Thursday, July 4, 2024

सप्तर्षी

कथा – प्रा. देवबा पाटील

परीताईने आज आल्यावर यशश्रीला सांगितले की, “यशश्री, आज तू माझ्यासाठी गवती चहा टाकूनच चहा कर.”
“हो ताई.” असे म्हणत, यशश्रीने अंगणातील गवती चहाची दोन-तीन पाने खुडून आणली व मस्तपैकी चहा केला. चहा झाल्यावर, “आकाशात ध्रुव तारा उत्तरेलाच का आहे परीताई?” यशश्रीने प्रश्न केला.

“शास्त्रज्ञांनी खूप विचारपूर्वक दिशांना नावे दिली आहेत. जसे “सूर्य उगवतो पूर्वेस। मावळतो पश्चिमेस। दक्षिण दिशा उजवीकडे। उत्तर पाहू डावीकडे। म्हणजे सूर्योदयाची दिशा पूर्व, तर सूर्यास्ताची दिशा पश्चिम. सूर्याकडे तोंड करून उभे राहिल्यास, उजव्या हाताची दिशा दक्षिण, तर डाव्या हाताकडील दिशा उत्तर असते. पृथ्वीच्या वरच्या टोकाला पृथ्वीचा उत्तर ध्रुव, तर खालच्या टोकाला पृथ्वीचा दक्षिण ध्रुव म्हणतात. त्यानुसार आकाशातील ध्रुव हा उत्तर दिशेला आहे. म्हणजे पृथ्वीच्या उत्तर दिशेला वर आकाशात जो एक स्थिर तारा दिसतो, त्याला उत्तर ‘ध्रुव तारा’ म्हणतात. ध्रुवमत्स्य तारकापुंजाच्या शेपटीतील सर्वात शेवटचा तारा हा ध्रुव तारा आहे. हा आकाशाच्या उत्तर बाजूस असलेला एक स्थिर तारा आहे. बाकीचे तारे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात असलेले दिसतात,” परी उत्तरली.

“पण सात ता­ऱ्यांचे सप्तर्षी असतात, असे मी ऐकले आहे,” यशश्री म्हणाली.
“बरोबर आहे ते.” परी सांगू लागली, “आकाशातील ध्रुवमत्स्याव्यतिरिक्त दुस­ऱ्या आणखी सात ता­ऱ्यांच्या एका तारका समूहाला ‘सप्तर्षी’ असे म्हणतात. या सात ता­ऱ्यांपैकी समोरचे चार तारे हे खाटेच्या चार कोप­ऱ्यांवरील चार खुंटांप्रमाणे व मागचे तीन तारे पुन्हा त्या खाटेच्या मागे शेपटीसारखे दिसतात. सात ता­रे मिळून प्रश्नचिन्हासारखा आकारही तयार होतो. या सप्तर्षीच्या खाटेच्या समोरच्या दोन ता­ऱ्यांमधून एक सरळ काल्पनिक रेषा काढली व ती उत्तर दिशेकडे वाढवली, तर ती त्या दोन ता­ऱ्यांतील अंतराच्या अंदाजे पाच पट अंतरावरील ज्या ता­ऱ्याला टेकते, तो तारा म्हणजे ध्रुवमत्स्याच्या शेपटीतील शेवटचा तारा अर्थात ‘ध्रुव तारा’ होय. या ध्रुवाभोवती सप्तर्षी हे गोल फिरत असतात. विशेष म्हणजे आपण ज्या ध्रुव ताऱ्याला स्थिर समजतो, तोही स्थिर नसून त्यालाही विशिष्टशी, किंचितशी गती आहेच; पण त्याचे अंतर आपणापासून अत्यंत दूर असल्याने, त्याची गती आपल्या लक्षात येत नाही.”

“आकाशातील तारे जागा सोडत नाहीत. मग सप्तर्षी ध्रुवाभोवती कसे फिरताना दिसतात?” यशश्रीने माहिती विचारली.
“तारे जरी आपली जागा कधीच सोडत नाहीत; परंतु आपली पृथ्वी मात्र तिच्या आसाभोवती फिरत असते. पृथ्वीचा आस ही एक स्थिर रेषा आहे. या रेषेवर आकाशात दूरवर पाहिले असता, ध्रुव तारा नेमका त्या रेषेवरच आहे, असे दिसते. आसावरच असल्यामुळे पृथ्वीवरून ध्रुव तारा नेहमी स्थिर दिसतो. पृथ्वी ही तिच्या आसाभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते. त्यामुळे आपणास तारे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात असल्याचा भास होतो. सप्तर्षी ध्रुवापासून जवळ असल्यामुळेच ते ध्रुवाभोवती फेरी घालतात, असा आपणास भास होतो,” परीने सांगितले.

“जर सारे तारका समूह आपल्या दोन्ही ग्रहांवरून सारखेच दिसतात, तर मग या आकाशातील तारक समूहावरून रात्री उत्तर दिशा कशी ओळखतात?” यशश्रीने माहिती विचारली.

परी म्हणाली, “सप्तर्षी ध्रुव ता­ऱ्याभोवती गोलाकर फिरतात. त्यामुळे आकाशात सप्तर्षी कोठेही असले, तरी समोरच्या दोन ताऱ्यांना जोडणारी रेषा पुढे वाढविल्यावर, ती ध्रुव ता­ऱ्यालाच मिळते. अशा रीतीने आपणास आकाशातील ध्रुव ता­ऱ्याचे स्थान कळते आणि ध्रुव तारा हा उत्तर दिशेलाच असतो, हे आपणा सर्वांना माहीतच आहे. आकाशात ज्या ठिकाणी हा उत्तर ध्रुव दिसतो, त्याच्याबरोबर खाली पृथ्वीच्या क्षितिजावर उत्तर दिशा असते.” “आकाशातील तारकासमूहावरून रात्री दक्षिण दिशा कशी ओळखतात?” यशश्रीने प्रश्न विचारला.

परी सांगू लागली, “दक्षिण गोलार्धात सहसा सप्तर्षी काही दिसत नाहीत. या भागात व उत्तर गोलार्धाच्या काही भागांत त्रिशंकू हा ४ मुख्य ता­ऱ्यांचा दक्षिण दिशादर्शक तारकासमूह दिसतो. त्रिशंकूची एक बाजू लांब असते. ही लांब बाजू एका काल्पनिक रेषेने क्षितिजाच्या दिशेने वाढवून तिप्पट लांब केली की, त्या बाजूला दक्षिण ध्रुवाची जागा आहे. त्रिशंकूच्या दक्षिणेला आणखी दोन तारे आहेत. त्यांना जोडणा­ऱ्या रेषेच्या मध्यबिंदूतून एक लंब काढला, तर तो त्रिशंकूच्या काल्पनिक रेषेला छेदतो. ज्या ठिकाणी हा छेद होतो, त्या ठिकाणी दक्षिण ध्रुव बिंदू असतो. उत्तर ध्रुवासारखा दक्षिण ध्रुवाचा तारा नसतो.”

“यशश्री तुझ्या हातचा गवती चहाही खूपच छान झाला होता बरं का! उद्यापासून तू मला असाच चहा देत जा,” असे म्हणत परीने यशश्रीचा निरोप घेतला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -