आनंदी पालकत्व; डाॅ. स्वाती गानू
अभिषेक आणि समिधा दोघेही तीन वर्षांच्या निहारला घेऊन एका मोठ्या हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. तिथे गेल्यानंतर पाच-दहा मिनिटे व्यवस्थित गेली. मात्र नंतर निहारने हट्ट करायला सुरुवात केली की हे मला हवं. समिधाने त्याला सांगितलं की ही गोष्ट आपली नाही. तुला मिळू शकणार नाही. तेव्हा त्याने पहिल्यांदा रागाचे, नंतर हातपाय आपटण्याचे, शेवटी जमिनीवर लोळून रडण्याचे हत्यार उपसले. अभिषेकनेही त्याला खूप समजावले पण तो ऐकायला तयार नव्हता. हॉटेलमधील सगळेजण या प्रसंगाकडे पाहत होते. हॉटेलमधील वेटरदेखील निहारला समजवायला लागले. पण तो कोणाचेही ऐकेना. समिधा आणि अभिषेकला संकोचल्यासारखे झाले; परंतु त्यांनी खुणेनेच सगळ्यांना सांगितले की कोणीही त्याला समजवायला जाऊ नका. हळूहळू निहारला लक्षात आले की, कोणीच आपल्याकडे लक्ष देत नाही, तेव्हा तो स्वतः उठून आईकडे आला. काही वेळेला अशा प्रकारच्या प्रसंगांना टॉडलर अर्थात बाल्यावस्थेतील म्हणजेच तीन वर्षांपर्यंतच्या किंवा कदाचित थोडं पुढच्याही वयोगटातील मुले अशा पद्धतीने खूप हट्टीपणा करताना आढळतात आणि आपल्याला खूप लाजल्यासारखं होतं. मात्र हा मुलांचा हट्टीपणा नसून त्यांना काही सांगायचं असू शकतं. दर वेळेलाच त्यांना सीन क्रिएट करायचा असतो असं नाही, अशा वेळेस नेमकं कसं वागावं ते पाहू या.
आपलं बाळ सगळ्यांसमोर रडायला लागतं…, जमिनीवर लोळतं… आणि त्या क्षणी सगळ्यांच्या नजरा आपल्याकडे वळतात. मनात एकच विचार येतो “लोक काय म्हणतील?” काहीजण कुजबुजतात, काहीजण सल्ले देतात… आणि आपण मात्र आतून थोडं तुटतो.पण त्या गोंधळात एक महत्त्वाचा प्रश्न आपण विसरतो. माझं बाळ खरंच हट्टी आहे… की ते काहीतरी सांगायचा प्रयत्न करतंय? टॉडलर वयात “नाही” म्हणणं, हट्ट करणं, लक्ष वेधणं हा सगळा त्यांच्या वाढीचा भाग असतो. त्यांच्याकडे शब्द नसतात… पण भावना खूप असतात. गरज आहे ती त्यांना थांबवण्याची नाही… तर त्यांना समजून घेण्याची. शांतपणे परिस्थिती हाताळण्याची. टॉडलर वयात “इगो” (स्वतःची जाणीव) तयार होऊ लागते. या वयात बाळांना “हे माझं आहे”, “माझी आई”, “माझं खेळणं” अशी मालकीची भावना कळू लागते. त्यांना लक्ष हवं असतं आणि ते नैसर्गिक आहे. त्यामुळे कधी कधी ते हट्टी होतात, रडतात, जमिनीवर लोळतात, सीन करतात आणि अशा वेळी आई-बाबांना खूप अवघडल्यासारखं वाटतं.
पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी. या “वाईट सवयी” नाहीत, तर तो त्यांच्या वाढीचा भाग आहे. मात्र असं घडतं तेव्हा पटकन पहिला विचार हाच येतो की, लोक काय म्हणतील? लोक बघतात, काहीजण कमेंट करतात. “आई-बाबांनी काही शिकवलं नाही का?” “खूप लाड केलेत म्हणून असं होतं!” हे ऐकून आपल्याला वाईट वाटणं स्वाभाविक आहे. पण प्रत्येकाला सगळं समजतंच असं नाही. टॉडलरच्या मनाची आणि विकासाची सखोल समज सगळ्यांकडे नसते. म्हणून पहिली गोष्ट लोकांच्या मतापेक्षा आपल्या बाळाची गरज महत्त्वाची. बाळ असं का करतं? जेव्हा बाळ रडतं, लोळतं तेव्हा ते आपल्याला कंट्रोल करायला नाही करत. ते त्याच्या भावना व्यक्त करतं. त्याला काही हवं आहे, त्याला “नाही” ऐकायचं नाही, तो थकलेला किंवा भुकेला आहे, त्याला लक्ष हवं आहे. पण त्याला शब्दात सांगता येत नाही. म्हणून शरीराने आणि आवाजाने व्यक्त होतं. अशा वेळी काय करावं? १. शांत राहणं सर्वात महत्त्वाचं. बाळ रडतंय म्हणून आपणही घाबरून, ओरडून प्रतिक्रिया दिली, तर परिस्थिती बिघडते. थोडं खोल श्वास घ्या. स्वतःला सांगा. “हे नॉर्मल आहे.” २. लगेच हार मानू नका. जर बाळ हट्ट करत असेल (उदा. दुकानात चॉकलेटसाठी) आणि आपण लगेच दिलं, तर त्याला शिकायला मिळतं. “रडलो की मला मिळतं.” म्हणून प्रेमाने पण ठामपणे “नाही” म्हणणं महत्त्वाचं. उदा.: “मला माहिती आहे तुला चॉकलेट हवं आहे, पण आत्ता नाही.” ३. बाळाला सुरक्षित ठेवा, पण सीनकडे दुर्लक्ष करा. जर तो जमिनीवर लोळत असेल, तर त्याला इजा होणार नाही याची काळजी घ्या. पण सगळ्यांसमोर जास्त रिऍक्ट करू नका. कधी कधी बाळ लक्ष वेधण्यासाठी असं करतं. जर आपण शांत राहिलो, तर ते हळूहळू थांबतं. ४. टोडलर अवस्थेतील मुलं हट्ट करतात आणि तो हट्ट पुरवला गेला की, त्यामागे एक सवय तयार होते. ती असते कोणत्या प्रकारच्या वर्तनाला आपण काय प्रतिक्रिया देतो त्याची. आपण जर मुलांच्या हट्टानुसार मागितलेली वस्तू देण्याची प्रतिक्रिया दिली, तर हळूहळू ती सवय बनते आणि मूल हट्ट आणि वस्तू मिळवणे अशा प्रकारचा संबंध जोडते आणि असे वर्तन अधिक करते. म्हणून दर वेळेला मुलांच्या हट्टाला बळी पडणं योग्य होत नाही. ५. भावना शब्दात सांगायला मदत करा. बाळाला म्हणा : “तुला राग आला आहे ना?” “तुला हे खूप हवं होतं, म्हणून तू रडतो आहेस.” यामुळे त्याला स्वतःच्या भावना समजायला मदत होते. ६. नंतर समजावून सांगा. बाळ शांत झाल्यावर त्याला हळूच समजवा “असं रडल्यावर आपण दुखावतो. तू मला सांगू शकतोस.” त्या वेळी शिकवणं जास्त प्रभावी असतं. ७. घरी असताना हा प्रयोग करून बघा की, मुलांना हट्टापासून विचलित करण्यासाठी ३-३-३ हे तंत्र वापरता येते. उदाहरणार्थ तुझ्या भोवती असणाऱ्या तीन गोष्टींची नावे सांग, तुला ऐकू येणाऱ्या तीन आवाजांची नावे सांग, तुला वास येणाऱ्या तीन गोष्टींची नावे सांग. तसेच या मुलांसाठी एक खजिनापेटी करून मुलाला आवडणाऱ्या वस्तू त्यात ठेवून जेव्हा मूल चिडते, हट्ट करते तेव्हा ही खजिनापेटी उघडून त्याला शांत करता येऊ शकेल. हे करून पाहायला हरकत नाही. आणखी अनेक खेळ व अॅक्टिव्हिटी सांगता येतील. ८. लोकांकडे दुर्लक्ष करायला शिका. हो, हे कठीण आहे. पण खूप गरजेचं आहे. प्रत्येकजण आपल्या परिस्थितीत नाही. आपण आपल्या बाळासाठी योग्य ते करत आहोत का हेच महत्त्वाचं. एक छोटं सत्य. टॉडलर वयात बाळ “केंद्रबिंदू” व्हायचा प्रयत्न करतं कारण त्याला सुरक्षित वाटावं, लक्ष मिळावं, प्रेम मिळावं असं वाटतं. जर आपण त्याच्याकडे योग्य मार्गाने लक्ष दिलं, शांतपणे समजून घेतलं, तर तो हळूहळू शिकतो : कसं बोलायचं कसं वागायचं आणि “नाही” स्वीकारायचं शेवटचं. तुमचं बाळ रडतंय, हट्टीपणा करतंय याचा अर्थ तुम्ही वाईट आई-बाबा नाही. याचा अर्थ तुमचं बाळ वाढतंय, शिकतंय. थोडा संयम, थोडं प्रेम आणि थोडा ठामपणा- यामुळेच हे टप्पे सहज पार पडतात. लोकांचं मत बदलत राहील… पण तुमचं बाळ तुमच्याकडून शिकत राहील.






