मुंबई : जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून राहिलेल्या इंडियन प्रीमियर लीग २०२६ (IPL 2026) चा अंतिम सामना आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. या ऐतिहासिक महामुकाबल्याचा थरार प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींमध्ये अभूतपूर्व उत्साह दिसून येत आहे. अंतिम सामन्याच्या दिवशी अहमदाबादमध्ये क्रिकेट चाहत्यांची प्रचंड गर्दी होणार हे निश्चित आहे. याच पार्श्वभूमीवर, चाहत्यांचा प्रवास अधिक सोयीचा आणि विनासायास करण्यासाठी 'अकासा एअर' (Akasa Air) या लोकप्रिय विमान कंपनीने कंबर कसली आहे. कंपनीने मुंबई (Mumbai) आणि बेंगळुरूहून (Bengluru) थेट अहमदाबादसाठी (Ahemdabad) विशेष 'मॅच-डे' (Match-Day) विमान सेवा जाहीर केली आहे. ३१ मे रोजी अहमदाबादच्या जगातील सर्वात मोठ्या 'नरेंद्र मोदी स्टेडियम'वर गुजरात टायटन्स (GT) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) यांच्यात हा विजेतेपदाचा सामना रंगणार आहे.
महागड्या हॉटेल्सना 'बाय-बाय'
अहमदाबादमध्ये जेव्हा जेव्हा आयपीएलचे मोठे सामने किंवा फायनलचे आयोजन होते, तेव्हा तिथल्या हॉटेल्सचे दर गगनाला भिडतात. अनेकदा सामान्य चाहत्यांना तिकिटापेक्षा जास्त खर्च तिथल्या मुक्कामासाठी करावा लागतो. चाहत्यांची हीच अडचण ओळखून अकासा एअरने आपल्या विमानांचे वेळापत्रक अत्यंत हुशारीने आखले आहे. या विशेष विमानांमुळे चाहत्यांना सामन्याच्या काही तास आधी अहमदाबादमध्ये पोहोचता येईल. स्टेडियमवर प्रत्यक्ष सामन्याचा थरार अनुभवल्यानंतर, त्यांना तिथे रात्री मुक्काम करण्याची कोणतीही गरज उरणार नाही; कारण सामना संपताच काही तासांतच त्यांना परतीचे विमान मिळणार आहे. यामुळे चाहत्यांचे हॉटेलच्या महागड्या बुकिंगचे हजारो रुपये वाचणार आहेत.
जर्मनीतील म्युनिक येथे झालेल्या आयएसएसएफ विश्वचषक २०२६ मध्ये भारताने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात पहिले आणि दुसरे स्थान पटकावले आहे. ...
अकासा एअरचे खास 'ट्विट'
या विशेष विमान सेवेची घोषणा करताना अकासा एअरने आपल्या अधिकृत 'X' (ट्विटर) हँडलवरून क्रिकेटप्रेमींना एक खास आवाहन केले आहे. त्यांनी लिहिले, "मुंबई, बेंगळुरू आणि अहमदाबाद दरम्यान खास मॅच-डे फ्लाईट्स! महामुकाबल्यासाठी वेळेत अहमदाबादमध्ये दाखल व्हा आणि फायनलचा अंगावर काटा आणणारा थरार अनुभवा. सामना संपताच कोणतीही चिंता न करता थेट मुंबई किंवा बेंगळुरूला परत जा. अहमदाबादमधील रात्रीचा महागडा मुक्काम टाळा – फक्त निखळ क्रिकेटचा आनंद घ्या आणि आमच्यासोबत सुखकर प्रवास करा." विमान कंपनीच्या या कल्पक आयडियाचे सोशल मीडियावर जोरदार स्वागत होत आहे.
बेंगळुरूच्या चाहत्यांसाठी खास वेळापत्रक
Fly In. Cheer Loud. Fly Back Home ✈️ Special match-day flights between Mumbai, Bengaluru and Ahmedabad! 🥳 😎 Touch down in Ahmedabad well in time for the big game 🥳 Feel the adrenaline of the finals ✈️ Return home to Mumbai or Bengaluru soon after the match Skip the… pic.twitter.com/ac4D3vQ77g
— Akasa Air (@AkasaAir) May 29, 2026
विमान कंपनीने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या चाहत्यांसाठी प्रवासाचे विशेष नियोजन केले आहे
जाण्याचा प्रवास (३१ मे) : बेंगळुरूहून हे विशेष विमान ३१ मे रोजी सकाळी ९:३० वाजता उड्डाण करेल आणि दुपारी ११:५० वाजता अहमदाबादमध्ये पोहोचेल. यामुळे चाहत्यांना सामन्यापूर्वी शहरात फिरण्यासाठी आणि वेळेत स्टेडियमवर पोहोचण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.
परतीचा प्रवास (१ जून) : अंतिम सामना संपल्यानंतर, १ जून रोजी पहाटे ४:१० वाजता हे विमान अहमदाबादहून निघेल आणि सकाळी ६:३५ वाजता बेंगळुरूमध्ये सुखरूप दाखल होईल. म्हणजेच चाहत्यांना थेट आपल्या कामावरही जाता येणे शक्य होणार आहे.
मुंबईकरांसाठी 'नवी मुंबई विमानतळावरून' उड्डाण (GT & Cricket Fans Special)
मुंबई आणि आसपासच्या परिसरातील क्रिकेटप्रेमींसाठी अकासा एअरने नव्याने सुरू झालेल्या 'नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून' (NMIA) या विमानाचे संचालन करण्याचे ठरवले आहे:
जाण्याचा प्रवास (३१ मे) : मुंबईच्या चाहत्यांसाठी हे विमान ३१ मे रोजी दुपारी २:४५ वाजता नवी मुंबईतून उड्डाण करेल आणि अवघ्या दीड तासात, म्हणजेच दुपारी ४:१५ वाजता अहमदाबादमध्ये उतरेल.
परतीचा प्रवास (१ जून) : विजेतेपदाचा सोहळा आणि जल्लोष अनुभवल्यानंतर, १ जून रोजी पहाटे ३:१० वाजता परतीचे विमान अहमदाबादहून निघेल आणि पहाटे ४:४५ वाजता नवी मुंबईत पोहोचेल. अकासा एअरच्या या धाडसी आणि कौतुकास्पद निर्णयामुळे मुंबई आणि बेंगळुरूच्या क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचे उधाण आले असून, या विमानांच्या तिकिटांसाठी आतापासूनच बुकिंगची झुंबड उडाली आहे.






