मुंबई: रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या पर्यटनांच्या कामांना गती देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी पर्यटन विभागाने कार्यवाही करावी अशा सूचना पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केल्या.मेघदूत शासकीय निवासस्थान येथे रायगड लोकसभा मतदारसंघातील पर्यटन विभागाच्या कामासंदर्भात आयोजित बैठकीत पर्यटनमंत्री शंभूराज देसाई बोलत होते.यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे,पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक,खासदार सुनिल तटकरे,पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे,महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे यासह रायगड जिल्ह्याचे अधिकारी दृकश्राव्य प्रणालीव्दारे बैठकीला उपस्थित होते.मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की,रायगड जिल्हा पर्यटन दृष्टया अत्यंत महत्वाचा जिल्हा असून जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटनाची कामे गतीने करण्यात यावीत. प्रादेशिक पर्यटन मधील जी प्रलंबित कामे आहेत त्याची सद्यस्थिती काय आहे हे लक्षात घेवून पर्यटन विभागाने वित्त विभागाकडे जिथे निधीची आवश्यकता आहे त्याची मागणी करावी.
पर्यटन विभागाची कामे करण्यासाठी उपलब्ध निधीतून कामांची प्राथमिकता लक्षात घेवून निधी देण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल. व तारांगण निरीक्षण (स्टार गेझिंग)चा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मान्यतेला पाठविण्यात येईल. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे निवासी न्याहारीचे नोंदणीचे कॅम्प आयोजित करण्यासाठी कार्यवाही करावी.स्वदेश दर्शन योजना प्रस्ताव लवकरात लवकर केंद्र शासनाकडे पाठवावा असे निर्देश त्यांनी दिले.महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, कासव संवर्धन, पेशवे स्मारक ही कामे पूर्ण करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे,पर्यटनच्या ज्या कामांना प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे त्या कामांना निधी पर्यटन विभागाकडून देण्यात यावीत.केंद्र शासनाकडे स्वदेश दर्शन योजनेसाठी पर्यटन विभागाने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे पर्यटनाच्या कामांना निधीची मागणी करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात यावा. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे निवासी न्याहारीचे नोंदणीचे कॅम्प आयोजित करावेत.






