Wednesday, July 3, 2024
Homeमहत्वाची बातमीश्रीमंतांना फसविणारी आंतरराज्यीय टोळी

श्रीमंतांना फसविणारी आंतरराज्यीय टोळी

  • गोलमाल : महेश पांचाळ

सर नमस्कार, मी सौरव शर्मा. रिलेशनशिप मॅनेजर, सिटी बँक डायनर्स क्लबकडून बोलत आहे. आपण बी.एम.डब्लू, मर्सिडिज कार खरेदी केल्याबद्दल आपले अभिनंदन. आपल्याला आणखी एक खूष खबर आहे की, आपण सिटी बँक डायनर्स ब्लॅक कार्ड मिळण्यासाठी पात्र आहात. सिटी बँक डायनर्स क्लब इंटरनॅशनल क्रेडिट कार्ड आपण घेतल्यास लाइफटाइम मुंबईतील तुलसीवाडी, ताडदेव येथील नामांकित वेलिंग्टन क्लबमध्ये मोफत मेंबरशीप आपल्याला मिळणार आहे.”मोठी खरेदी केल्यानंतर अनेक ऑफर असल्याचे फोन येतात. त्यामुळे हाही फोन असेल असे जगदीश शेट्टी (नाव बदलेले) यांना वाटले. त्यानंतर सौरभ शर्मा यांनी त्याबाबतचे माहितीपत्रके पाठवून एक लिंक शेट्टी यांच्या मोबाइलवर शेअर केली. बस ही माहिती भरून द्या असा आग्रह केला. त्यानंतर शेट्टी यांनी त्या लिंकवर नाव, पत्ता, आधारकार्ड, पॅनकार्ड ही वैयक्तिक माहिती पाठवली. शेट्टी यांना डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनचे सर्टिफिकेट पाठवण्यात आले. दोन-तीन दिवसांत मुंबईतल्या वेलिंग्टन क्लबचे मोफत मेंबरशिप मिळेल असे आश्वासन देण्यात आले; परंतु घडले भलतेच. शेट्टी यांच्या एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे तनिष्क, रिलायंस डिजिटल चेन्नई येथे अनोळखी व्यक्तींकडून रु. ९ लाख ८१ हजार १८४/- ची खरेदी केल्याचे समजले. विशेष म्हणजे डायनर्स क्रेडिट कार्ड शेट्टी यांना न देता त्यांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी शेट्टी यांनी पश्चिम प्रादेशिक सायबर विभागाकडे तक्रार केली. सिटी बँक डायनर्स क्लबच्या नावाने मुंबई व नवी मुंबई परिसरात ३२ पेक्षा अधिक तक्रारी दाखल झाल्याची बाब तपासात पुढे आली.

पोलीस पथकाने एकूणच गुन्हे कशा प्रकारे घडत आहेत याची प्रत्यक्ष माहिती फिर्यादींकडून घेतली. यावेळी एम. आय. कंपनीचा मोबाइल पोर्टर कुरियर सर्व्हिसद्वारे डिलिव्हर करून तो हॅक करून तनिष्क, रिलायंस डिजिटल येथे क्रेडिट कार्डचा वापर करून मोठ्या रक्कमेची खरेदी होत असल्याचे तपासात उघड झाले. चेन्नई, तामिळनाडू, दिल्ली, सीतापूर, उत्तर प्रदेश, अहमदाबाद, गुजरात व मुंबई, महाराष्ट्र या वेगवेगळया ठिकाणावरून गुन्ह्यांचे ऑपरेशन होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा कौशल्याने तांत्रिक तपास करत या गुन्ह्यातील सात आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून तीन लाख ८८ हजार रुपयांची रक्कम जप्त केली. यातील मुख्य आरोपी अय्यप्पन मुरुगसेन वय ३५ वर्षे, यास दिल्ली विमानतळावरून अटक करण्यात आली.

अय्यप्पन मुरुगसेन याच्याविरोधात अमेरिकन एक्स्प्रेस क्रेडिट कार्डच्या नावाने फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्याने आयआयटीमधून अर्धवट शिक्षण सोडले असले तरी उच्चशिक्षित असल्याने संगणकीय ज्ञानाचा वापर करून मागील वर्षभरात मुंबई व नवी मुंबईत ३२ पेक्षा अधिक गुन्ह्यांत त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. तसेच गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात सिमकार्ड उपलब्ध करून देणारा एजंट प्रेमसागर रामस्वरूप, वय २३ वर्षे, यालाही हरियाणा येथून अटक करण्यात आली. आंतरराज्यीय टोळीने मोठ्या प्रमाणात बनावट सिमकार्डचा वापर करून स्वतःचे अस्तित्व लपवून वेगवेगळ्या ठिकाणी फिर्यादींच्या नावाने गोल्ड कॉईन व आयफोन मोबाइलच्या डिलिव्हरी घेऊन पुढे त्यांची विक्री केली आहे. पुढे गोल्ड कॉइन व मोबाइलची विक्री करून त्यातून मिळणारी रक्कम विविध बँक खात्यांतून मुख्य आरोपी अशीष रवींद्रनाथन याला मिळत होती. सिटी बँक डायनर्स क्लब इंटरनॅशनल क्रेडिट कार्ड या नावाने मुंबईतील नामांकित क्लबमध्ये मोफत मेंबरशीप मिळवून देण्याचे आमिष दाखवून श्रीमंत लोकांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला तामिळनाडू, हरयाणा, अहमदाबाद व दिल्ली राज्यातून जेरबंद करण्यात यश आले आहे.

या प्रकरणाचा संपूर्ण तपास पोलीस आयुक्त बृहन्मुंबई विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस उप आयुक्त डॉ. बाळसिंग राजपूत (सायबर गुन्हे), सहाय्यक पोलीस आयुक्त, रामचंद्र लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम प्रादेशिक सायबर पोलीस ठाणेचे प्र. पो. नि. सुवर्णा शिंदे यांच्या नियंत्रणाखाली पश्चिम प्रादेशिक सायबर पोलीस ठाणेचे पो. नि. महेंद्र जाधव, स. पो. नि. अमित उतेकर, पो. उ. नि. राहुल खेत्रे, दीपक तायडे, विजयकुमार घोरपडे, पो. ह. रवी बिरारी, पो. ना. सचीन ननावरे, पो. शि. केशव तकीक, ओमकुमार शिंदे, प्रवीण चाळके, मयूर इंगळे, अमोल काळे यांनी यशस्वीरीत्या केला.

नागरिकांना पोलिसांचे आवाहन

१. सिटी बँक डायनर्स क्लब इंटरनॅशनल क्रेडिट कार्डचे आमिष दाखवून फसवणूक झाली असेल तर त्यांनी पश्चिम प्रादेशिक सायबर पोलीस ठाणे, मुंबई येथे संपर्क करावा.

२. सिटी बँक किंवा कोणत्याही बँकेचे मेंबरशिप कार्ड अथवा मोबाइल मोफत मिळण्याच्या ऑफरला बळी न पडता खातरजमा करावी.

३. व्हॉट्सअॅपद्वारे प्राप्त लिंकवर स्वतःची वैयक्तिक माहिती भरू नये. तसेच स्वतःचे पॅनकार्ड, आधारकार्ड यांसारखी केवायसी संबंधित माहिती व्हॉट्सअॅपद्वारे पाठवू नये.

४. अनोळखी व्यक्तीने फोनवरून वैयक्तिक व गोपनीय माहिती विचारल्यास ती देऊ नये.

५. नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता व आपली वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तींना न देता सजग राहून आपली फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -