नवी मुंबई : मुंबई येथे जलद प्रवास होण्यासाठी उरण येथील मोरा या ठिकाणाहून जलवाहतूक (Water Transport) मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र सध्या या जलवाहतूकीचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
मोरा येथील समुद्र किनारी धक्क्यालगत असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे प्रवासी बोटी दुसऱ्या ठिकाणी पोहचण्यासाठी विलंब होत आहे. प्रवासी बोटीमध्ये चाकरमान्यांसह अनेक कर्मचारीही प्रवास करतात. मात्र कर्मचाऱ्यांना वेळेत कार्यालयात पोहोचणे शक्य होत नसल्याने पगार कपातीला सामोरे जावे लागत आहे.
Ind vs Aus 3rd Test : गाबाच्या मैदानात टीम इंडियाला जिंकण्यासाठी २७५ धावांचं आव्हान
दरम्यान, यामुळे प्रवासी त्रस्त असून प्रवाशांकडून जलवाहतुक व औद्योगिक सहकारी संस्था, भाऊचा धक्का, मुंबई यांच्याकडे पत्रव्यवहार करत गाळ काढण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच गाळ अत्याधुनिक पद्धतीने काढल्यास जास्त काळ राहील अन्यथा बंदराची लांबी वाढवावी, जेणे करून प्रवाशांचा थोडा मानसिक त्रास कमी होण्यास मदत होईल, असेही प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे.
जलप्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या समस्या
- मोरा बंदरात चिखल जास्त असल्याने जलवाहतुक व औद्दोगिक सहकारी संस्थेच्या बोटी ४ ते ५ तास बंद असतात आणि ते ही ५ ते ६ दिवस.
- खासगी कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना वेळेवर कामावर पोहचता येत नाही. महिन्यातून ३ ते ४ लेट मार्क लागतात.
- महिन्यातुन दोनदा म्हणजेच आमावस्या व पोर्णिमेला बोटिंचे वेळापत्रक बदलते.
- भाऊच्या धक्यावरून सुटलेल्या बोटी काहीवेळा मोरा बंदरात चिखलात अडकतात, त्यामुळे वेळेवर पोहचणाऱ्या प्रवाशांमध्ये व बोट चालकांमध्ये कधीतरी शाब्दीक वाद विवाद होतात.
- वेळपत्रक चुकल्याने बस, ट्रेन मिळत नाही, जास्त खर्च करून खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो.