कथा : विजया वाड

‘आई, मला खरं तर दाखवून लग्न हा प्रकार २०२१ मध्ये बाद वाटतो गं’, निकिता आपल्या आईला म्हणाली.
‘मला का हौस आहे?’ आई म्हणाली.
‘अगं मित्र खूप असले तरी त्यात नवरा मटेरिअल हवं ना!’
‘ते खरंच आहे निकिता, पण त्यातल्या त्यात बघ. आपलं ऐकणारा, नरम स्वभावाचा, मुख्य म्हणजे सुखवस्तू नि मिळवता.’
‘असा एकही नाही मित्र कंपनीत.’
‘मग परिचय विवाहाला पर्याय नाही आणि दाखवणं म्हणजे काय? तो आपल्या घरी येतो म्हणून दाखवणं! आपण जाऊ त्याच्याकडे. आहे काय आणि नाही काय!’
अशी दिनकर शेंडेला बघायला निकिता शेंडे वाड्यात गेली. वाड्याच्या प्रवेशद्वारावर प्रभाकर, दिवाकर, सुधाकर, दिनकर अशी ओळीने चार नावे आणि खाली ‘शेंडे’ मोठ्ठ्या ठळक अक्षरात त्याला लागूनच खाली प्रभावती, दीपा, सुधा शेंडे मागे सौ. ठळक अक्षरात. आई निकिताला म्हणाली,
‘यातले प्रभाकर आणि सौ. प्रभावती त्र्याऐंशी नि शहात्तर आहेत.’
‘हो का?’
‘दिवाकर नि सुधाकर प्रभाकर नि प्रभावतीचे सुपुत्र. मध्यवयीन आहेत दोघे.’ अन्य महत्त्वपूर्ण माहिती.
‘हो का?’ पुनश्च निकिता.
‘दीपा नि सुधा त्यांच्या पत्नी.’
‘आई आलं लक्षात. दिनकरला मी आवडले आणि मला तो पसंत पडला, तर प्रभावती, दीपा, सुधा याबरोबर निकिता हे नाव लागेल. बरोबर ना आई? पण हा जुनाट वाडा…’
‘अगं, कल्याण शहरातला हा सर्वात जुना वाडा आहे बाळ.’
‘असेल. पण जुनाट आहे हे तुला कबूलच केले पाहिजे.’
‘बरं बाई वाद नकोत की विवाद नकोत. निकिता, दिनकर म्हणजे सोन्याचा तुकडा आहे. अगं एम. एम. एम. सी. एच. इतकं सर्वोच्च शिक्षण. देखणं रूपडं, सहा फूट उंची. काहीच कमी नाही.’
‘तुझी मुलगी पण एम ए. एम फिल्ड पीएच. डी. आहे.’
‘हे काय? दोघीच?’ प्रभावतीनी विचारलं.
‘आधी त्या दोघांची पसंती होऊदे. असं मनी आलं मग कुटुंब भेटेल.’
‘दिनकर… ए दिनकराऽऽ दिन्याऽऽ दिनूऽऽ म्हातारीनं हाकांचा जोरदार सपाटा लावला. निकिताला शंका आली की दिन्या बहिरा तर नाही ना?’
पण दिनकर ऊर्फ दिन्या ऊर्फ दिनू नाचत नाचतच खाली आला. त्याच्या कानात इयरप्लग्ज होते नि तो गाणी ऐकत होता.
‘दिनू, मुलगी बघायचा कार्यक्रम आहे. जरा जबाबदार पुरुषासारखा वाग.’ म्हातारी बडबडली.
‘नाही नाही. मला असाच मुलगा हवा. अगदी अस्सा! ‘जुनाट’ वाड्यातला ‘नवाट’ मुलगा.’ निकिता म्हणाली. पण मनातल्या मनात बरं. उघड फक्त यवढंच म्हणाली, ‘काही विचारायचं का तुम्हांला?’
‘नाय बाँ. मला तुम्ही एकदम हंड्रेड पर्सेंट पसंत आहात.’
‘क्काय?’
‘मग काय. मनकी बात बोलदी आपनने! आपको मै कैसा लगा? खुल्ला बोलो. नाही आवडलं तरी राग नाही. इस बगियनमें हजारो फूल है! मेरे नाम भी एक होगाच!’
‘तो यह फूल आपके नाम!’ ती न लाजता म्हणाली.
‘एकच अर्ज आहे. प्रभावती मॅडमना खूश ठेवायचं. माझा स्वत:पेक्षा तिच्यावर जीव आहे. एवढं जमेल?’
‘नक्की जमेल.’ असं ते झट की पट जमून गेलं लग्न. आईला भारी चिंता होती निकिता कसं जमवेल? पण महिनाभरात प्रभावतीनीच प्रशस्तिपत्र दिलं. ‘नातसून असावी तर अशी!’ निकिताची आई म्हणाली,
‘काय जादू केलीस बाई?’
‘सारी कामे मी माझ्या मनासारखीच करते पण त्याच्या मर्जीने.’
‘हे तर कोड्यात बोलणे झाले गो माझी बाय.’
‘मी खिचडी करायची ठरवली की म्हणते, खूप दिवसांत तुमच्या आवडीची मुगाची खिचडी झाली नाही. एक वाटी, दीड की दोन? आपण सांगा.’
‘दीड वाटी.’ ‘त्या आज्ञा करता करता सुखावतात, मर्जी मेरी मगर खुशी उनकी.’ ती हसली. मग म्हणाली, पेहरावाचंही तसंच.
मला आवडणा-या चार साड्या त्यांच्यासमोर धरते. आपण सांगाल तीच धारण करते असं म्हणते. त्या एवढ्या खूश होतात. समोरची कुठलीही उचलली तरी माझ्याच आवडीची गं! मेरेकू क्या प्रॉब्लेम? लेक खुदकन हसली. आई सुखावून म्हणाली,
‘बोलाविले तुला येथे, गोष्टी युक्तीच्या सांगाया
तू तर माझ्याहूनही चतुर, शब्द माझे वाया
कशी खिशांत घातली, आजेसासू बघता बघता
माझी मिटे चिंता सारी, माझी गुणाची गं निकिता.’
तर तरुण मित्र – मैत्रिणींनो, निकिता चार युक्तीच्या गोष्टी करीत जशी जेहेत्ते काळाचे ठायी आपल्या सासरघरी सुखी झाली, तसे प्रत्येक नवविवाहितेने व्हावे असे मला फार्फार वाटते. म्हणू गोष्टी युक्तीच्या तुमचेपर्यंत पोचविल्या.
सुखी व्हा पोरींनो!