Saturday, May 9, 2026

‘अगर मुझसे मुहब्बत है...’

‘अगर मुझसे मुहब्बत है...’

नॉस्टॅल्जिया; श्रीनिवास बेलसरे

प्रियकर-प्रेयसी’ किंवा जुन्या साध्या सरळ भाषेत बोलायचे तर भावी ‘पती-पत्नी’च्या संबंधात गेल्या काही वर्षांत किती बदल झाले आहेत याचा विचार केला, तर आश्चर्याचा धक्काही बसतो आणि खेदही वाटतो. आज शहर असो की खेडे, आधी संभाव्य पतीचे बँक पासबुक पाहून त्याचे मार्केट रेटने ‘व्हॅल्यूएशन’ केले जाते. मग ते मुलगी स्वत: करो की तिचे आई-वडील करोत पण एखादा अपवाद वगळता बहुसंख्य वेळा हे होतेच. शहरात तर अजूनच व्यवहारी हिशोब होतात. आपल्या भावी पतीला मुली स्वत:च स्पष्टपणे विचारतात, ‘उत्पन्न किती, शिल्लक किती, गुंतवणूक किती?’ मोठ्या तथाकथित सुशिक्षित मुली तर काही अटीही घालतात. ‘आई-वडील नकोत, भविष्यात मुले नकोत, उत्तम फ्लॅट हवा, स्वत:ची महागडी गाडी हवी’ इ. इ.! या मुद्द्यांवर दोन्ही बाजूंनी मतैक्य झाले तरच मग आयुष्य एकत्र घालवण्याचे ‘डील’ फायनल होते! अलीकडे तर तेही किती दिवस टिकणार याची अजिबात शास्वती देता येत नाहीच.

मात्र काही दशकांपूर्वी हे असे इतक्या सरसकट आणि नि:संकोचपणे होत नव्हते. लग्नसंबंध जोडताना, प्रतिष्ठा, संस्कार, प्रेम, नातीगोती यांनाही महत्त्व दिले जात असे. प्रेमविवाहात तर खूप मनस्वीपणा असल्याने व्यवहार गौण ठरायचा. अनेकदा प्रेमविवाह हा तत्कालीन समाजव्यवस्थेच्या विरुद्ध केलेले बंडच असायचे. त्याकाळी साहित्यात असो. मनोरंजन विश्वात असो की वास्तवात असो, प्रेमाला, भावुकपणाला थेट तुच्छ मानण्याची प्रथा पडलेली नव्हती. त्यामुळे ‘इमोशनल फूल’ ‘लूजर’ हे पाश्चिमात्य जगाकडून आपण उसने घेतलेले शब्दप्रयोग आजच्याइतके समाजमान्य आणि रूढ झालेले नव्हते. सिनेमा होता १९६४चा लेखक-दिग्दर्शक मोहन कुमार यांचा ‘आपकी परछायिया’. त्याचे अतिशय खरे वाटणारे संवादलेखन होते सरशर सैलानी यांचे, तर संगीतकार होते मदन मोहन! सर्व ६ गाणी राजा मेहंदी अली खान यांनी लिहिली. त्यातले रफीसाहेबांनी गायलेले ‘यही हैं तमन्ना, तेरे दरके सामने मेरी जान जाये’ आणि लतादीदीने गावून अजरामर केलेले ‘अगर मुझसे मुहब्बत हैं...’ खूप लोकप्रिय झाले.

कथा तशी सरळ होती. दीनानाथ चोप्रा (नाझीर हुसैन) मुलगा बलदेवला (सुरेश) डॉक्टर करण्यासाठी आपले घर गहाण टाकतात. त्याचे लग्न रेखा भारद्वाज (शशिकला) नावाच्या श्रीमंत मुलीशी करून देतात. मात्र डॉक्टर झाल्यावर सुनेच्या प्रभावामुळे मुलगा आमूलाग्र बदलतो आणि स्वतंत्र बंगल्यात राहायला जातो. पुढे एका अपघातात दीनानाथजींचे डोळे जातात. धाकटा मुलगा चंद्रमोहन (धर्मेंद्र) नोकरीसाठी बाहेरगावी जातो आणि चोप्रा कुटुंबाची वाताहत होत जाते. धर्मेंद्रची प्रेयसी ‘आशा’ (२ फिल्मफेयर मिळालेली बंगाली अभिनेत्री पद्मश्री सुप्रिया चौधरी) मात्र वेगळी असते. जेव्हा बलदेव घर सोडून जायला निघतो तेव्हा चंद्रमोहन त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या पाया पडून आई-वडिलांना सोडून न जाण्याची विनंती करतो. मात्र बलदेव ऐकत नाही. कुटुंब असे तुटताना बघून धर्मेंद्र अतिशय उदास होतो. दिग्दर्शकाने त्याप्रसंगी त्याला समजावणाऱ्या आशाच्या तोंडी एक सुंदर गाणे दिले होते. राजा मेहंदी अली खान यांच्या लेखणीतून उतरलेले ते भावुक शब्द होते -

‘अगर मुझसे मोहब्बत है, मुझे सब अपने ग़म दे दो. इन आँखोंका हर एक आँसू, मुझे मेरी कसम दे दो.’ जीवलगाकडून भेटवस्तू, दागदागिने, सोनेरूपे मागण्याची प्रथा कुठे आणि कुठे आशाची ही जगावेगळी मागणी! त्याच वर्षीच्या आलेल्या ‘शगुन’मध्येही साहीर लुधियानवीसाहेबांचे असेच एक मनस्वी गाणे होते. अगदी थोड्या वेळा हिंदी सिनेमात दिसलेली अतिसुंदर अभिनेत्री निवेदिता ऊर्फ लिबी राणासाठी ते गायले होते जगजीत कौर यांनी! ‘तुम अपना रंजो-गम, अपनी परेशानी मुझे देदो.’

राजा मेहंदी अली खांसाहेबांनी प्रेयसीचे फार सुंदर चित्र उभे केले होते. ती प्रियकराला म्हणते, ‘जर मी तुझे दु:ख आपलेसे केले, ते शोषून घेऊन तुला दिलासा दिला तरच मला बरे वाटेल. संकोच करू नकोस तुला वेदना देणारी प्रत्येक गोष्ट तू मलाच देऊन टाक - “तुम्हारे ग़मको अपना ग़म बना लू, तो करार आए, तुम्हारा दर्द सीनेमें छूपा लू, तो करार आए, वो हर शय जो, तुम्हे दुःख दे, मुझे मेरे सनम दे दो.” शरीक म्हणजे सहभागी, सामील, जोडीदार. ‘शरीक-ए-जिंदगी’ म्हणजे आयुष्यभराचा जोडीदार. ती म्हणते, ‘तू मला आयुष्यभर साथ देणार आहेस ना? मला तुझ्या आयुष्यात भागीदार करतो आहेस ना, मग तुझ्या दु:खातही मला सहभागी का करून घेत नाहीस? आपण मनमोकळेपणे दु:ख कुणाला नुसते सांगितले तरी ते कमी होते. प्रिया, तुझ्या मनाची तडफड मला बघवत नाही, ती मला देऊन टाक ना. ‘शरीक-ए-जिन्दगीको क्यों, शरीक-ए-गम नहीं करते, दुखोंको बाटकर क्यों, इन दुखोंको कम नहीं करते, तड़प इस दिलकी थोड़ीसी, मुझे मेरे सनम दे दो.’

आशा विनवते, ‘आता आपण एक निर्णय घेऊ या. तुझी सर्व दु:खे तू मला देऊन टाक आणि आपण तुझे अश्रू कायमचे पुसून टाकू. तू नेहमी आनंदात असावे यातच माझा आनंद आहे. इथून पुढे तू कधीही दु:ख करायचे नाहीस, ते सर्व मला देऊन टाकायचे आहे. अर्थात जर तुझे माझ्यावर खरे प्रेम असेल तरच! तू जर मला तुझ्या दु:खात सहभागी करून घेणार नसशील, तर मी समजेन की तुझे माझ्यावर खरे प्रेम नाही. ‘इन आँखोंमें ना अब मुझको कभी आँसू नजर आए, सदा हँसती रहे आँखे, सदा ये होंठ मुसकाये, मुझे अपनी सभी आहे, सभी दर्द-ओ-आलम दे दो. अगर मुझसे मुहब्बत हैं...’ जुन्या प्रेमकथातील प्रेमिकांच्या आयुष्यभर पुरणाऱ्या, प्रामाणिक प्रेमाने ओथंबलेल्या, आश्वासक अशा जगावेगळ्या मागण्या कुठे आणि कुठे आजचा उघडवाघडा चंगळवादी व्यवहार!

काल्पनिक का असेना पण मनाला थोडा दिलासा मिळावा म्हणून ही अशी नॉस्टॅल्जिक गाणी अधूनमधून ऐकायची आणि मानवी संबंधातील त्या सुखद काळाचा अनुभव घ्यायचा, त्यासाठीच तर हा ‘नॉस्टॅल्जिया’!

Comments
Add Comment