कथा; रमेश तांबे
एका गोठ्यात गाय आणि तिचं वासरू राहायचं. सकाळचे ९ वाजले की, त्यांचा शेतकरी त्या दोघांना रानात चरायला घेऊन जायचा. सकाळी सोडायचा आणि संध्याकाळी परत आणायला जायचा. रानात जायचं म्हटलं की, वासराला खूपच आनंद व्हायचा. तो हंबरायचा, जागेवरच उड्या मारायचा, आपल्या आईला ढुश्या मारायचा. शेतकरी जवळ आल्यावर तर वासराची गोठ्यातून बाहेर पडण्यासाठी खूपच धडपड चालायची. गळ्यातली दोरी सोडेपर्यंत वासरू शेतकऱ्याला चाटत बसायचे.
एकदा का ते रानात पोहोचले, मग वासरू अंगात वारं शिरल्यासारखे पळत सुटायचं. पायाने माती उकरायचं, जोरजोरात वेड्यासारखं उड्या मारायचं. त्याची आई त्याला किती वेळा सांगायची, “अरे बाळा उड्या मारू नकोस, जोरात धावू नकोस, अडचणीच्या, खूप झाडी असलेल्या ठिकाणी जाऊ नकोस.” पण वासरू आईने सांगितले करू नकोस, मग तेच करायचे. वासरांच्या खोड्यांना त्याची आईदेखील कंटाळली होती.
दुपारी २ ची भर उन्हाची वेळ होती. गाय आपली वडाच्या झाडाखाली रवंथ करत बसली होती. त्या थंडगार सावलीत बसायचं सोडून वासरू निघालं समोरच्या गर्द झाडीकडे! आईने ओरडून सांगितलं, “अरे तिथे जंगली प्राणी असतील. ते तुला पकडतील. तिकडे जाऊ नको.” तरीपण वासरू हट्टाने त्या गर्द झाडीत शिरलं. थंडगार सावलीत आराम करण्यासाठी!
ऊन कमी झाल्यावर गाय उठली आणि परत रानातल्या हिरव्या गवतावर ताव मारू लागली. गवत खाता खाता पांढरे शुभ्र बगळे तिच्या पाठीवर बसायचे. पण गाय त्यांना शेपटी मारून हाकलत नव्हती. एवढा वेळ झाला तरी वासरू अजून झाडीतून बाहेर का आलं नाही! म्हणून गाईने मान वर करून पाहिले. पण तिला झाडीत काहीच हालचाल दिसली नाही. गाईला जरा काळजीच वाटली. ती खायचं विसरून चटकन त्या गर्द झाडीकडे धावत सुटली.
अंदाज घेत गाय झाडीत शिरली. बघते तर काय! समोरचं ते दृश्य बघून तिच्या काळजाचे पाणी पाणी झाले. तिचे लाडके बाळ जमिनीवर पडले होते. अन् एका मोठ्या अजगराने त्याला विळखा घातला होता. वासरू पाय झाडत होते. पण अजगराचा विळखा खूपच मजबूत होता. त्यामुळे त्याला स्वतःची सुटका करून घेता येत नव्हती. गाय जीवाची पर्वा न करता वासराच्या दिशेने धावली आणि अजगराच्या शेपटीवर लाथा मारू लागली. पण अजगर विळखा सोडेना. गाय जीवाची पराकाष्टा करत होती. अजगराच्या शेपटीवर, तोंडावर लाथांचा मारा करत होती. अशावेळी अजगर गाईला चावण्याचा प्रयत्न करत होता. पण गाय शिताफीने बाजूला होत होती. बराच वेळ प्रयत्न करूनही अजगर विळखा सोडत नव्हता.
आता जास्त वेळ थांबून चालणार नव्हते. गाय तशीच घराकडे धावत सुटली. धावताना रानातले दगड, धोंडे पायाला लागत होते. काटेरी झुडपे अंगावर जखमा करत होती. पण ते हृदय एका आईचं होतं. आपल्या बाळाला वाचवण्यासाठी ती आकांताने धावत होती. ती शेतकऱ्याच्या घरासमोर येऊन जोरजोराने हंबरू लागली. तोच शेतकरी बाहेर आला. एकट्या गाईला बघताच काहीतरी गंभीर प्रकरण आहे त्याच्या लक्षात आले. त्याने चटकन आपल्या मित्रांना हाका मारल्या. सर्वजण हातात काठ्या घेऊन गाईच्या मागे धावत पळत निघाले. गाय धावून धावून खूप दमली होती. तरीही ती सर्वांच्या पुढे धावत होती. थोड्याच वेळात सर्वजण त्या गर्द झाडीजवळ आले. अन् शेतकरी आणि त्याच्या मित्रांनी, ते हादरवून टाकणारे दृश्य पाहिले. एका मोठ्या अजगराने वासराला विळखा घातला होता. वासरू निपचित पडले होते. पण त्याचे पोट मात्र अजूनही हलत होते. हे लक्षात येताच लगेच शेतकरी आणि त्याच्या मित्रांनी अजगरावर काठ्यांचा हल्ला चढवला.
या अनपेक्षित हल्ल्याने अजगर घाबरले. त्याने वासराभोवतीचा विळखा लगेच सैल केला आणि तेथून त्वरेने निघून गेला. इतक्यात कोणीतरी पाण्याची बादली आणली. शेतकऱ्याने वासराच्या तोंडावर पाणी मारले. वासराची ही अवस्था पाहून गाईच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रूधारा वाहत होत्या. ती त्याच्या सर्वांगाला चाटू लागली. त्याला उठवण्यासाठी प्रेमाने ढुशा मारू लागली. मग काय आश्चर्य वासरू चक्क उठून उभे राहिले. आता मात्र सर्वांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. गाईच्या तर आचळातून दुधाच्या धारा वाहू लागल्या आणि त्या प्रेमाच्या अभिषेकात वासरासह सारेच पूर्णतः भिजून गेले.






