Thursday, June 11, 2026

Nagpur Crime : किरकोळ वादातून दुहेरी हत्याकांड; नागपुरात दोन तरुणांची चाकूने भोसकून हत्या

Nagpur Crime : किरकोळ वादातून दुहेरी हत्याकांड; नागपुरात दोन तरुणांची चाकूने भोसकून हत्या

नागपूर: उपराजधानी नागपुरातील (Nagpur) सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छोटा ताजबाग परिसरात बुधवारी रात्री दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना घडली. फळ विक्रीच्या दरावरून झालेल्या वादातून चार आरोपींनी दोन तरुणांवर धारदार चाकूने हल्ला करत त्यांची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शहरात मोठी खळबळ उडाली आहे. (Nagpur Double Murder)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुण आणि आरोपी हे दोघेही फळ विक्रीचा व्यवसाय करत होते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एका गटाने फळांचे दर कमी ठेवले होते. याच कारणावरून गेल्या काही दिवसांपासून दोन्ही गटांमध्ये वाद सुरू होता. बुधवारी रात्री हा वाद पुन्हा उफाळून आला आणि त्याचे रूपांतर हिंसक संघर्षात झाले. मृतांची ओळख आदित्य भोंडवे (वय 25) आणि आदित्य राहुलकर (वय 23) अशी झाली आहे.

दोन्ही गटांमध्ये जोरदार बाचाबाची आणि शिवीगाळ सुरू असताना चार आरोपींनी अचानक चाकू काढून आदित्य भोंडवे आणि आदित्य राहुलकर यांच्यावर सपासप वार केले. हल्ला इतका भीषण होता की दोघेही रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

हत्येनंतर आरोपींनी तात्काळ घटनास्थळावरून पलायन केले. घटनेची माहिती मिळताच सक्करदरा पोलिसांसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

प्राथमिक तपासात मृत आणि आरोपी दोघांचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्याविरोधात नागपूरमधील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, पोलिसांनी फरार चारही आरोपींची ओळख पटवली असून त्यांना अटक करण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. या दुहेरी हत्याकांडाचा पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment