स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे देशात महान क्रांतिकारक म्हणून ओळखले जातात. (Bharat Jodo) स्वतः इंदिरा गांधी या देशाच्या पंतप्रधान असताना त्यांनी स्वातंत्र्यवीरांच्या स्वातंत्र्यलढ्यातील कामगिरीचा मुक्तकंठाने गौरव केला होता. शरद पवार मुख्यमंत्री असताना मुंबईतील दादर येथील वीर सावरकर मार्गावरील स्वातंत्र्यवीर स्मारकाचे उद्घाटन करताना सावरकरांचा उल्लेख ‘क्रांतिकारकांचे मुकुटमणी’ असा केला होता. सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली किंवा त्यांनी ब्रिटिशांकडून पेन्शन घेतले अशा शब्दांत त्यांना यापूर्वी कोणी कमी लेखण्याचा प्रयत्न केला नव्हता. राहुल गांधी यांनी “आपण प्रेमाची भाषा बोलतो”, असे सांगून ‘भारत जोडो’ यात्रा सुरू केली. पण महाराष्ट्रात येऊन त्यांनी सावरकरांवर अत्यंत आक्षेपार्ह भाषेत टीका केली. त्यांच्या टीकेचा सूरही सावरकरांविषयी द्वेष व्यक्त करणारा होता.

स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक काळ देशावर व राज्यांवर काँग्रेस पक्षाची सत्ता राहिली. देशाला सर्वाधिक पंतप्रधान व राज्याला सर्वाधिक मुख्यमंत्री काँग्रेसने दिले. काँग्रेसने सत्तेवर असताना नेहरू-गांधी परिवाराचा उदो उदो केला. पण स्वामी विवेकानंद, सुभाषचंद्र बोस, वल्लभभाई पटेल, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांना फारसे महत्त्व दिले नाही. सावरकरांविषयी वैचारिक मतभेद असू शकतात, पण त्यांच्याविषयी मत्सर आणि द्वेष पसरविण्याचे काम काँग्रेसच्या बड्या नेत्याने केले नव्हते. पण राहुल गांधी यांना स्वातंत्र्यवीरांविषयी फोबिया निर्माण झाला आहे, असे ते बोलत असतात. त्यांच्या अशा बोलण्यानेच ‘भारत जोडो’ यात्रेला महाराष्ट्रात गालबोट लागले आणि देशभरातून त्यांच्यावर नाराजीचा व निषेधाचा भडिमार झाला.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मुंबईत दादरला वीर सावरकर मार्गावर मोठे स्मारक आहे. या स्मारकात कधी राहुल यांनी डोकावले असते तरी सावरकरांचे मोठेपण त्यांना समजले असते. पण सावरकरांविषयी त्यांना कोण माहिती देतो, हे त्यांनाच ठाऊक. महाराष्ट्रात येऊन सावरकरांनी ब्रिटिशांची अनेकदा माफी मागितली, असे सांगणे आणि त्यांनी लिहिलेल्या पत्राच्या फोटो कॉपी फडकावणे तसेच सावरकर हे ब्रिटिशांची पेन्शन घेत होते, असे सांगणे याचा ‘भारत जोडो’ यात्रेशी काय संबंध आहे? सावरकर द्वेष पसरवणे हा राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रात अजेंडा होता काय?

सावरकरांची १९३७ मध्ये मुक्तता झाल्यावर ते राजकारणात सक्रिय झाले. त्याच वर्षी त्यांची हिंदू महासभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. सलग सहा वर्षे हिंदू महासभेचे ते अध्यक्ष राहिले. नंतर त्यांच्यावर गांधी हत्येचा आरोप ठेऊन त्यांचे राजकीय जीवन संपवण्याचा प्रयत्न झाला.

