पुणे (प्रतिनिधी) : पिंपरी-चिंचवड शहरात औरंगाबाद शहरातील घटनेची पुनरावृत्ती झाल्याचे पाहायला मिळाल. विनाकारण बाहेर फिरणा-या व्यक्तीला हटकल्यावरून आरोपी आणि दोन्ही मुलांनी पोलिसांची काठी घेऊन त्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणि भारतीय आपत्ती व्यवस्थापन कायदानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युनूस गुलाब आत्तार (वय ५०), मतीन युनूस आत्तार (२८), मोईन युनूस आत्तार (२४) अशी आरोपींची नावे असून यातील दोघांना वाकड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेप्रकरणी पोलीस शिपाई शंकर विश्वंभर कळकुटे यांनी फिर्याद दिली असून ते सध्या अतिक्रमण विभागात कार्यरत आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जमावबंदी आणि संचारबंदी करण्यात आली आहे. मात्र, अनेक नागरिक घराबाहेर पडत आहेत. आरोपी युनूस आत्तार हे देखील विनाकारण बाहेर फिरत असताना फिर्यादी पोलीस शिपाई यांनी त्यांना हटकले. तेव्हा, यावरून त्यांच्याशी वाद घालून आरोपी आणि त्यांच्या दोन मुलांनी हुज्जत घालत आरोपी मतीन याने पोलिसांची काठी घेऊन आणि युनूस आत्तार आणि मोईन आत्तार याने लाथा बुक्क्यांनी पोलीस शिपायास मारहाण केली आहे. या घटनेचा व्हीडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

संबंधित आरोपींनी पोलीस कर्मचा-याला जीवे मारण्याची धमकी देखील दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गंभीर बाब म्हणजे यातील मतीन आत्तार हा रेल्वे पोलिसात असून एका पोलीस कर्मचा-याला मारहाण त्याने केली आहे. घटना पिंपरी-चिंचवड शहरातील काळेवाडी परिसरात घडली आहे. घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सपना देवतळे या करत आहेत.