राजश्री वटे
नावातच सुगंध आहे… गंधाळलेपण, चिंब भिजण्याचा आभास आहे. मातीच्या ओलेपणातच एक दरवळ आहे! जेव्हा मृगाची पहिली सर तिच्या कुशीत शिरते… तेव्हा पसरतो जो गंध… तो मृदगंध! उंची अत्तराच्या सुवासाला सुद्धा मागे टाकतो तो मृदगंध! सरी येतात तेव्हा सरळ धरणीच्या कुशीत शिरतात… तीही स्वतः मध्ये त्या सामावून घेते… ग्रीष्माच्या काहिलीनंतर तीही पावसाला कवेत घ्यायला आसूसली असते…जसा तो येतो… तीही सुखावते, चिंब भिजते, गंधाळते आणि दरवळत जाते… श्वासाश्वासातून… रानावनातून, चराचरातून… सहनशीलता शिकावी ती मातीकडून… कधी तो थेंब थेंब बरसतो, कधी सरीतून येतो, कधी अक्राळ-विक्राळ कोसळतो… पण ही शांतपणे सगळं सहन करते… तिच्यावर अवलंबून असणाऱ्या मोठमोठ्या वृक्षांना, उंच इमारतींना ती सावरून धरते तिच्या कुशीत… काही निसटून ही जातं… छोट्या छोट्या झुडपांचा हात ती आपल्या हृदयाशी घट्ट धरून ठेवते… त्यांचा वृक्ष होऊन सावरेपर्यंत त्यांना भक्कम आधार देते!
मातीच्या कुशीत धान्य, भाजीपाला, औषधी वनस्पती तयार होते. सुंदर फुलांचं विश्व तयार होतं ते तिच्या कुशीतूनच! फुलांना फुलवते, तिच्या सुकलेल्या पाकळ्यांना पडताना अलगद झेलते व स्वतः मध्ये सामावून घेते. पारिजात फुलतो, बहरतो, दरवळतो आणि घरंगळतो तो मातीवरच… मातीही ती पांढरी केशरी सुगंधी शाल पांघरून सुखावते… काय दरवळ असेल त्या ओल्या मातीचा त्यात भर पारिजातकाची… अहाहा! याला तोड नाही! ही सुद्धा वेगवेगळ्या रंगात मिरवते… कुठे काळी, कुठे लाल, कुठे पांढरी… धान्य पिकवायला काळी माती अग्रेसर, दक्षिणेकडे केळी नारळं लाल माती प्रसिद्ध… सौंदर्य प्रसाधनामध्ये पांढरी माती म्हणजे मुलतानी मातीचा पुढाकार! मनुष्य जीवनाच्या प्रगतीची साथीदार आहे… आमची माती आमची माणसं ! या मातीपासून काय काय घडवता येतं… झोपडीला मातीनं थापून दगड विटांना आधार मिळतो, शेतकऱ्याचं शेत या मातीतच उभं राहतं… सूर्याकडे बघत हसत डोलतं… असा सोनेरी सोहळा पाहत शेतकऱ्यांचं कुटुंब जगत असतं… हाच शेतकरी दुसऱ्यांच्या पोटात दोन घास घालतो ते याच मातीच्या आधाराने!
कुंभार मडके घडवतो… मातीला सुंदर आकार देतो… मातीला कुरवाळतो… त्या स्पर्शातून अप्रतिम कलाकृती साकार होतात… कुंभाराचे हात व माती यांची दोस्ती काय वर्णावी! देवाच्या मूर्ती सुंदर रूप साकारतात कलाकारांच्या हाताने… इतक्या सजीव की जणू प्रत्यक्ष… गणपती दुर्गा यांसारख्या अनेक… मातीपासून तयार होतात… विसर्जनानंतर पुन्हा मातीत मिसळून एकरूप होतात… हे तिचे वाखाणण्यासारखे गुणधर्म! मातीच्या चुली… त्यावर रांधलेलं मातीच्याच भांड्यातलं अन्न… अहाहा… याची चव कशालाच नाही! आपल्या अंगा-खांद्यावर खेळवत कुस्तीगीर तयार करते… लहान मुलांनाही मातीत खेळायला फार आवडते व खायला सुद्धा… पण या मातीची शप्पथ कधी कुठे “माती खाल्ली’’ असं माणसाने वागू नये… कुठल्याही गोष्टीची अतिशयोक्ती म्हणजे “अति तिथे माती’’ होऊ नये याचे धोरण नक्कीच असावे.
या भू मातेची शपथ घेऊन सैनिक देशाच्या सीमेवर लढतात व तिचे रक्षण करतात… मेरी मिट्टी मेरा देश… शेवटी मनुष्य जीवनात श्वास थांबल्यावर मातीतच इहलोकीची यात्रा संपते!
या मातीतच जगायचे…या मातीसाठी जगायचे…या मातीतच संपायचे…हा जगाचा नियम…त्या “काळ्या माय’’ला शतशः प्रणाम! 🙏