Saturday, May 9, 2026

दरड काय असते?

दरड काय असते?

विज्ञानकथा; प्रा. देवबा पाटील

शिवम या मुलाची त्याच्या मित्रांना माहिती देणे सुरू होते.“सेंद्रिय खडक कसे असतात?” विपुलने प्रश्न केला.शिवमने उत्तर दिले, “पृथ्वीवरील मृत प्राणी व वनस्पती यांच्या अवशेषांपासून माती-रेतीत तयार झालेल्या खडकांना सेंद्रिय खडक म्हणतात.”“बरे दरड म्हणजे काय असते व ती कशी काय कोसळते?” अमोलने विचारले.

शिवम सांगू लागला,“दरड म्हणजे डोंगराचा उंच कडा. भरपूर पाऊस पडला म्हणजे खडकांत पाणी मुरून ते खूप जड होतात. अशा खडकांच्या खाली जर मऊ, नरम मातीचे थर असतील तर ती माती पाण्यामुळे ओली होऊन निसरडी बनते.

अशावेळी खडकांच्या खालील आधार कमकुवत झाल्याने ते घसरून खाली येतात. कधी कधी एखाद्या मोठ्या टेकडीच्या खालचाही आधार अशा रीतीने सैल झाल्याने ती पूर्ण टेकडीच घसरून खाली येते. एखादेवेळी डोंगराचा कडाही असाच घसरतो. त्यालाच दरड कोसळली असे म्हणतात. अशा दरडीखाली ब­ऱ्याचदा गुरेढोरे व झोपड्या गडप होतात, जीवितहानी होते. दरड रस्त्यावर कोसळल्यास रस्ता बंद होतो व त्या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे थांबते.” “आपल्या पृथ्वीवर वेगवेगळे खंड कसे निर्माण झालेत?” कैवल्यने विचारणा केली.

“पृथ्वी थंडावतांना हळूहळू गोठत घन होत गेली. गोठताना, काही ठिकाणी भेगाळली. तिच्यावर भेगा पडल्याने ती काही भागांमध्ये विभाजित झाली. अशा रीतीने सात खंडांची निर्मिती झाली. हे खंड थोडे थोडे सरकत गेले. त्यांमधील भेगा वाढत गेल्या. त्या भेगांचे विशाल खळगे झाले. खळग्यांत मग नद्यांचे व पावसाचे पाणी साचले नि त्यांचे विशाल समुद्र बनले. अशी ही सप्तखंडांची निर्मिती प्रक्रिया आहे. सांगा बरे खंडांची नावे कुणाला माहीत आहे तर?” शिवमने सहज विचारले. “सांगतो यार, पण आता खरोखरच सा­यांना जाम भूक लागली आहे. त्यामुळे मला वाटते आता आपण डबे खायला काहीच हरकत नाही.” विपुलने म्हटले. “हो गड्या, आता आपण डबे खाता खाता गप्पा करू.” “बरोबर, तसेही जेवतांना आपण काही गुपचूप जेवणार नाही. आपली प्रश्नाेत्तरे सुरूच ठेवू.” विशालनेही त्याला अनुमोदन दिले.

“ठीक आहे.” असे म्हणत शिवम उठला. त्याने मंदिराच्या आवारात शोभेसाठी लावलेल्या एका केळीच्या झाडाचे एक मोठे पान जवळील चाकूने तोडले. सा­यांनी आपापले डबे बॅग्जमधून बाहेर काढलेत. त्या पानावर प्रत्येकाने आपापले पदार्थ ठेवले. एकदोघांनी त्यांचे मस्तपैकी छोटे छोटे भाग केलेत व सा­यांनी सारखे वाटून घेतले. नंतर पोळ्यांचेही तुकडे करून ते मिसळून पुन्हा सगळ्यांना सारखे वाटलेत. सर्वप्रकारच्या भाज्या थोड्या थोड्या वेगवेगळ्या घेतल्यात. विशेष म्हणजे शिवमने एक पात्र जास्तीचे तयार केले होते. ते त्याने त्यांच्याजवळच बसलेल्या यात्रेकरू काकांना दिले. ते सुद्धा आनंदाने त्यांच्या सहभोजनात सहभागी झालेत.

Comments
Add Comment