पुणे : मनसेचा १९ वा वर्धापन दिन पुणे जिल्ह्यात साजरा झाला. यावेळी बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी प्रयागराज येथे १४४ वर्षांनंतर झालेल्या महाकुंभमेळ्यातील पवित्र स्नानाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. ‘देशातील एकही नदी स्वच्छ नाही. परदेशातील नद्या बघा…. गंगा स्वच्छ होणार हे मी राजीव गांधी यांच्यापासून ऐकत आलो आहे…. बाळा नांदगावकर यांनी कुंभमेळ्यातून गंगेचे पाणी माझ्यासाठी आणले होते. मी त्यांना म्हटले, हड मी ते पिणार नाही… या शब्दात राज ठाकरे यांनी पवित्र स्नानाची खिल्ली उडवली.
याआधी वर्धापनदिनाच्या भाषणात बोलताना ‘सोशल मीडियातून टाळकी फिरवण्याचे काम सुरू आहे, एकमेकांमध्ये वाद लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत’, असे राज ठाकरे म्हणाले. राजकारण्यांनी महाराष्ट्रात चिखल केला आहे. राज्यात राजकीय फेरीवाले आले आहेत. पण हे राजकीय फेरीवाले मनसेत नाहीत. यामुळे १९ वर्षात भरपूर अपयश पचवून मनसे हा पक्ष टिकून आहे, असे अभिमानाने राज यांनी सांगितले. संघटना मजबूत करणे गरजेचे आहे. पक्षातील प्रत्येकाचे काम दर १५ दिवसांनंतर तपासले जाणार. कामात जर दिरंगाई केली तर पदावर ठेवणार नाही; असे राज ठाकरे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सुनावले. कामचुकार असलेल्यांना पदावर ठेवणार नाही, असा इशारा राज यांनी दिला. नवी व्यवस्था राबवण्यासाठी ११ मार्च रोजी कामांचे वाटप करणार असल्याचे राज यांनी जाहीर केले.
बीड जिल्हा पुन्हा हादरला, महिला दिनी पोलिसाने महिलेवर केला बलात्कार
‘महिला दिन हाच सर्वात मोठा दिवस आहे. महिला दिन हा जिजाऊंच्या नावाने ओळखला पाहिजे’; असेही राज ठाकरे म्हणाले.
गुढीपाडव्याच्या दिवशी सभा घेणार आणि सगळ्यांवर दांडपट्टा फिरवणार असेही मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जाहीर केले.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या वर्धापनदिनाच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
१) महाराष्ट्र सैनिकांना वर्धापनदिनाच्या शुभेच्छा. मी आज तुम्हाला शुभेच्छा द्यायला आलो आहे. बाकी मला जो दांडपट्टा फिरवायचा आहे तो मी आपल्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात फिरवणार आहे.
२) आज महाराष्ट्रात जे काही सुरु आहे, जो महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे त्यात फक्त मतं, त्यातून सत्ता मिळवणे आणि ही दोन्ही मिळवण्यासाठी तुमची आपापसात भांडणं लागली पाहिजेत, तुम्ही एकमेकांची डोकी फोडली पाहिजेत जेणेकरून तुम्ही विभागलेले रहाल आणि यांना यांचा स्वार्थ साध्य करून घेता येईल यासाठीच सगळं सुरु आहे.
३) कालच जागतिक महिला दिन साजरा झाला. शुभेच्छा दिल्या गेल्या. पण माझ्या मते महिला दिन हा जिजाऊ साहेबांच्या नावाने ओळखला गेला पाहिजे. जिजाऊ साहेब लहान असताना त्यांचे वडील मुघलांकडे चाकरी करत आहेत हे त्यांना पाहवलं नाही, लग्न झाल्यावर आपला पती मुघलांकडे चाकरी करतोय हे त्यांना पाहवलं नाही, त्यांनी आपल्या पतीला बंड करायला लावलं. त्यांच्या मनात स्वराज्य नावाची कल्पना अगदी पहिल्यापासून होती आणि ती कल्पना त्यांनी आपल्या मुलाकडून म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांकडून ती वास्तवात आणून घेतली. या सगळ्याच्या मागे एका स्त्रीची प्रेरणा होती. हे आपण विसरतो. महाराष्ट्राला कर्तृत्ववान स्त्रियांची एक मोठी परंपरा आहे पण हे आपण आज विसरलो आहे.
४) पक्षाला १९ वर्ष पूर्ण झाली. आज असंख्य पक्षांना, प्रश्न पडतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जय पाहिला पराजय पाहिला पण तरी या पक्षातील माणसं एकत्र कशी राहतात ? याला दृष्ट लागू नको दे
५) सध्या जे राजकीय फेरीवाले आलेत की जे आज या फुटपाथवर, कोणी डोळे मारले की त्या फुटपाथवर. असले फेरीवाले मला पक्षात नको आहेत. आपली संघटना आजसुद्धा राज्यभर पसरली आहे त्याची अजून बांधणी करायला हवी. पक्षातील गटाध्यक्षाला त्याच्या घरच्यांना वाटलं पाहिजे की त्याची काळजी पक्षातील लोकं घेत आहेत. त्याच्याशी कोणीतरी बोलतंय. म्हणून पुढच्या २ दिवसांत पक्षातील नेत्यांपासून ते गटाध्यक्षांपर्यंत प्रत्येकाची कामं, त्याची आचारसंहिता हे घेऊन येत आहे. आणि हो माझी आचारसंहिता पण त्यात असणार आहे. दर १५ दिवसाला प्रत्येकाचं काम तपासलं जाणार आहे आणि त्याची यंत्रणा पण लावली आहे. आणि कोणी कामचुकारपणा करत असेल तर त्याला पदावर ठेवणार नाही.
६) मध्यंतरी मुंबईतल्या मेळाव्यात काही पदाधिकारी हजर नव्हते. त्या गैरहजर पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. त्यातल्या काहींनी कारणं सांगितली की कुंभ मेळ्याला गेलो होतो. मी त्यांना म्हणलं इतकी पापं करता कशाला की जी धुवायला गंगेत जावं लागतं. आमचे बाळा नांदगावकर कमंडलूमधून गंगेचं पाणी घेऊन आले. इतक्या लोकांनी अंघोळ केल्यावर गंगा कशी स्वच्छ राहील. असलं पाणी कोण पिणार ? श्रद्धा समजू शकतो पण या देशातील एक नदी स्वच्छ नाही, नदीला आपण माता म्हणतो पण त्या नदीला आपण स्वच्छ ठेवत नाही. राजीव गांधी असल्यापासून गंगा साफ होणार असं ऐकतोय पण पुढे काय झालं ? अंधश्रद्धेतून माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी बाहेर यावं.
७) पुढच्या काही दिवसांत प्रत्येकाला त्याच्या जबाबदाऱ्या दिल्या जातील, त्याचं नीट पालन झालंच पाहिजे. आणि येत्या ३० मार्चला गुढीपाडव्याच्या दिवशी वाजतगाजत गुलाल उधळत शिवतीर्थावर या.