Saturday, April 27, 2024
Homeसाप्ताहिककोलाज“सी वर्ल्ड!”

“सी वर्ल्ड!”

मृणालिनी कुलकर्णी

श्री गणेशाच्या विसर्जनानंतर प्रामुख्याने ऑस्ट्रेलियाच्या भेटीत गोल्ड कोस्टमधील ‘सी वर्ल्ड’ या सागर साक्षरतेच्या उद्यानास (थीम पार्क) दिलेली भेट आठवली. सागरी प्राणिशास्त्र उद्यान! ही जगातील सर्वात मोठी सागरी प्राणी बचाव संस्था असून सागरी प्राण्याचे संरक्षण, संवर्धन, पुनर्वसन आणि त्यांना त्यांच्या अधिवासात आणून सोडणे हे कार्य अखंड चालू आहे. आजारी, जखमी, अनाथ, सागरी प्राण्यांना वाचविणे, त्यांची काळजी घेणे, त्यांसाठी प्राणीशास्त्रज्ञ, पशुवैद्यक, आहारतज्ज्ञ अशा अनेक प्रशिक्षित प्रशिक्षक तज्ज्ञांची समर्पित टीम २४/७ मदतीसाठी येथे कार्यरत आहे. चला तर समुद्री प्राण्यांचे नवीन जग पाहण्यासाठी, पाण्याखालील जगाचा शोध घेण्यासाठी, सागरी सस्तन प्राणी पार्कमधील माझे अनुभव शेअर करते. गोल्ड कोस्टच्या हेलेन्सवाले या स्टेशनवरून थीमपार्कला जाण्यासाठी बस सुटतात.

या ‘सी वर्ल्ड’मध्ये कुटुंबातील प्रत्येकासाठी शिक्षणातून मनोरंजन आहे. सुरुवातीलाच मुद्दाम बांधलेल्या वेगवेगळ्या आठ-दहा पाण्याच्या तलावाच्या कठड्याजवळ उभे राहता अनेक माशांच्या प्रजाती मुक्तपणे वर-खाली इकडून तिकडे पोहत असतात. काठाजवळ येऊन आपल्याशी मैत्री करतात. स्पर्शही करू शकतो. पालक लहान वयातच आपल्या मुलांना या सागरी जगाशी ओळख करून देतात. त्या जिवंत अनुभवामुळे मुलांचे गैरसमज दूर होतात. विषयाची आवड निर्माण होते.

पाण्याखालची जीवसृष्टी पाहण्यासाठी बाजूच्याच मत्सालयातील भिंतीएवढ्या थ्रीडी काचेमुळे उष्णकटिबंधातील स्ट्रिंग रे, शार्क, सागरी कासव आणि महासागराच्या तळाशी असणारे असंख्य प्राणी पाहतो. तीच दुनिया सागरी उद्यानात बाहेर पाहतो.

सर्व कुटुंबासाठी शार्क बे ही जागा छान आहे. शार्क माशांची प्रणाली चार भागांत विभागलेली आहे. शार्क माशांना, काचेच्या खिडक्यांतून, तलावात वरच्या पाण्यातून आणि पाण्याखालून तसेच तलावावर बांधलेल्या काचेच्या बोर्ड वॉकवरून चालताना पुन्हा पाण्याखालचे जग पाहतो आणि आतूनही फेरी मारली असता लक्षात आले, शार्क बे ही एक प्रचंड मत्सालय प्रणाली असून यातील काही शार्क प्रजाती धोकादायक असल्याने जलचर प्राण्यांसाठी एक मोठे साहसी क्षेत्र आहे.

स्नॉर्केलचा अनुभव असल्यास ट्रॉपिकल रिफ येथे पैसे भरून वीस मिनिटे पाण्याखाली प्राण्यांसोबत विहार करून नवा अनुभव घेत नवे जग पाहता येते.

शाळा कॉलेजच्या प्रयोगशाळेत छोट्या सीलबंद जारमध्ये जेली फिश पाहिले होते. जर्मनीला बर्लिनच्या मत्सालयात लहान-लहान असंख्य रंगीत जेली फिशच्या हालचाली पहिल्या होत्या; परंतु येथे एका पूर्ण खोलीत ग्रीन, पिंक, ब्लू अशा अनेक रंगात प्रकाशित मोठ्या आकाराचे, मुख आणि मुखाशी असलेल्या शुंडाकाची उघडझाप करणारे जेली फिश बंद मोठ्या जारमध्ये पाहतो. जेली फिशचे प्रकाशित जग अप्रतिम…. वरती प्रयोगशाळा आहे. गोल्ड कोस्टच्या ग्रिफिथ युनिव्हर्सिटीत जेली फिशच्या पुनरुत्पादनावर संशोधन चालू आहे.

