Saturday, May 30, 2026

Nasrapur Case Update : नसरापुरातील 'ते' भयंकर पुरावे समोर आले अन कुटुंबियांच्य अश्रूंचा बांध फुटला

Nasrapur Case Update :  नसरापुरातील 'ते' भयंकर पुरावे समोर आले अन कुटुंबियांच्य अश्रूंचा बांध फुटला

Nasrapur Case Update : पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे अवघ्या साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अमानुष लैंगिक अत्याचार आणि निर्घृण खून प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. नसरापूर येथील लैंगिक अत्याचार आणि खून प्रकरणात विशेष न्यायालयात सहा साक्षीदारांनी साक्ष नोंदवली आहे. त्यामध्ये पीडितेची आई, वडील, पीडितेच्या मृत्यूच्या कारणांचा पंचनामा करणारे पंच आणि आरोपीला पीडितेसमवेत पाहणाऱ्या साक्षीदारांचा समावेश आहे. दरम्यान, आरोपीविरोधात दाखल आरोपपत्रात पुरावा नष्ट केल्याचे कलम वाढविण्याचा अर्ज सरकार पक्षातर्फे करण्यात आला आहे.

नसरापूर येथे १ मे रोजी एका साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक आणि अनैसर्गिक अत्याचार करून तिचा खून करण्यात आला होता. या प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यात भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५ ) या नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात या प्रकरणाची जलदगती सुनावणी सुरू आहे. शुक्रवारी पहिल्या सहा महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी नोंदवली. या साक्षीदारांमध्ये पीडितेची आई, वडील, मृत्यूच्या कारणांचा पंचनामा करणारे पंच आणि आरोपीला पीडितेसोबत पाहिलेले दोन प्रत्यक्षदर्शी ग्रामस्थ यांचा समावेश होता.

पुरावे समोर येताच कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला

सुनावणीदरम्यान जेव्हा सरकारी पक्षाने न्यायालयासमोर अत्यंत महत्त्वाचे तांत्रिक पुरावे सादर केले, तेव्हा कोर्टातील वातावरणच बदललं. आरोपीने पीडितेचे अपहरण केल्यानंतर तिचा शोध घेणाऱ्या तीन ग्रामस्थांनी कोर्टात सांगितले की त्यांनी आरोपीला मुलीसोबत पाहिले होते. कोर्टात घटनास्थळावरील सीसीटीव्ही चित्रीकरण आणि पीडितेचे छायाचित्रे दाखवण्यात आली. तेव्हा आरोपीची ती क्रूरता पाहून आणि मृत चिमुरडीचा चेहरा पाहून साक्षीदारांना आणि आई-वडिलांना अक्षरशः रडू कोसळले.

बचाव पक्षाचे वकील ॲड. हिंमतराव सूर्यवंशी यांनी या साक्षीदारांची उलटतपासणी घेतली असली, तरी सरकारी पक्षाने पीडितेचा जन्मदाखला, एफआयआर (FIR) प्रत आणि मृत्यूचा इन्क्वेस्ट पंचनामा कोर्टासमोर मजबूत पुरावा म्हणून ठेवला आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपी भीमराव कांबळेविरोधात तब्बल ११०० पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे, ज्यामध्ये सव्वाशे साक्षीदारांचा समावेश आहे. त्यापैकी मुख्य ८२ साक्षीदारांची साक्ष नोंदवली जाणार आहे.

आरोपीने पीडितेचे अपहरण केल्यानंतर तिचा शोध घेणाऱ्या तीन ग्रामस्थांनीही न्यायालयासमोर साक्ष नोंदवली. सीसीटीव्ही चित्रीकरणात पीडितेला घेऊन जाणाऱ्या आरोपीला साक्षीदारांनी ओळखले. यापैकी दोन साक्षीदारांनी पीडितेला आरोपीसमवेत बघितल्याचे न्यायालयासमोर सांगितले. या प्रकरणातील सहाव्या साक्षीदाराची साक्ष नोंदविण्याची प्रक्रिया आज (शनिवारी) सुरू राहणार आहे.

"नसरापूर लैंगिक अत्याचार आणि खून प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष न्यायालयाने दररोज सुनावणी घेऊन खटला जलदगतीने निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत. आरोपीविरोधात आरोप निश्चित झाले असून आम्ही लवकरात लवकर हा खटला निकाली काढून पीडितेला न्याय मिळवून देऊ आणि समाजात एक कडक संदेश देऊ."

ॲड. अजय मिसर, विशेष सरकारी वकील

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >