Saturday, May 30, 2026

Pune Fugewadi Suspicious Death : ५ कॅनचे केले १२ कॅन अन् नशेची तीव्रता वाढवण्यासाठी ओतलं 'मिथेनॉल'! २२ जणांचा बळी घेणाऱ्या संपूर्ण रॅकेटचा थरारक पर्दाफाश!

Pune Fugewadi Suspicious Death : ५ कॅनचे केले १२ कॅन अन् नशेची तीव्रता वाढवण्यासाठी ओतलं 'मिथेनॉल'! २२ जणांचा बळी घेणाऱ्या संपूर्ण रॅकेटचा थरारक पर्दाफाश!

पुणे : पिंपरी-चिंचवड (Pimpari-Chinchwad) आणि पुणे शहर परिसराला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारूकांडात आतापर्यंत तब्बल २२ निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळजनक वातावरण असून, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. ही जीवघेणी दारू नेमकी कुठे तयार झाली, तिचे जाळे कसे पसरले आणि हा काळा बाजार कसा चालत होता, याचा अंगावर काटा आणणारा संपूर्ण घटनाक्रम आता पोलिसांच्या तपासात उघड झाला आहे.

मुख्य आरोपींना बेड्या

या संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. विषारी दारूची निर्मिती आणि तिचे वितरण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत पोलिसांनी राजू प्रजापती, योगेश वानखेडे आणि कर्नलसिंग तख्तसिंग विरखा या तीन मुख्य सूत्रधारांना अटक केली आहे. या आरोपींनी केवळ पैशांच्या हव्यासापोटी मानवी जीविताशी कसा खेळ मांडला, याचे धक्कादायक वास्तव चौकशीतून समोर आले आहे.

'उरळी कांचन' ते 'इंडिया मार्ट'

या काळ्या धंद्याची पाळेमुळे उरळी कांचन भागात रुजलेली होती. सुरुवातीला राजू प्रजापती हा आपल्या उरळी कांचन येथील अवैध अड्ड्यावर गावठी हातभट्टीची देशी दारू तयार करायचा. योगेश वानखेडे हा त्याचा नियमित ग्राहक होता, जो तिथून दारू विकत घेऊन पुढे विकायचा. मात्र, दारूची नशा आणि नफा वाढवण्यासाठी योगेशने एक घातक योजना आखली. त्याने आपल्या मोबाईलवर 'इंडिया मार्ट' या व्यावसायिक संकेतस्थळावर जाऊन इथेनॉल आणि मिथेनॉलसारख्या अत्यंत घातक रसायनांची माहिती शोधण्यास सुरुवात केली.

बनावट कागदपत्रे आणि ऑनलाईन खरेदीचा कट

योगेशच्या या शोधानंतर त्याला मुंबईतील 'रेक्स (REX) इंटरनॅशनल' या कंपनीकडून मिथेनॉल पुरवठा करण्याबाबतचा एक संदेश मिळाला. परंतु, हे रासायनिक द्रव्य खरेदी करण्यासाठी कंपनीने कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून जीएसटी (GST) क्रमांक आणि ओळखपत्राची मागणी केली. यावर तोडगा म्हणून योगेशने मांजरी परिसरातील एका दुकानातून 'प्रदीप शर्मा' या काल्पनिक नावाचे एक बनावट ओळखपत्र तयार करून घेतले. बनावट ओळखपत्राच्या जोरावर २९ एप्रिल २०२६ रोजी योगेश वानखेडेने रेक्स इंटरनॅशनल कंपनीकडे तब्बल २१५ लिटर मिथेनॉलची ऑनलाईन बुकिंग केली. या खरेदीसाठी त्याने स्वतःचे बँक खाते न वापरता, आपल्या एका मित्राच्या खात्यावरून १७ हजार ५०० रुपयांचे पेमेंट कंपनीला ट्रान्सफर केले. ९ मे २०२६ रोजी हा रसायनाचा साठा भोसरी येथील 'एसीपीएल ट्रान्सपोर्ट' च्या गोडाऊनमध्ये पोहोचला. तिथून योगेशने 'पोर्टर' या वाहतूक सेवेचा वापर करून हे रसायन खडकी रेल्वे स्टेशनसमोरील कल्पेश अग्रवाल यांच्या ताडीच्या दुकानात आणून लपवले.

पाच कॅनचे केले बारा कॅन

रसायन हाती आल्यानंतर योगेशने राजू प्रजापतीकडून प्रत्येकी ३५ लिटर क्षमतेचे देशी हातभट्टी दारूचे ५ कॅन विकत घेतले. नफा कमावण्यासाठी त्याने आधी त्या पाच कॅनमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी मिसळून त्याचे १० कॅन केले. त्यानंतर २३ मे २०२६ रोजी कल्पेश अग्रवालच्या ताडीच्या दुकानात बसून त्याने या दारूमध्ये तब्बल ५० लिटर सुती मिथेनॉल ओतले. दारूची नशा कमालीची वाढवण्यासाठी त्याने हे जीवघेणे मिश्रण तयार केले, जे प्रत्यक्षात संथ विषासारखे काम करणार होते.

शहराच्या विविध भागात मृत्यूचे वाटप

हे विषारी मिश्रण तयार झाल्यानंतर २५ मे २०२६ रोजी योगेशने या मृत्यूच्या कॅनचे वितरण सुरू केले. त्याने यातील ५ कॅन फुगेवाडी येथील कर्नलसिंग विरखाला विक्रीसाठी दिले. ६ कॅन हडपसर भागातील आकाश जाधव नावाच्या एजंटकडे पाठवले, तर उरलेला १ कॅन दापोडी येथील इरफान ऊर्फ पप्पू कुरेशी याला विकण्यासाठी देण्यात आला. या वितरकांमार्फत ही दारू तळागाळातील मद्यप्यांपर्यंत पोहोचली आणि त्यानंतर पुण्यात मृत्यूचे तांडव सुरू झाले. पोलीस सध्या या साखळीतील इतर लहान घटकांचा शोध घेत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >