बीड : पाटोदा पोलीस ठाण्याचे बीट अमलदार उद्धव गडकर यांनी महिला दिनानिमित्त कार्यक्रमासाठी एका महिलेला बोलावून पाटोदा येथील स्टेट बँकेच्या बाजूला असलेल्या घरात नेले. नंतर या पोलिसानेच महिलेवर बलात्कार केला. या प्रकरणी महिलेने धाडस करुन पाटोदा पोलीस ठाण्यात जाऊन स्वतः पोलीस निरीक्षकांची भेट घेतली आणि बीट अमलदार उद्धव गडकर याच्या विरोधात तक्रार केली.
पीडित महिला मागील काही प्रकरणात पाटोदा पोलीस ठाण्यात ये-जा करत होती. यातून पाटोदा पोलीस ठाण्यातील बीट अमलदार उद्धव गडकर महिलेच्या संपर्कात आले. मोबाईल क्रमांकांची देवाणघेवाण झाली. संभाषण आणि मेसेज सुरू झाले. यातून एक वातावरण निर्माण झाले. या वातावरणाचा गैरफायदा घेत पाटोदा पोलीस ठाण्याचे बीट अमलदार उद्धव गडकर यांनी महिला दिनानिमित्त कार्यक्रमासाठी महिलेला बोलावून घेतले. महिला येताच तिला दिशाभूल करणारी माहिती देऊन एका घरात नेले आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला. महिलेने विरोध करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी तिच्यावर चोरीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आली. यानंतर महिलेवर बलात्कार करण्यात आला.
पोलिसाकडून अन्याय झाल्यामुळे धास्तावलेल्या महिलेने धीर करुन दुपारी पाटोदा पोलीस ठाणे गाठले आणि पोलीस निरीक्षकांना भेटून तक्रार दिली. या प्रकरणी पाटोदा पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत. उद्धव गडकर विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हुनगुडे पाटील यांनी महिलेवर झालेल्या अन्यायाची दखल घेतली आहे. तपास करण्यासाठी पाटोदा पोलीस ठाण्याला आवश्यक ते निर्देश दिले आहेत.