मार्ग काढू," अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे दिली.

'जवाहर बाल भवन'च्या नूतन वस्तूच्या उद्घाटनानंतर (Inauguration) प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी जागावाटपाच्या तिढ्यासोबतच इंधन टंचाई, 'नीट' परीक्षा आणि महागाईच्या मुद्द्यावर सरकारची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, "१९५२ साली तत्कालीन राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या वास्तूचे ७५ वर्षांनंतर अत्यंत सुंदर नूतनीकरण करण्यात आले आहे. लहान मुलांसाठी येथे सर्व अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून, शेजारीच एक 'ओपन सायन्स पार्क' उभारण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना येथे आणून या वातावरणाचा आनंद घेण्याची संधी द्यावी, अशी विनंती मी आयुक्त आणि महापौरांना करणार आहे. महिन्याला १ लाख विद्यार्थ्यांच्या भेटीची व्यवस्था येथे करण्यात आली असून, याबद्दल मी शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे अभिनंदन करतो."

रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातावर शोक व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, आतापर्यंत ३ मृतदेह हाती आले असून उर्वरित मृतदेहांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच 'नीट' (NEET) परीक्षेतील गैरप्रकारावर बोलताना ते म्हणाले, "ज्यांनी या परीक्षेत मिठाचा खडा टाकून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला, त्यांनी विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय केला आहे. केंद्र सरकार आणि परीक्षा प्राधिकरणाने याची गंभीर दखल घेत या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढली असून संबंधितांना अटकही झाली आहे. पुढची नीट परीक्षा अत्यंत पारदर्शक आणि योग्य पद्धतीने पार पडेल, यात कोणालाही गडबड करता येणार नाही."

इंधनाची साठेबाजी खपवून घेणार नाही!

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी (Chief MInister) सांगितले, "जागतिक संकटात (Global Energy Crisis) पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने अनेक देशांनी पेट्रोल-डिझेलची आणीबाणी घोषित केली आहे. अशा स्थितीतही आपण राज्यात सुरळीत पुरवठा करत आहोत. सध्या शेतीचा हंगाम असल्याने शेतकरी डिझेलची मागणी करतात आणि या ऋतूत आपण त्यांना ती सूट देतो. मात्र, शेतकऱ्यांच्या नावाने दुसऱ्या कोणीही इंधनाची साठेबाजी करू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाला कडक उपाययोजनांचे आदेश दिले आहेत," असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

इंधनाची मागणी २० टक्क्यांनी वाढली

  • मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, "मागील वर्षाच्या तुलनेत यंदाही तेवढाच इंधनाचा कोटा उपलब्ध आहे. मात्र, टंचाईच्या भीतीपोटी ग्राहकांकडून अचानक २० टक्क्यांनी मागणी वाढली आहे. पुरवठ्यावर ताण येईल अशी साठेबाजी कोणीही करू नये. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. काही ठिकाणी विनाकारण हिंसा पसरवणाऱ्या प्रवृत्ती दिसत असून, कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत."
  • तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या महागाईच्या टीकेला उत्तर देताना, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात बहुतांश काळ महागाईचा निर्देशांक नीचांकी पातळीवर होता. सध्याच्या जागतिक परिस्थितीमुळे जगात महागाई वाढत असून त्याची थोडी झळ आपल्याला बसत आहे, मात्र त्यावरही मोदीजीच प्रभावी उपाययोजना करत आहेत," असा पलटवार मुख्यमंत्र्यांनी केला.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >