Wednesday, May 13, 2026

Mhada : म्हाडा सोडतीसाठी २८ मेपर्यंत अर्ज सादर करण्यास मुदतवाढ

Mhada : म्हाडा सोडतीसाठी २८ मेपर्यंत अर्ज सादर करण्यास मुदतवाढ

मुंबई : म्हाडातर्फे २६४० सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडतीतील कन्नमवार नगर-विक्रोळी (पूर्व) प्रकल्पातील १२२१ सदनिकांपैकी ६१० सदनिका आता केवळ उच्च उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. अधिकाधिक नागरिकांना सोडत प्रक्रियेमध्ये सहभाग घेता यावा यासाठी मंडळातर्फे ऑनलाईन नोंदणी व अर्ज स्वीकृती प्रक्रियेला २८ मे रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत मुदतवाढही देण्यात आली आहे.

मुंबई मंडळातर्फे २६४० सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित सोडतीतील कन्नमवार नगर- विक्रोळी (पूर्व) प्रकल्पातील संकेत क्रमांक ५३८ व ५३९ मधील १२२१ सदनिकांच्या विक्री किंमतीत ७.५ टक्के कपात करण्यात आली. मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार या १२२१ सदनिकांपैकी ६१० सदनिका सोडतीत संकेत क्रमांक ५३८-अ व संकेत क्रमांक ५३९-अ या नवीन संकेत क्रमांकान्वये केवळ उच्च उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. संगणकीय सोडत प्रणालीमध्ये हे बदल १४ मे रोजी दुपारी १२ पासून अद्ययावत करण्यात येणार असल्याचे म्हाडातर्फे सांगण्यात आले आहे.

संकेत क्रमांक ५३८ व संकेत क्रमांक ५३९ मधील सदनिकांच्या विक्री किंमतीत ७.५ टक्के कपातीचा यापूर्वी घेतलेला निर्णय संकेत क्रमांक ५३८-अ आणि संकेत क्रमांक ५३९-अ मधील उच्च उत्पन्न गटातील सदनिकांसाठीही लागू असणार आहे. तसेच या प्रकल्पातील सदनिका धारकांना प्रत्येकी ०१ वाहनतळ (पार्कीग) विनामुल्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. करिता या संधीचा अधिकाधिक इच्छुक अर्जदारांना लाभ घेण्यात यावा याकरिता मंडळातर्फे मुदतवाढ देण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबई मंडळाने जाहीर केलेल्या सुधारीत वेळापत्रकानुसार इच्छुक अर्जदार २९ मे रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अनामत रकमेचा ऑनलाईन भरणा करू शकतील. तसेच दि. २९ मे, २०२६ रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत आरतीजीएस/ एनईएफटीद्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येणार आहे. त्यानंतर सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी १० जून रोजी दुपारी ३ वाजता https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. १२ जून रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दावे-हरकती दाखल करता येणार आहेत. दि.१६ जून, २०२६ रोजी दुपारी ०३.०० वाजता सोडतीसाठी स्विकृत अर्जांची अंतिम यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. मंडळातर्फे सदनिकांच्या विक्रीसाठी प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत दिनांक, ठिकाण व वेळ नंतर संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >