Saturday, May 9, 2026

नातं माय-लेकीचं

नातं माय-लेकीचं

मातृदिन; प्रसाद कुळकर्णी

लेकीच्या लहानपणापासून ते अगदी शिकून सवरून तिला नोकरी लागल्यावरही, तिची काळजी, तिच्या सूचना संपत नाहीत. घरातून निघताना, “हे घेतलंस का? ते घेतलंस का?” “पोहोचल्यावर एक मेसेज कर गं...” “...आणि जेवून घेत जा वेळेवर... कामापुढे भूक मारू नकोस.” “पाण्याची बाटली फक्त पर्समध्ये नको ठेवूस, मधून मधून पाणी पितंही जा अगं...” “संध्याकाळी ऑफिसमधून निघालीस की एक मेसेज कर आठवणीने...,” इथपसून, “काय गं हे कपडे घातलेयस....?” “कशी जातेयस? कॅब की मेट्रोने....? कॅबने जात असशील तर कॅबचा नंबर मला पाठव व्हाॅट्सअॅपवर आणि सांभाळून गं...”

हुश्श ! हुश्श ! हुश्श ! तिच्या सूचना आणि सल्ले संपतच नाहीत. आज मोठी झालेली लेक आपलं सगळं आवरून निघण्याच्या आणि ऑफिसमध्ये वेळेवर पोहोचण्याच्या गडबडीत असते. आईच्या सततच्या सूचनांनी अनेकदा ती वैतागते, चिडचिडी होते आणि अखेर म्हणते, “आई, पुरे ना! मी आता लहान आहे का गं? तेव्हा ठीक होतं, पण आता मलाही समजतं ना गं...” तरीही त्यावर ती म्हणते, “हो गं ! माहितीय मोठी झालीयस ते, पण माझ्यासाठी लहानच आहेस आणि मला आपली काळजी वाटते...” “मी गेल्यावर कोणी नाही हो विचारत बसणार...” “आणि माझी काळजी तुला आज नाही कळणार बरं, तुझं लग्न होऊन तुला मूल झालं ना, की मग कळेल त्यातला अर्थ...” लेकीचं तोंड बंद करण्याचं हे अमोघ अस्त्र असतं. लेक तिचा हात पकडून म्हणते, “आई काय गं, आता सकाळी सकाळी कसल्या गोष्टी करतेस...?”

“आणि मी सासरी गेल्यावर काय करणार तू? की तिथेही रोज फोनवर सूचना देणार...?” “पुरे तुझं, तेव्हा बाई तुलाच सगळं लक्षात ठेवावं लागणार, पण जोपर्यंत इकडे आहेस ना तोपर्यंत माझं आपलं असंच सुरू राहणार बाई...तू काहीही म्हण...” या सूचना, सल्ल्यांच्या मागे काय असतं? तर निव्वळ निःस्वार्थ काळजी, माया. आज काय जेवलीस? या प्रश्नामागे दडलेला अर्थ असतो, जेवलीय की नाही... निघालीस का ऑफिसमधून? हा मेसेज, किती वाजता निघालीय हे कळल्यावर, घरी साधारण कधी पोहोचेल याचा अंदाज बांधण्यासाठी असतो. यामागे संशय नाही तर काळजी अधिक असते.

काय गंमत असते पाहा, सतत मायेने आस्थेने विचारणाऱ्या सूचना देणाऱ्या, काळजी करणाऱ्या जन्मदात्रीचा कधी लेकीला राग येतो, चिडचिड होते, कंटाळा येतो आणि ती वैतागून ताडकन बोलते. मायच्या डोळ्यांत टच् कन पाणी येतं, पण ते लेकीला जाणवू न देता ती मान फिरवून आत वळते आणि सूचनांचा स्वर फक्त थोडा कमी करते. बाहेर पडल्यावर काही वेळाने लेकीलाही आपण फारच तोडून बोलल्याचं जाणवतं आणि कॅब, मेट्रोमध्ये जरा रिलॅक्स झाल्यावर सॉरी म्हणायला ती फोनही करते. लेकीनेच फोन केलाय म्हटल्यावर ये रे माझ्या मागल्या, सूचना पुन्हा एकदा सुरू होतात. फोन ठेऊन विचार करू लागल्यावर लहानपणापासूनच्या अनेक आठवणी जाग्या होतात. दिवसभर कामाने दमलेल्या आईचा विचार न करता, पानात वाढलेल्या भाजीकडे पाहून वाकडं तोंड करत, “ही कशाला केलीस भाजी? मला अज्जीबात आवडत नाही म्हणून तू मुद्दाम करतेस ना...?” “अमुक भाजी कर ना गं...”

आई त्यावेळी चिडते पण आपला थकवा बाजूला ठेवून रात्रीच्या जेवणात लेकीने सांगितलेली भाजी ताटात हजर असते. आवडीची भाजी पाहून आनंदलेल्या लेकीचा चेहरा, तिचा सगळा थकवा दूर करतो आणि अचानक लेक कुणाच्या प्रेमात पडते, तिचं लग्न होतं. सासरी सकाळची गडबड, ऑफिसला निघण्याची धावपळ, ब्रेकफास्ट, नवऱ्याचा टिफिन, आवराआवर करून आणि ब्रेकफास्ट skip करत निघताना, तिला आईची खूप आठवण येते,“खाल्लंस का गं काही? उपाशीपोटी जाऊ नये गं आणि घेतलंस का सगळं? आणि पाण्याची बाटली घेतलीस का? नीट जा आणि... पोहोचल्यावर...” या सूचना, चौकशा तिला आज खूप हव्याहव्याशा वाटू लागतात. एकदा ऑफिसमध्ये शिरून कामाला भिडलं की हळूहळू त्या विरून जातात. तसंही तुमच्या वैयक्तिक प्रश्न, आठवणी यांच्याशी, कॉर्पोरेट क्षेत्रात कुणालाही काही देणं-घेणं नसतं.

दिवसभर अनेक कॉफी कपासोबत meetings, discussions, presentations करून खूप थकवा आलेला असतो, पोटात भुकेने कालवाकालव होत असते आणि फोन येतो, “निघालीस का गं सोनू...?” (तिचं असंच एखादं लेकीला हाक मारायचं लाडकं नाव) “नाही अजून, आहे थोडा वेळ....” “मग काही खाल्लंयस तरी का...?” लेकीच्या गप्प बसण्याचा अर्थ ती समजून जाते. “काहीतरी खाऊन घे, मग जोर येईल बघ कामाला....मी नाही वेळ घेत तुझा, पण आधी खाऊन घे, आणि सांभाळून जा गं...” खूप खूप बरं आणि तरतरीत वाटतं तिला त्या हव्याहव्याशा झालेल्या निरपेक्ष चौकशीने... या सगळ्या प्रश्नांमागचा, सूचनांमागचा, शिस्तीमागचा अर्थ त्यामधली कळकळ, माया जाणवू लागते ती, आई या जगातून गेल्यावर. माहेरी असताना सकाळी घाईघाईने कॉलेजला निघण्याच्या गडबडीत तिचा आवाज यायचा, “देवाला नमस्कार केलास का? मिनिटभर हात जोडलेस तर झिजणार नाहीत ते...” “जरा लवकर उठलीस, तर सगळं व्यवस्थित होईल आणि वेळेवर निघता येईल, पण उठवायला गेलं की, पाच मिनिटं गं, पाच मिनिटं गं म्हणत झोपून राहायचं आणि उशीर झाला म्हणून कसंही पळत सुटायचं...”

हे सगळं सगळं आज आठवत राहातं, ती चौकशी, तो अधिकार, ती प्रेमळ दटावणी आज खूप हवीहवीशी वाटू लागते, पण डोळ्यांत साठलेल्या काळजीने, शब्दातल्या मायेने आणि स्पर्शातल्या प्रेमाने सूचना देणारी जन्मदात्री, या जगातून कधीच गेलेली असते. आई झालेली लेक, आज आपल्या लेकीला नकळत याच सूचना देऊ लागते, स्वरात काळजी उमटू लागते आणि, “तू आई झालीस की कळेल माझ्या सततच्या बोलण्यातला अर्थ” हे आपल्या आईने अनेकदा उच्चारलेलं वाक्य आज सर्वार्थाने उमजू लागतं आणि बहिणाबाईंच्या एका कवितेतलं कडवं मनात उमटू लागतं, दे रे दे रे योग्या ध्यान, ऐक काय मी सांगते. लेकीच्या माहेरासाठी, माय सासरी नांदते.

Comments
Add Comment