या सागरी पार्कमध्ये, धृवीय अस्वल, पेंग्विन, डॉल्फिन यांचेच माणसाशी असलेले आत्मीयतेचे नाते, फीडिंग आणि मनोरंजनाच्या सादरीकरणात समजते. ध्रुवीय अस्वल (पोलर बिअर) पाहण्याचे ऑस्ट्रेलियातील हे एकमेव ठिकाण. खास प्रगत तंत्रज्ञाच्या आधारे आपण ध्रुवीय अस्वलाला तीन प्लॅटफॉर्मवरून पाहू पाहतो. तसेच लांब नाकाचा अंगावर फर असलेला ऑस्ट्रेलियाचा सील आणि समुद्र सिंह या सस्तन प्राण्यांना पाहून पर्यटक त्यांची वैशिट्ये जाणतात.

मोठ्या काचेच्या आतमध्ये उभ्या केलेल्या नैसर्गिक अंटार्टिक वातावरणात बारा-पंधरा किंग पेंग्विन चालताना, फिरताना, पंख हलविताना दिसतात. अंटार्टिकेवर पेंग्विनचे खाद्य, पालन-पोषणासाठी चार-पाच मार्गदर्शक आत होते. बाजूलाच अंटार्टिकावरील पेंग्विनला पाहण्यासाठी एक मिनिटाचा बर्फाळ वंडरलँडमध्ये राईडचाही अनुभव घेतला.

एका छोट्या तलावात डोंगरावरून वाहणाऱ्या नदीच्या वाहत्या पाण्यात दगड, वाळूत मोठ्या संख्यने छोटे-छोटे पेंग्विन पाण्यात खेळत होते, धावत होते, उड्या मारीत होते, पंखांनी पाणी उडवीत होते. या पेंग्विन पॉइंटवरही संगोपनासाठी माणसे होती. असा हा काचेच्या आतला आणि बाहेरचा पेंग्विनसोबतचा मौल्यवान अनुभव.

‘सी वर्ल्ड’च्या शैक्षणिक कार्यक्रमात डॉल्फिनचे विश्व समजण्यासाठी डॉल्फिनच्या नर्सरी तलावाला मुद्दाम भेट दिली. ‘सी वर्ल्ड’च्या शोच्या सादरीकरणात मुख्य आकर्षण डॉल्फिन शो… अडीच हजार प्रेक्षक बसू शकतील, असा स्टेडियम, समोरच सर्वात मोठा वालुकामय तळाचा तलाव. उत्सुकतेने साऱ्यांचे लक्ष तलावाकडे असतानाच वेळेवर डॉल्फिन येऊन स्वागताची तलावाला एक पूर्ण फेरी मारतो. काही मिनिटांनंतर ट्रेनरच्या हुकूमानुसार डॉल्फिनच्या साहसी खेळाला सुरुवात होते. क्षणाचाही विलंब न लावता डॉल्फिन गटागटाने येत कसरती करून दाखवितात. त्याची प्रसिद्ध पाण्याबाहेर येऊन उंच उडी! सारे कसे शिस्तीत आणि लयबद्ध. सादरीकरणाला कथानकाची, संगीताची, संवादाची जोड असल्याने शो चांगला रंगतो.

डॉल्फिनप्रमाणेच उद्यानासमोर असलेल्या ओपन थिएटरमध्ये सील प्राण्याच्या खेळाचे सादरीकरण केले जाते. लॅब १ या घरातून बाहेर येत दोन्ही बाजूला पाणी आणि मधील फळीवरून सील प्रेक्षकांच्या जवळ येतो नि परत जातो. सीलसोबत संवाद साधत मार्गदर्शक पर्यावरणासंबंधी जागृती करतो.

जे जे पाहणे आवश्यक, गरजेचे होते ते सर्व पाहिले. प्रत्येकाच्या आवडीनुसार रेंगाळणे वेगळे असू शकते. पर्यटकांसाठी तिकीट नसलेल्या एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यासाठी मोनो रेलची खूप मदत होते. शिक्षणाद्वारे समुद्री प्राण्यांचे संवर्धन आणि पुनर्वसन करण्यास आपण प्रोत्साहन देणं हे उद्दिष्ट सार्थ ठरते.

भारताला लाभलेल्या ८०१४ किलोमीटर लांबीच्या विस्तीर्ण समुद्र किनाऱ्यांची सुरक्षितता आणि संवर्धनासाठी अशा प्रकारच्या सागर साक्षरता करणाऱ्या ‘सी वर्ल्ड’ची भारतात गरज आहे. अशा थीमपार्कमधून सागरी साक्षरतेचे कार्य जोमाने चालते हा माझा अनुभव. सागरी प्राण्यांचे रक्षण, संरक्षण आणि आदर ही आपली जबाबदारी आहे. समुद्र सर्वांना सारखाच असतो. काही जण त्यातून मोती उचलतात, तर काही फक्त आपले पाय ओले करतात. तुम्ही त्यातून काय घेता हे महत्त्वाचे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -