Saturday, May 30, 2026

Nagpur : काँग्रेस श्रेष्ठींनी भाकरी फिरवली

Nagpur : काँग्रेस श्रेष्ठींनी भाकरी फिरवली

नागपूरच्या राजकीय वर्तुळात काँग्रेस श्रेष्ठींनी ‘भाकरी फिरवली’ आणि त्याचे पडसाद आता राज्याच्या सत्तासमीकरणांमध्ये उमटू लागले आहेत. नेतृत्व बदलाच्या हालचाली, गटबाजीचे नवे संकेत आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अखेर काँग्रेस श्रेष्ठींनी नागपुरात नेतृत्व बदल करत भाकरी फिरवली आहे. गेल्या १२ वर्षांपासून उपराजधानी नागपूरच्या शहराध्यक्षपदाची धुरा सांभाळणारे आमदार विकास ठाकरे यांना बाजूला करत तुलनेने तरुण चेहरा असलेल्या प्रफुल्ल गुडधे यांच्याकडे नागपूर शहर काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विकास ठाकरे हे नागपूर शहर काँग्रेसमध्ये विलास मुत्तेमवार गटाचे म्हणून ओळखले जातात. २००२ मध्ये ते प्रथमच नागपूर महानगरपालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आले होते.पहिल्याच टर्ममध्ये ते नागपूरचे महापौर बनले. त्यांच्या अडीच वर्षांच्या कारकिर्दीची चांगलीच चर्चा झाली होती. एका बैठकीत त्यांनी विरोधी पक्षातील अनेक नगरसेवकांना एका झटक्यात निलंबित करून एक महत्त्वाचा प्रस्ताव मंजूर करून घेतला. पुढे हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने तो प्रस्ताव आणि नगरसेवकांचे निलंबन दोन्ही रद्दबातल ठरवले. तसेच, या प्रकरणात ठाकरेंना ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता. २००८ मध्ये विकास ठाकरे महापालिकेत विरोधी पक्षनेते झाले. त्यानंतर २०१४ मध्ये ते पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेत निवडून गेले. तेव्हापासून ते सातत्याने आमदार आहेत. त्याच दरम्यान विकास ठाकरे यांची काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्यानंतर ते सातत्याने या पदावर कार्यरत होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेल्या त्यांच्या जवळिकीची चर्चा नेहमीच रंगत होती. २०१९ मध्ये ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनीही जोर धरला होता. मात्र त्यांना मंत्रीपद हवे होते आणि मुलाला देखील महापालिकेत पद हवे होते. ते जुगाड न जमल्यामुळे ते पक्षातच राहिले असे बोलले गेले होते.

२०२४ मध्ये त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक काँग्रेसच्या उमेदवार म्हणून लढवली होती. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. त्यावेळीही ते भविष्यात भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. विरोधकांकडून त्यांच्यावर “भाजपची बी टीम” म्हणून काम करत असल्याचे आरोपही सातत्याने करण्यात येत होते. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांनी आपला मुलगा केतन ठाकरे याला पुढे केल्याने त्यांच्या प्रतिमेला आणखी धक्का बसल्याचे बोलले गेले. एकेकाळी नागपूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र आज पक्षाची झालेली अधोगती पाहता, त्यासाठी ठाकरे यांनाच मोठ्या प्रमाणात जबाबदार धरले जात आहे. पक्ष वाढवायचा असेल तर समोर असलेल्या तगड्या विरोधकाला वारंवार आव्हान देत राहणे, सत्तेने केलेल्या चुका जनतेसमोर आणणे, लोकांच्या प्रश्नासाठी लढे उभारणे, केवळ भाजपच नाही तर त्यातल्या नेतृत्वाला लोकांच्या प्रश्नावरून सळो की पळो करून सोडणे हे त्यांचे काम होते.

त्यात ते अपयशी ठरले. भाजपच्या जवळचे असा आरोप त्यांच्यावर चिकटला तो यातूनच. या शहरातला एकही निर्णय गडकरी व फडणवीसांच्या संमतीशिवाय होत नाही. भाजपचे राजकारण, विकासकारण व सत्ताकारण याच दोन चेहऱ्यांभोवती फिरते. अनेकदा सामान्य मतदार सुद्धा या दोघांकडे बघून पक्षाला मतदान करतात. याची पूर्ण जाणीव असूनही ठाकरेंनी या दोघांना राजकीय पातळीवर कधी लक्ष्य केल्याचे दिसले नाही. इथे शेकला स्थान होते. भलेही त्यात तथ्य नसले तरी. नागपुरात दंगल झाली तेव्हा अवघी शहर काँग्रेस शांत होती. याचे खुद्द भाजपच्या आमदाराने जाहीर कौतुक केले. शेवटी पक्षाच्या वरिष्ठांना येथे येऊन भूमिका घ्यावी लागली.

नव्याने शहर अध्यक्ष झालेले प्रफुल्ल गुडधे हे महापालिकेचे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांचे वडील विनोद गुडघे हे आधी भाजपमध्ये होते. नागपुरात भाजपचे पहिले आमदार म्हणून ते विजयी झाले होते. १९९८-९९ मध्ये युती सरकारमध्ये काही काळ ते राज्यमंत्री देखील होते. मात्र नंतर नितीन गडकरींशी न पटल्यामुळे ते भाजप सोडून काँग्रेसवासी झाले होते. प्रफुल्ल गुडघे हे सुरुवातीपासूनच काँग्रेसमध्ये राहिलेले आहेत. २००८ पासून ते महापालिकेत निवडून येत असून त्यांनी २०१४ आणि २०२४ मध्ये दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातून देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध विधानसभा निवडणूकही लढवली होती. एक तडफदार युवा कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जातात. महापालिकेतही जागरूक नगरसेवक म्हणून त्यांची ख्याती आहे. विकास ठाकरे नंतर कोणाचा नंबर लागणार ही चर्चा चालू असतानाच त्यांचे अचानक नाव पुढे आले आहे. प्रफुल्ल गुडधे यांच्यासमोर सत्ताधारी भाजपला नागपुरात लढत देऊन त्यांना रोखणे आणि काँग्रेसला गतवैभव मिळवून देणे हे खरे आव्हान असणार आहे.

नागपुरात नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, प्रवीण दाटके असे सर्व दिग्गज भाजपमध्ये सक्रिय आहेत. त्या तुलनेत काँग्रेसमध्ये आज नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी, विलास मुद्देंबर, विकास ठाकरे असे सगळेच दिग्गज नेते नागपुरात कार्यरत आहेत. या प्रत्येकाचे तोंड वेगवेगळ्या दिशेला आहे. या सर्वांना एकत्र आणून संघटित करणे आणि काँग्रेसचा मतदार काँग्रेसच्या बाजूने पुन्हा वळवणे हे त्यांचे लक्ष्य राहणार आहे. एका काळात नागपुरातून भाजपचा एकही आमदार किंवा खासदार निवडून येत नव्हता. महापालिकेत देखील काँग्रेसची सत्ता येत होती. आज महापालिकेतही काँग्रेसची दयनीय अवस्था आहे, तर विधानसभेत देखील सहापैकी फक्त दोनच आमदार आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रफुल्ल गुडधे यांना कंबर कसावी लागणार आहे. पक्ष संघटित करणे आणि सर्वांना कामाला लावणे हे जर शक्य झाले तरच ते पुढील निवडणुकांमध्ये पक्षाला जुने वैभव मिळवून देण्याचा प्रयत्न करू शकतील हे निश्चित.

Comments
Add Comment