Friday, May 1, 2026

Pandharpur Crime : पंढरपुरात खळबळ! बेपत्ता महिलेचा मृतदेह सापडला; मोबाईल स्टेटस आणि इन्स्टाग्रामच्या धाग्यावरून हत्येचा खळबळजनक उलगडा

Pandharpur Crime : पंढरपुरात खळबळ! बेपत्ता महिलेचा मृतदेह सापडला; मोबाईल स्टेटस आणि इन्स्टाग्रामच्या धाग्यावरून हत्येचा खळबळजनक उलगडा

पंढरपूर : सोशल मीडियाचा अतिवापर एका महिलेच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक आणि खळबळजनक घटना पंढरपूरमध्ये उघडकीस आली आहे. पत्नी सतत इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपवर चॅटिंग करत असल्याच्या रागातून आणि तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीनेच तिची निर्घृण हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण पंढरपूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

असा उलगडला हत्येचा गुंता

पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या नोंदी झाल्या होत्या. यात एक महिला बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती, तर दुसरीकडे एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याची नोंद पोलिसांत झाली होती. सुरुवातीला या दोन वेगवेगळ्या घटना वाटत होत्या. मात्र, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि बेपत्ता झालेली महिला आणि आढळून आलेला मृतदेह एकाच महिलेचा असल्याचे सिद्ध झाले.

सोशल मीडियाने दिली तपासाला दिशा

महिलेला कोणीतरी जाणीवपूर्वक संपवले असावे, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता. मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक तपासावर भर दिला. मृत महिलेचे फेसबुक, इन्स्टाग्राम, आणि व्हॉट्सॲप स्टेटस तसेच मोबाईल ॲक्टिव्हेशनची माहिती पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने मिळवली. या तांत्रिक तपासातून पोलिसांना काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले, ज्यावरून संशयाची सुई थेट महिलेच्या पतीकडे वळली. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी महिलेच्या पतीला ताब्यात घेतले आणि त्याची सखोल चौकशी सुरू केली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या पतीला पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला.

हत्येचे मुख्य कारण

आरोपी पतीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याची पत्नी नेहमी मोबाईलवर व्यस्त असायची. ती सतत व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्रामवर कोणाशीतरी चॅटिंग करत असे. यावरून तिच्या चारित्र्यावर त्याला संशय येऊ लागला होता. या कारणावरून दोघांमध्ये अनेकदा खटकेही उडाले होते. मात्र, पत्नीने चॅटिंग करणे न सोडल्याने पतीच्या मनातील संशय आणि राग अनावर झाला. याच रागाच्या भरात त्याने हे टोकाचे पाऊल उचलत स्वतःच्याच पत्नीची हत्या केली. सध्या पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून, याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई पोलीस करत आहेत. मात्र, सोशल मीडियाच्या आहारी जाण्याने आणि संशयाच्या भुताने एका हसत्याखेळत्या संसाराची राखरांगोळी झाल्याची चर्चा सध्या परिसरात रंगली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >