Friday, July 19, 2024

परग्रह

आपल्या सूर्यमालेबाहेरच्या दुसऱ्या ताऱ्याच्या ग्रहमालिकेतील ग्रहांना परग्रह म्हणतात. प्रत्येक ग्रहावरचे भौगोलिक, भौतिक व आसमंतीय पर्यावरण हे वेगवेगळे असते. त्यामुळे एखाद्या ग्रहावर सजीव असलेही तरी ते तेथील वातावरणानुसार वेगळेच असणार, असे शास्त्रज्ञ म्हणतात.

कथा – प्रा. देवबा पाटील

यशश्री ही आठव्या वर्गात शिकणारी मुलगी होती. तिची स्मरणशक्ती बघून तिची जिज्ञासापूर्ती करण्यासाठी तिचे वडील आनंदरावांनी वेगवेगळे माहितीवर्धक रंगीत तक्ते आणून घरात लावलेत. आनंदराव जरी दिवसभर शेतात असायचे तरी तिची आई तिला त्या तक्त्यांवरून सारे काही समजावून सांगायची, शिकवायची. तिला समजले का नाही हे तक्त्यांसोबत दिलेल्या विविध बौद्धिक कसोट्यांद्वारे पडताळून पाहायची. तिच्या तोंडून बऱ्याच गोष्टी वदवून घ्यायची. त्याने आधीच तल्लख बुद्धिमत्ता लाभलेल्या यशश्रीची बुद्धी अशी दिवसेंदिवस अतिशय कुशाग्र होत होती.

त्या दिवशीही रात्री ते बापलेक घराच्या गच्चीवर बसलेले असताना तिने आपल्या प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.
“बाबा, आकाशातील सारे तारे तर आपणास पृथ्वीवरून सारखेच लांब दिसतात.” यशश्रीने तिच्या नेहमीच्या निरीक्षणानुसार योग्य प्रश्न विचारला.

“बेटा, ते आपणास पृथ्वीवरून जरी सारख्याच अंतरावर दिसतात तरी त्यांचे अंतर आपल्यापासून वेगवेगळे आहे. पण त्यांचे आपापसातील अंतर मात्र ठरावीक असते. म्हणजेच ते विशिष्ट नियमांनी बद्ध आहेत. त्यांचे आकारसुद्धा वेगवेगळे नि लहान-मोठे आहेत. तसेच त्यांचे रंगही किंचितसे निरनिराळे आहेत नि त्यांचा तेजस्वीपणाही वेगवेगळा आहे.”
बाबा पुढे सांगू लागले, “ताई, तू विश्वातील सजीवांबद्दल विचारले, तर शास्त्रज्ञ या विश्वात सजीवांचा शोध घेत आहेत; परंतु अजून तरी तसा काही मागमूस त्यांना आढळला नाही; परंतु त्यांच्या मते या विश्वात असंख्य आकाशगंगा आहेत. प्रत्येक आकाशगंगेमध्ये अब्जावधी तारे आहेत. त्या प्रत्येक ताऱ्याला त्यांच्या स्वतंत्र वेगवेगळ्या ग्रहमालिका आहेत. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या तरी एखाद्या ताऱ्याला सूर्यासारखी ग्रहमालिका असू शकते. अशा एखाद्या कोणत्या ना कोणत्या परग्रहावर…

“बाबा परग्रह म्हणजे दुसरे ग्रह का?” यशश्री बाबांचे वाक्य तोडत मध्येच बोलली, “त्यांची तर पूर्ण माहिती आपल्या शास्त्रज्ञांनी आता काढली आहे. तेथे सजीवच नाहीत.”

“आपल्या सूर्यमालेबाहेरच्या दुसऱ्या ताऱ्याच्या ग्रहमालिकेतील ग्रहांना परग्रह म्हणतात, तर सूर्यासारख्या दुसऱ्या एखाद्या ग्रहमालिकेतील एखाद्या ग्रहावर पृथ्वीसारखे सजीवांना अनुकूल वातावरण असू शकते व तेथे नक्कीच सजीवांची वस्ती असावी, असा शास्त्रज्ञांचा कयास आहे.” बाबांनी सांगितले.

“बाबा, ते असले तर कसे दिसत असतील? आपल्यासारखेच बायामाणसेही तेथे असतील का वेगळे असतील? तेथील प्राणी, पक्षी आपल्या पशूपक्ष्यांसारखेच असतील का तेही निरनिराळे असतील? तेथील पाखरे, फुलपाखरे असेच मस्त उडत असतील का? तेथील वनस्पती, झाडेझुडपे कसे असतील? तेही आपल्या पृथ्वीवरील तरूवेलींसारखे हिरवे असतील का वेगवेगळ्या रंगाचे असतील?” तिने विचारले.

“ते तर आपण काहीच सांगू शकत नाही बाळा. पण आपल्यासारखे प्राणी तेथे नसतील, तर आपणाहून थोड्याफार वेगळ्या प्रकारचे असतील, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.” आनंदराव म्हणाले.
“असे का हो बाबा?” यशश्रीने विचारले.

“कारण प्रत्येक ग्रहावरचे भौगोलिक, भौतिक व आसमंतीय पर्यावरण हे वेगवेगळे असते. त्यामुळे एखाद्या ग्रहावर सजीव असलेही तरी ते तेथील वातावरणानुसार वेगळेच असणार असे शास्त्रज्ञ म्हणतात.” त्यांनी सांगितले.

अशीच त्यांची चर्चा चालू असतानाच एक उल्कापात झाल्याचे तिला दिसले. ते बघून “बाबा, बाबा! बघा तो तारा कसा तुटला आहे,” असे म्हणत ती पुढे म्हणाली, “बाबा, कसा काय तुटला असेल हो तो तारा?”

“बेटा, मी तुझ्यासाठी कालच प्रा. देवबा शिवाजी पाटील यांचे “आकाशाचे गूढ” हे पुस्तक विकत आणलेले आहे. काल मी शहरातून आपल्या गावी येताना बसमध्ये ते पुस्तक पूर्ण वाचले. खूप छान माहितीवर्धक पुस्तक आहे ते. कामाच्या गडबडीत मी ते पुस्तक तुला द्यायचे विसरलो व आईलाही सांगायचे विसरलो. चल, आता आपण खाली जाऊ. तुला मी त्या पुस्तकावरून सारे काही समजावून सांगतो,” आनंदराव म्हणाले व दोघे बापबेटे खाली आले.

आनंदरावांनी घरात गेल्यावर ते पुस्तक त्यांच्या कपाटातून काढून तिच्या हाती दिले. पुस्तक बघून यशश्री खूप खूश झाली व म्हणाली, “बाबा, आज मी हे पुस्तक लक्षपूर्वक वाचते व मला जे समजले नाही ते तुम्हाला उद्या विचारते. उद्या तुम्ही मला त्यातील माहिती स्पष्टीकरणासह समजावून सांगा.”

“ताई, ते पुस्तकच इतके सोप्या भाषेत लिहिले आहे की, ते वाचून तुला सारे काही व्यवस्थित समजेल. त्यात साऱ्या वैज्ञानिक संकल्पना सरळ सरळ सोप्या व्याख्यांसह समजावून सांगितल्या आहेत. तुला काहीच अडचण जाणवणार नाही. तरीपण तुला एखादी गोष्ट समजली नाहीच, तर मी तुला उद्या आनंदाने ते समजावून सांगेल,” आनंदराव म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -