५० हून अधिक रांगोळीचे उखाणेही केले तयार
नाशिक : मनुष्य हा निर्मितीशील प्राणी आहे आणि ही निर्मितीची इच्छा हाच आपल्या छंदाचा उगम असतो. ही सर्जनशीलता प्रत्येक माणसांत असते. तुम्ही एखाद्या गोष्टीमुळे तुमची ऊर्मी दाबून टाकत असता, पण आपला एखादा छंद जोपासून ही ऊर्मी फुलू देणं हे आपल्याच हातात असतं. प्रत्येक व्यक्तीला कोणता ना कोणता छंद असतो.
छंद माणसाला दु:ख विसरायला लावतात. छंदामुळे व्यक्तीची क्रिएटिव्हीटी वाढते. म्हणूनही छंद जोपासण्याकडे सर्वांचा कल असतो. मनाच्या विरंगुळ्यासाठी पुरेसा वेळ दिल्याने रोजच्या कामाचा ताण हलका होण्यास मदत होते.कारण छंद औषधासारखं काम करतात. छंद म्हणजे जीवनाला मिळालेली लय असते शिवाय छंद जोपासण्यासाठी वयाचे बंधनही नसते.
अशाच एक विंचूरच्या आजीबाई मिराबाई वाडेकर या वयाच्या ७५ व्या वर्षीही आपल्या रांगोळीच्या छंदासाठी आणि रांगोळीचेच उखाणे म्हणण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचे ५० पेक्षा जास्त स्वरचित उखाणे आहेत. विंचूरला त्यांच्या राहत्या घरासमोर असलेले जुने हनुमान मंदिर, आजूबाजूला आणखी दोन मंदिरे (गणपती मंदिर, देवी मंदिर) असल्याने आणि घरासमोर अशा एकूण चार ठिकाणी त्या नित्यनेमाने वैविध्यपूर्वक, नव्या रांगोळी काढतात. त्यांच्या रांगोळीतील कलेमध्ये वेगवेगळ्या रंगांच्या छटा त्या काढतात.
जवळपास कळत्या वयापासून त्यांना रांगोळीचा छंद असून त्यांनी तो अजूनही जोपासला असल्याने तो छंद दखलपात्र आहे. त्यांची रांगोळी सेवा त्या देवाला भक्तियुक्त अंतःकरणाने समर्पित करतात. रोज सकाळी रांगोळी काढतांना त्यांचे त्यात सकाळचे दोन तास कसे जातात कळतच नाही. ही रांगोळी कला त्यांनी अनेक लहान मोठ्या मैत्रिणींकडून वयाच्या पाचव्या वर्षापासून शिकल्याचे त्या सांगतात. या गोष्टीचा त्या आवर्जून उल्लेख करतात. त्यांना रांगोळी काढल्याचे समाधान आनंद मिळत असतो. त्यांची या वयातही बुद्धी, शरीर, मन एका लईत काम करते याची पावती त्यांच्या रांगोळ्या पाहून येते.
मीराबाई नाव आणि देवाला अर्पण करणारी त्यांची कला बघून त्यांचे नाव सार्थक झाल्याचे समजते. त्यांना विचारले असता त्या सांगतात “आपण देवाला काय देऊ शकतो? तर आपला विचार, आपली कला, आपले श्रम देवाच्या अंगणात अंथरायचे बस.. त्यानेच माझे मन प्रसन्न होते. माझे मनोरंजन पण होते. हीच माझी आवड, हीच माझी पूजा, हीच माझी अर्चना, हीच माझी प्रार्थना, रांगोळी काढून मला माझा वेळ सार्थकी लागण्याचे समाधान मिळते. रांगोळीचे, देवाचे आणि मंदिराचे जवळपास ५० पेक्षा जास्त उखाणे त्यांनी बनवले असून त्यांना दीर्घायुष्य लाभो, आरोग्य लाभो याच त्यांना शुभेच्छा!