इंदिरा गांधींच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत सावरकर द्वेष नव्हता. इंदिराजींनी २८ मे १९७० रोजी सावरकरांच्या जयंतीला त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट काढले होते. १९८० मध्ये सावरकर जयंतीनिमित्त मुंबईतील दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला पाठवलेल्या शुभेच्छा संदेशात – “ब्रिटिश सत्तेचा निर्भयपणे सामना करणाऱ्या वीर सावरकरांचे भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. भारतमातेच्या या अद्वितीय सुपुत्राच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या समारंभाला माझ्या अनेक शुभेच्छा” असे त्यांनी म्हटले होते. मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकासाठी देशातील काँग्रेसची सत्ता असलेल्या अनेक राज्यांनी धनादेश पाठवले होते. स्वत: इंदिरा गांधींनी आपल्या स्वत:च्या वैयक्तिक बँक खात्यातून स्मारकाला ११ हजारांचा चेक पाठवला होता. आपल्या आजीच्या सावरकरांसंबंधी काय भावना होत्या, हे तिच्या नातवाला म्हणजे राहुल यांना ठाऊक नाहीत काय?

उपराष्ट्रपती के. आर. नारायणन यांनी स्वातंत्र्यवीरांच्या ११०व्या जयंतीनिमित्त दि. २० एप्रिल १९९३ रोजी लिहिलेल्या संदेशात सावरकरांचा उल्लेख ‘महानायक’ असा केला होता. “स्वातंत्र्य चळवळीतील एक बेडर स्वातंत्र्यसैनिक, कट्टर देशभक्त व सामाजिक सुधारणावादी”, असे त्यांना संबोधले होते. पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी १८ डिसेंबर १९९२ रोजी “सावरकर हे महान देशभक्त होते व त्यांची स्मरणिका म्हणजे त्यांच्या विचारांचा मौलिक ग्रंथ ठरेल”, असे म्हटले होते.

मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी ३ फेब्रुवारी १९९३ रोजी म्हटले की, “सावरकर हे उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. स्वातंत्र्यलढ्यात २ वेळा काळ्या पाण्याची शिक्षा भोगलेले ते दृढनिश्चयी होते. स्वातंत्र्य या एकाच ध्येयासाठी त्यांनी जीवनातील सर्व सुखे त्याज्य मानली.”

दि. २८ मे १९७९ रोजी उपपंतप्रधान बाबू जगजीवनराम यांनी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत सावरकर स्मारकाचा शिलान्यास केला. दि. २८ मे १९८९ रोजी उपराष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे उद्घाटन झाले. त्यावेळी मुख्यमंत्री शरद पवार, स्मारकाचे अध्यक्ष जयंतराव टिळक आदी मान्यवर नेते व्यासपीठावर उपस्थित होते. सावरकरांविषयी इंदिरा गांधी, जगजीवनराम, शंकर दयाळ शर्मा, शरद पवार, जयंतराव टिळक, के.आर नारायणन, नरसिंहराव, सुधाकरराव नाईक हे सर्व त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेले दिग्गज नेते चुकीचे बोलत होते, असे राहुल गांधी यांना म्हणायचे आहे का?

मुंबईत दादरला समुद्राकाठी स्वातंत्र्यवीरांचे स्मारक उभे राहिले, त्याचे श्रेय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार व माजी मंत्री व विधान परिषदेचे माजी सभापती जयंतराव टिळक यांना दिले पाहिजे. या तिघा दिग्गजांनी सावरकरांविषयी असलेल्या आदरापोटी हे स्मारक उभारले. मुंबई महापालिकेने स्मारकाला दादरची मौल्यवान जागा दिली हे मोठे योगदान आहेच. पण स्मारकासाठी टिळकांनी इंदिरा गांधींपासून विविध राज्यांकडे पाठपुरावा केला, हेही तेवढेच महत्त्वाचे होते. एका कार्यक्रमात राजीव गांधींच्या उपस्थितीत स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी ‘जयोस्तुते श्री महन्मंगले, स्वतंत्रते भगवती त्वा अहं…’ हे गीत सादर केले. ते गीत राजीव गांधी तल्लीन होऊन ऐकत असतानाच्या व्हीडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.

सावरकरांनी ब्रिटिशांना माफीपत्र लिहिताना ‘युवर ओबिडीअंट सर्व्हंट’ असे पत्राखाली लिहिले आहे, असा उल्लेख राहुल गांधी हे सतत करीत आहेत. पण त्या काळात पत्रव्यवहार करताना शिष्टाचार म्हणून तसे लिहिण्याची पद्धतच होती हे राहुल यांना कोण समजावणार? पंडित नेहरूंची पंजाबमधील नाभा जेलमधून सुटका व्हावी म्हणून मोतीलाल नेहरू यांनी १९२३ मध्ये असेच पत्र व्हाइसराय यांना पाठवले होतेच. महात्मा गांधी यांनी गव्हर्नर जनरल व लॉर्ड चेम्स फोर्ड यांच्याशी जो पत्रव्यवहार केला होता, युवर एक्सलन्सी ओबिडीअंट सर्व्हंट असेच म्हटले होते. पण अशा पत्रांवर नेहरू किंवा महात्मा गांधी यांच्यावर कोणी टीका केली नव्हती.

अंदमानमध्ये सेल्युलर जेलमध्ये सावरकरांनी जन्मठेप भोगताना कशा यातना सहन केल्या असतील, हे शब्दांतून मांडणेही कठीण आहे. तुरुंगात पोहोचताच त्यांना सहा महिने कोठडीत बंद करण्यात आले. खडी हात बेडी, एकांतवास, सात दिवस हात बेडी घालून उभे राहण्याची शिक्षा, चार-चार महिने साखळ दंड, दहा-दहा दिवस खोडा बेडी, अशा अमानवीय शिक्षा त्यांना देण्यात आल्या. त्यांना दिलेल्या कांजीला रॉकेलचा वास यायचा. जेवणात घाणेरडे किडे नि मांसाचे तुकडे असायचे. जळलेल्या चपात्या व कच्चा भात दिला जायचा. भाजी दिली, तर त्यात गोम सापडायच्या. कोलूच्या सहाय्याने खोबऱ्याचे तेल काढण्यासाठी घाण्याला जुंपले जात होते, गळ्यात डी म्हणजे डेन्जरस असा पट्टा घालायला लागायचा. आपल्याला दिलेल्या अनेक शिक्षा बेकायदेशीर असल्याने त्याची नोंद ठेवली गेली नाही, असे सावरकरांनी ‘माझी जन्मठेप’ या पुस्तकात म्हटले आहे. ११ वर्षे ते या कोठडीत राहिले. दोन जन्मठेप शिक्षा झालेले सावरकर हे ब्रिटिशांचे निष्ठावान सेवक कसे होऊ शकतात, अशी क्रूर शिक्षा भोगणारे सावरकर ब्रिटिशांना माफीपत्र कसे देऊ शकतात, असा साधा प्रश्नही राहुल यांना सुचला नसावा, याचे मोठे आश्चर्य वाटते.

शरद पवार यांनी सावरकरांचा गौरव करताना म्हटले होते, “ते आद्य क्रांतिकारक होते. स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात त्यांचे वेगळे स्थान आहे. हे एक महामानवाचे स्मारक असून सावरकरांची कामगिरी नव्या पिढीला प्रेरणा देणारी ठरेल.”

महान देशभक्त, जहाल क्रांतिकारक, प्रखर बुद्धिवादी, विज्ञाननिष्ठ, हिंदुत्ववादी, ओजस्वी वक्ते, समाजसुधारक असे सावरकरांचे वर्णन केले जाते. “ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला” अशी मातृभूमीविषयी ओढ असणारे स्वातंत्र्यवीर सावरकर, “मैं आपका सबसे जादा इमानदार नौकर बने रहना चाहता हूँ” असे ब्रिटिश सरकारला कसे म्हणू शकतील? पण राहुल यांनी ‘भारत जोडो’ पदयात्रा महाराष्ट्रातून जात असताना वारंवार तसा आरोप करून देशातील जनतेची मने दुखावली आहेत. काँग्रेस पक्ष या विषयावर मौन पाळून आहे.

-डॉ. सुकृत खांडेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here