Thursday, June 4, 2026

चेंबूर-जेकब सर्कल मोनोरेल पुन्हा धावणार; सुरक्षा प्रमाणपत्र मिळालं, प्रवाशांची प्रतीक्षा लवकरच संपणार

चेंबूर-जेकब सर्कल मोनोरेल पुन्हा धावणार; सुरक्षा प्रमाणपत्र मिळालं, प्रवाशांची प्रतीक्षा लवकरच संपणार

मुंबई : मुंबईतील चेंबूर ते जेकब सर्कल मोनोरेल (Monorail) मार्गिका पुन्हा सुरू होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या मार्गिकेला मेट्रो रेल सुरक्षा आयुक्तांकडून (CMRS) सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले असून, मोनोरेल सेवा पुन्हा सुरू करण्यासाठीची अंतिम प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे अनेक महिन्यांपासून बंद असलेली मोनोरेल लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.

मोनोरेल प्रकल्पाचे आधुनिकीकरण आणि विविध तांत्रिक सुधारणा पूर्ण झाल्यानंतर सुरक्षा तपासण्या घेण्यात आल्या होत्या. सर्व चाचण्या यशस्वी झाल्यानंतर सुरक्षा प्रमाणपत्र मंजूर करण्यात आले. त्यामुळे मोनोरेलच्या पुनरारंभासाठी आवश्यक असलेली सर्व परवानगी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

मात्र, सध्या राज्यात विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने तातडीने सेवा सुरू करता येणार नाही. आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजेच जूनच्या अखेरीस किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात मोनोरेल पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.

मुंबईतील ही मोनोरेल सेवा सुरुवातीपासूनच विविध कारणांमुळे चर्चेत राहिली आहे. कमी प्रवासी प्रतिसाद, आर्थिक तोटा आणि वारंवार होणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे या प्रकल्पावर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. ऑगस्ट 2025 मध्ये एका दिवसात घडलेल्या दोन गंभीर घटनांनंतर प्रवाशांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली होती. त्यानंतर संपूर्ण प्रणालीची तपासणी आणि सुधारणा करण्यासाठी सप्टेंबर 2025 मध्ये मोनोरेल सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली होती.

गेल्या काही महिन्यांत मार्गिकेवरील तांत्रिक यंत्रणा, गाड्या आणि सुरक्षा प्रणालीचे आधुनिकीकरण करण्यात आले. आता सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्याने मोनोरेल पुन्हा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे चेंबूर, वडाळा, भायखळा आणि जेकब सर्कल परिसरातील प्रवाशांना पुन्हा एकदा पर्यायी आणि जलद सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे.

Comments
Add Comment