Friday, April 26, 2024
Homeमहत्वाची बातमीTourists : फणसाड अभयारण्याकडे पर्यटकांची पाठ

Tourists : फणसाड अभयारण्याकडे पर्यटकांची पाठ

वन विभागाने जनजागृती करण्याची मागणी

मुरुड (वार्ताहर) : फणसाड अभयारण्यात अनेक पक्षी प्राण्यांचा राबता असूनही ते दुर्लक्षित झाले आहे. शिवाय पर्यटकांसाठी (Tourists) सोई-सुविधाही वन विभागामार्फत उपलब्ध आहेत.

पक्षी-प्राण्यांच्या निरीक्षणासाठी मनोरे, खास घरेही पर्यटकांकरता बांधली आहेत. बैलगाडी सफरीचा आनंदही येथे घेता येतो. मात्र तरी देखील फणसाड अभयारण्यात अनेक निसर्गप्रेमींची पावले जात नसल्याचे चित्र आहे.

मुरूड तालुक्यातील सुपेगाव येथे फणसाड अभयारण्य हे सुमारे ५४ कि.मी. चौरस परिक्षेत्रात विस्तारलेले आहे. जैव विविधतेने समृद्ध अशा अभयारण्यात विविध पक्षी, प्राणी व इतर वन्यजीव यांचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास होत असतो. त्यांचे योग्य संवर्धन वन विभागातर्फे केले जात आहे. तथापि या जैवविविधतेमध्ये १७ प्रजातींचे साप, १२ उभयचर प्राणी, १६ सस्तन प्राणी, २५ प्रजातींचे कोळी, १४ सागरी जीव आणि तब्बल १३२ प्रजातींची फुलपाखरे, १९ प्रकारचे प्राणी आहेत. ज्यामध्ये बिबट्या, सांबर, भेकर; तसेच अलिकडे रानगवे आणि रानकुत्र्यांचाही समावेश आहे.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे २०२२ या काळात झालेल्या पक्षी गणनेत १६२ प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. निसर्ग आपल्याशी बोलतो फक्त त्याची भाषा समजून घेणे गरजेचे आहे. तसेच काही संवाद या पक्ष्यांच्या बाबतीत निसर्ग करतो. माशीमार खाटीक, बेडक मुखी, कोतवाल, कोकीळ, टिकलेचा कस्तूर, विविध प्रजातींचे घुबड, निळ्या चष्म्याच्या मुंगशा, मलबारी कवड्या, धनेश, रंगीत तुतारी, कालव फोड्या, तिर चिमणी कस्तूर आदी दुर्मिळ प्रजातींची नोंद या पूर्वीच्या पक्षी गणनेत करण्यात आली आहे.

तथापी केंटीश चिखली, नीलकंठ, धान वटवट्या, यलो ब्रोड या पक्ष्यांची पहिल्यांदाच अभयारण्यात नोंद करण्यात आली आहे. फणसाड हे जैवविविधतेने वैभव संपन्न असूनही पर्यटक संख्या का वाढत नाही, हा कळीचा मुद्दा आहे. फणसाडचे पर्यटन बहरण्यासाठी वन विभागाने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी समुद्र किनाऱ्यांवर माहिती केंद्रे सुरू करावीत, असे निसर्गप्रेमींचे म्हणणे आहे.

फणसाड अभयारण्यात तब्बल २७ पाणस्थळे आहेत. यातील चिखलगाण पाणस्थळावर अनेक पक्षी, प्राणी येतात. त्यांचे जवळून निरीक्षण करता यावे, यासाठी एक खास घर बांधण्यात आले आहे. तसेच पुण्याचा माळ, चाकाचा माळ, दांडा, गाडग्याचा माळ या ठिकाणी निरीक्षणासाठी उंच मनोरे उभारले आहेत. यातून दिसणारे दृश्य मन मोहून टाकते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -