नवी दिल्ली : अविवाहीत असलेल्या पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे नंतर लग्न करायचे. लग्नानंतर संधी साधून सासरच्यांना लुबाडून फरार व्हायचे, या पद्धतीने एका मागून एक तब्बल सहा विवाह केलेल्या तरुणीने सातव्या विवाहाची तयारी सुरू केली होती. या विवाहाआधीच पोलिसांनी तरुणीला अटक केली.
Weather Forecast : उत्तर भारतात गारा पडणार, देशात थंडीचा जोर वाढणार; हवामान विभागाचा अंदाज
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या तरुणीचे नाव पूनम असे आहे. पूनम अविवाहीत असलेल्या पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यासोबत लग्न करत होती. या कटात पूनमसोबत संजना गुप्ता आई म्हणून सहभागी होत होती. विमलेश वर्मा आणि धर्मेंद्र प्रजापती हे दोघे अविवाहीत पुरुषांची माहिती मिळवून ती पूनम आणि संजना यांना पुरवत होते. या माहितीआधारे कट रचून पूनम अविवाहीत असलेल्या पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात ओढत होती. या प्रकरणात पूनम, संजना गुप्ता, विमलेश वर्मा आणि धर्मेंद्र प्रजापती या चौघांना अटक करण्यात आली आहे.
अविवाहीत असलेल्या आणि लग्न करण्यासाठी इच्छुक असलेल्या तरुणांची माहिती मिळवायची. लग्नेच्छुक असलेल्यांपैकी एखाद्या तरुणाला ठरवून जाळ्यात ओढायचे. हळू हळू तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याचा विश्वास संपादन करायचा. लग्न केल्यानंतर संधी साधून घरातील पैसा आणि सोन्याचांदीचे दागिने घेऊन पळ काढायचा, असा प्रकार सुरू होता.
पूनम आणि तिचे सहकारी यांचा कारभार बिनबोभाट सुरू होता. पण सातवे सावज अपेक्षेप्रमाणे जाळ्यात अडकले नाही. उपाध्याय नावाच्या तरुणाला पूनमने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लग्नासाठी उपाध्यायने किमान दीड लाखांचा खर्च करावा यासाठी पूनमचे सहकारी प्रयत्न करत होते. पण संशय आल्यामुळे आयत्यावेळी उपाध्यायने पोलिसांची मदत घेतली. पोलिसांनी चौकशी सुरू केली आणि सगळा प्रकार उघड झाला.