'रेक्स इंटरनॅशनल'वर छापा टाकत हजारो किलो मिथेनॉल जप्त
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड (Pimpari-Chinchwad) परिसरात गावठी हातभट्टीची विषारी दारू प्यायल्याने २२ निष्पाप नागरिकांचा नाहक बळी गेला. या भीषण 'मृत्यू तांडवा'ने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असतानाच, अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) या प्रकरणाचा अत्यंत महत्त्वाचा धागा शोधून काढला आहे. एफडीएचे नवनियुक्त आणि धडाकेबाज आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या थेट आदेशानंतर, प्रशासनाने थेट भिवंडी (Bhiwandi) गाठून विषारी रसायनाचा एक प्रचंड मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध केमिकल पुरवठा करणाऱ्या राज्यव्यापी रॅकेटचे धागेदोरे समोर आले आहेत.
पुणे : पिंपरी-चिंचवड (Pimpari-Chinchwad) आणि पुणे शहर परिसराला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारूकांडात आतापर्यंत तब्बल २२ निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला ...
भिवंडीतील गोदामामधील ५,९२९ किलो मृत्यूचा साठा हस्तगत
पुण्यात मरण पावलेल्या नागरिकांच्या शरीरात जे घातक केमिकल गेले होते, ते रसायन भिवंडीतून पुरवले गेल्याचे तपासात निष्पन्न झाले. या माहितीच्या आधारे एफडीएच्या विशेष पथकाने भिवंडीतील 'मे. रेक्स इंटरनॅशनल' (M/s Rex International) या कंपनीच्या गोदामावर अचानक धडक छापा टाकला. या कारवाई दरम्यान मानवी आरोग्यासाठी अत्यंत प्राणघातक ठरणाऱ्या 'मिथेनॉल' (Methanol) या रसायनाचा तब्बल ५,९२९ किलोग्रॅमचा बेकायदेशीर साठा जप्त करण्यात आला. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, एवढ्या मोठ्या प्रमाणावर असलेल्या या घातक रसायनाची कोणतीही अधिकृत नोंद किंवा खरेदी-विक्रीची पावती कंपनीच्या मुख्य नोंदवहीत (Register) आढळून आली नाही.
भिवंडी ते उरळी कांचन, 'केमिकल सप्लाय चेन'चा पर्दाफाश
View this post on Instagram
पोलीस आणि एफडीएच्या संयुक्त चौकशीतून या मृत्यूच्या व्यापाराची संपूर्ण साखळी (Supply Chain) आता उजेडात आली आहे. भिवंडीच्या 'मे. रेक्स इंटरनॅशनल'मधून छुप्या मार्गाने बाहेर पडणारे हे मिथेनॉल थेट कर्नलसिंग विरका, मुख्य सूत्रधार योगेश वानखेडे आणि उरळी कांचन येथील अवैध दारू विक्रेता राजू प्रजापती यांच्यापर्यंत पोहोचत होते. केवळ अधिक नफा कमवण्याच्या आणि दारूची नशा वाढवण्याच्या हव्यासापोटी या गुन्हेगारी त्रिकुटाने या रसायनाचा वापर करून हातभट्टीची विषारी दारू तयार केली, जिने २२ घरांचे संसार उद्ध्वस्त केले.
६ आरोपींना बेड्या ठोकल्या
अन्न व औषध प्रशासनाचा (FDA) कार्यभार हाती घेताच सनदी अधिकारी तुकाराम मुंढे पूर्णपणे 'ॲक्शन मोड'मध्ये आले आहेत. त्यांच्या कडक मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यातील एफडीए अधिकाऱ्यांनी विविध अन्न आस्थापनांची झाडाझडती सुरू केली आहे. या मोहिमेत ७ लाख ३० हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचा संशयास्पद आणि आरोग्यास घातक असलेला साठा जप्त करण्यात आला आहे. प्रतिबंधित व भेसळयुक्त पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी ६ मुख्य आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला ४ लाख ५३ हजार ३४४ रुपयांचा इतर मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
पदभार स्वीकारताच यंत्रणेला शिस्त
आपल्या कडक आणि शिस्तप्रिय कार्यपद्धतीसाठी ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांनी २५ मे रोजीच एफडीएच्या आयुक्तपदाचा नवीन कार्यभार स्वीकारला आहे. खुर्चीवर बसताच त्यांनी राज्यातील जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांना आणि माफियांना कडक शब्दांत इशारा दिला होता. त्यांनी सर्व विभागांतील अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना तातडीने धाडी टाकून जप्ती करण्याचे कडक निर्देश दिले. त्यांच्या या आदेशानंतर यंत्रणेने कमालीची तत्परता दाखवत बृहन्मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या सर्वच विभागांमध्ये एकाच वेळी धडक मोहीम राबवून अवैध धंदेवाल्यांचे कंबरडे मोडले आहे.





