Friday, April 26, 2024
Homeमहामुंबईनोकरी करणाऱ्या घटस्फोटित पत्नीला पोटगीचा अधिकार

नोकरी करणाऱ्या घटस्फोटित पत्नीला पोटगीचा अधिकार

मुंबई (प्रतिनिधी) : पत्नी कमावण्यासाठी सक्षम असली तरी पतीने तिची देखभाल करणे ही कायदेशीर तरतूद आहे. नोकरी करणाऱ्या घटस्फोटीत पत्नीलासुद्धा पोटगीचा अधिकार आहे, असे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने कोल्हापूर सत्र न्यायालयाने दिलेला निकाल कायम ठेवला.

कोल्हापुरातील याचिकाकर्त्यांचा सुमारे १३ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना एक मुलगा आहे. त्यांच्या घटस्फोटाचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाले. पत्नीने पती आणि त्याच्या घरच्यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत तक्रार दाखल केली आहे. त्यांचा १० वर्षांचा मुलगा आईबरोबर असतो. त्यामुळे मुलगा आणि स्वतःसाठी पोटगी मिळण्याची मागणी त्यांनी न्यायालयात केली होती. कोल्हापूर सत्र न्यायालयाने महिला आणि मुलाला ५ हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश पतीला दिले.

सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. पत्नी नोकरी करते आणि ती दर दिवशी सुमारे दीडशे रुपये कमावत आहे. त्यामुळे तिला स्वतंत्र पोटगी देण्याची आवश्यकता नाही, असा युक्तिवाद पतीच्या वतीने करण्यात आला होता. पत्नी स्वत:चा खर्च सहजपणे करत आहे कमावत्या पत्नीला वेगळी पोटगी देण्याची आवश्यकता नाही, असा दावा त्याने केला होता. मात्र न्या. एन. जे. जमादार यांनी हा युक्तिवाद अमान्य केला आहे.

या जोडप्याचे मे २००५मध्ये लग्न झाले होते. त्यांना २०१२ मध्ये मुलगा झाला. त्यानंतर पत्नीने याचिकाकर्ता आणि त्याच्या नातेवाइकांविरुद्ध घरगुती हिंसाचाराची तक्रार नोंदवली. जुलै २०१५ मध्ये न्यायदंडाधिकाऱ्यांनी मुलाला २ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. पुढे या आदेशाविरोधातील पत्नीचे अपील मार्च २०२१ मध्ये सत्र न्यायालयाने योग्य ठरवले. तसेच तिला व मुलाला देखभाल खर्च म्हणून महिना पाच हजार रुपये देण्याचे आदेश याचिकाकर्त्यांला दिले.

त्याविरोधात याचिकाकर्त्यांने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच पत्नी चांदीच्या वस्तू बनवणाऱ्या दुकानात नोकरीला आहे. शिवाय महानगर दंडाधिकाऱ्यांसमोरील उलट तपासणीतही तिने दिवसाला १०० ते १५० रुपये कमावत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे ती स्वत:चा सांभाळ करण्यास समर्थ असून सत्र न्यायालयाने देखभाल खर्चाचा चुकीचा आदेश दिल्याचा दावा याचिकाकर्त्यांने केला होता.

न्यायालयाने निरीक्षण नोंदवताना म्हटले की, सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत महिलांना काम करावे लागते ही आजच्या परिस्थितीची गरज आहे. त्यामुळे जरी ती १५० रुपये दरदिवशी कमावत असली व तिला ५ हजार रुपयांची पोटगी संमत झाली तरीदेखील ही रक्कम खर्चासाठी अपुरीच असणार आहे. जरी पत्नी कमावण्यासाठी सक्षम असली तरी पतीने तिची देखभाल करणे ही कायदेशीर तरतूद आहे. कमावत्या पत्नीच्या पोटगीच्या अधिकारात तिच्या अर्थार्जनामुळे अडथळा येऊ शकत नाही असे निरीक्षण न्यायालयाने मांडले आहे. तसेच पतीची याचिका अमान्य करून सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -