सद्यस्थितीचा विचार केल्यास आजची स्त्री आणि कुटुंब दोन्ही गोष्टी एकमेकांपासून वेगवेगळय़ा करता येत नाहीत. इतक्या त्या एकरूप झाल्या आहेत. एकवेळ पुरुषाविना कुटुंब पूर्ण होईल. मात्र स्त्रीशिवाय कुटुंब कायम अपूर्ण असते.

स्त्री हा कुटुंबाचा कणा असतो. पूर्वीच्या काळातही तिची भूमिका कण्याची होती, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. कुटुंबांची व्याख्या काळानुसार बदलत गेली. माझ्या लहानपणी कुटुंब म्हणजे सर्व सख्खे-चुलत धरून १५-२० जणांचं असायचं. त्याकाळीही त्या विस्तारीत कुटुंबाचा कणा स्त्रीच असायची. त्या काळी, म्हणजे साधारण पन्नासएक वर्षापूर्वी, स्त्रीया शिकत असल्या, तरी ते तेवढय़ापुरतंच असायचं. कित्येकींना तर आई-वडिलांनी लग्न करून दिलं म्हणून शिक्षण सोडावं लागायचं. शिक्षणाचा संबंध तेव्हाच्या काळी आजच्यासारखा अर्थर्जनाशी लावलेला नव्हता.

कुटुंब ही संस्थाच मुळी स्त्रीयांमुळे सुरू झाली आहे. कुटुंब व्यवस्था अवतरण्यापूर्वी मनुष्य भटक्या अवस्थेत होता. शिकार, कंदमुळं जिथे मुबलक प्रमाणात मिळेल, अशा जागेच्या शेधात भटकत जायचं. अशी जागा मिळाली की तेथील अन्न संपेपर्यंत तिथे राहायचं आणि त्या ठिकाणचं अन्न संपलं, की मग पुन्हा नवीन जागेच्या शोधात निघायचं. हाच घटनाक्रम वर्षानुवर्ष चालू असायचा. त्या काळचं मनुष्य जीवन, माणसापेक्षा प्राण्यांच्या जवळचं होतं. पुढे कधीतरी शेतीचा शोध लागला आणि मग एकाच जागी राहूनही अन्न मिळवता येतं, हे माणसाच्या लक्षात आलं आणि भटका माणूस स्थिर झाला. शेतीच्या शोधाला कारणीभूत झाली, ती स्त्री. याचाच अर्थ असा की, मनुष्यप्राण्याला ‘माणूस’ म्हणून ओळख मिळवून दिली, ती स्त्रीने. शेतीचा शोध ही मनुष्याच्या उत्क्रांतीतील अतिशय महत्त्वाची घटना ठरली कारण प्राण्यांसम जीवन जगणारा माणूस, इथून पुढे मनुष्य म्हणून जगू लागला. भटका मनुष्य स्थिर झाला आणि नवरा-बायको-मुलं कुटुंब व्यवस्था आकाराला आली. स्त्री जन्मदात्री होतीच, आता ती कर्तीही झाली..!

मनुष्यप्राण्याला माणूस बनवणारी आणि जिच्यामुळे कुटुंबवव्यस्था जन्माला आली, ती स्त्री त्या कुटुंबाचा कणाच कशाला, पायाही न होती, तरच नवल. स्त्री हा कुटुंबव्यवस्थेचा पाया झाली, तो आजतागायत आणि पुढेही राहील. स्त्री ही नुसतीच कुटुंबाचा कणा नाही, तर जागायचं कशाला हे शिकवणा-या संस्कृतीचा स्त्रोतही आहे. प्राणी अवस्थेतून मनुष्य अवस्थेत येताना एक ठळक फरक घडला आणि तो म्हणजे मनुष्य सुसंस्कृत होत गेला. संस्कृतीला स्त्रीनेच जन्म दिला असावा, हे ‘संस्कृती’ या स्त्रीलिंगी शब्दांवरूनही कळते.

कुटुंबाचा कणा असलेली स्त्री आज घर आणि कार्यालय अशा दोन्ही आघाडय़ांवर लढताना दिसतेय. तिची दमछाक होतेय हे खरं असलं, तरी शक्तीचा अमर्याद स्त्रोत असलेली ती, या दोन्ही आघाडय़ांवर समर्थपणे लढताना दिसतेय. कालर्प्यत घरात असणारी स्त्री, अर्थार्जनासाठी घराबाहेर पडल्याने, तिची नवनवीन क्षितिजं धुंडाळण्याची आसं वाढू लागली. कर्तृत्वाची नवी क्षेत्र तिला खुणावू लागली. तिच्या आयुष्यात आता ‘करिअर’ नावाची एक नवीनच नवलाची गोष्ट आली. गेल्या काही वर्षातील सर्वच क्षेत्रातील घटनांवर नजर टाकली, तर घराबाहेरची जबाबदारीही स्त्री समर्थपणे पेलताना दिसते. असं असलं तरी, काही तुरळक अपवाद वगळता, जेव्हा कुटुंब आणि करिअर यातील कुठलीही एक गोष्ट निवडायची पाळी येते, तेव्हा मात्र स्त्री कुटुंबाला प्राधान्य देताना आढळते. पुरुषाच्या कर्तृत्वाला आभाळ मोकळं करून देताना दिसते. उगाच नाही प्रत्येक कर्तृत्वान पुरुषाच्या मागे एक स्त्री असतेम असं म्हणत. आपली पुरुषप्रधान समाजव्यवस्था आता हळूहळू मागे पडताना आढळत असली, तरी अजून ती म्हणावी तशी संपलेली नाही. काही कुटुंबांमध्ये मात्र त्या कुटुंबातील स्त्रीतल्या पोटेन्शिअलला ओळखून तिला त्या कुटुंबातल्या इतर सदस्यांचा खंबीर पाठिंबा मिळू लागलाय. हे चित्र अजूनही दुर्मीळ असलं, तरी आश्वासक आहे.

स्त्रीशिवाय कुटुंबं अशक्य आणि कुटुंबाशिवाय समाज अशक्य. म्हणून तर स्त्री हा केवळ कुटुंबांचाच नव्हे, तर समाजाचा आणि पयार्याने एखाद्या देशाचाच पाया असतो. म्हणून ज्या समाजात स्त्री दुय्यम होते, त्या समाजाचं भवितव्य अवघड होते. मध्यपूर्वेतील देशात आजही स्त्रीयांना, स्त्री म्हणून अनेक बंधनांना तोंड द्यावं लागतं. तेथील देश खनिज तेलामुळे समृद्ध जरी झाले असले, तरी संस्कृतीच्या पातळीवर ते अजून प्राणी अवस्थेतच आहेत. याचं कारण स्त्रीचं दमन. कुटुंब, समाज आणि देश यांचं अस्तित्व टिकवायचं असेल, तर कुटुंब आणि स्त्री यांचं नातं ओळखून त्याप्रमाणे समाजव्यवस्था निर्माण करायला लागेल. स्त्रीमधील प्रचंड ऊर्जेला वाव द्यावा लागेल अन्यथा ती ज्वालामुखीसारखी उसळून बाहेर यायला वेळ लागणार नाही. फरक एकच असेल, ज्वालामुखी विध्वंस करतो तर स्त्री काहीतरी विधायक करेल. या दोघांत साम्यही आहे. ज्वालामुखीच्या विध्वंसातून नवसर्जन होते आणि स्त्री तर स्वत:च सर्जन आहे.