Friday, April 26, 2024
Homeमहत्वाची बातमीमोदी सरकारचा मोठेपणा आणि खूप काही

मोदी सरकारचा मोठेपणा आणि खूप काही

सुनील सकपाळ

मावळते २०२१ हे वर्ष अनेकविध घटनांनी गाजले. त्यात राजकारणासह समाजकारणातील सर्वच घटनांचा उहापोह करता येणे शक्य नाही. देश ढवळून काढणाऱ्या प्रमुख दहा घटनांचा घेतलेला मागोवा.

शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकार एक पाऊल मागे

देशाच्या शेती क्षेत्रात महत्त्वाकांक्षी सुधारणा घडवून छोट्या शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीचा दावा करणारे तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. २९ नोव्हेंबर रोजी सुरू झालेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात हे कायदे मागे घेतले जातील, असे मोदी यांनी त्यावेळी जाहीर केले होते. त्यानुसार ते मागेही घेण्यात आले. या घोषणेनंतर कृषी कायद्यांविरोधात एक वर्षापासून दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेले शेतकरी आंदोलनही संपले. या निर्णयामुळे केंद्र सरकारची नामुष्की झाली, असा सूर विरोधकांनी लावला. पुढील वर्षी पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी विरोधकांच्या हातातील एक मुद्दा निसटला. मात्र, शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण एक पाऊल मागेही जाऊ शकतो, हेही मोदी सरकारने दाखवून दिले.

मुंबईत ड्रग्जविरोधी कारवाईरुन राजकारण

मुंबईत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग याच्या मृत्यूनंतर एनसीबीने ड्रग्सविरोधात कारवाईला सुरुवात केली होती. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी हे ड्रग्जचा वापर करणे, तसेच तस्करी, खरेदी विक्री यामध्ये अडकल्याचे पहायला मिळाले. वर्ष संपता संपता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानपर्यंत ही कारवाई पोहोचली. क्रूझ पार्टीवर टाकण्यात आलेल्या धाडीत आर्यन खानला याला अटक करण्यात आली आणि त्यासोबतच महाराष्ट्रासह देशभरात राजकीय वातावरण तापले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या कारवाईवर अनेक प्रश्न उपस्थित केले. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे हे भाजपाचे एजंट असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी अनेक पुरावेही समोर मांडले. दुसरीकडे समीर वानखेडे यांच्याकडून आर्यन खान प्रकरणाचा तपास काढून घेण्यात आला आणि त्यांची चौकशी सुरु झाली. आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर हे प्रकरण सध्या शांत झाले आहे.

भाजपने बदलले चार राज्यांचे मुख्यमंत्री

भाजप नेतृत्वाने २०२१ मध्ये सत्ता असणाऱ्या चार राज्यांना नवे मुख्यमंत्री दिले. गुजरात, कर्नाटक, आसाम, उत्तराखंडमधील राज्याचे मुख्यमंत्री बदलण्यात आले. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी अचानक राजीनामा दिला. भुपेंद्र पटेल यांना नवे मुख्यमंत्री बनवण्यात आले. रुपाणी यांच्या आधी कर्नाटकमध्ये येडियुरप्पा यांना खूर्ची सोडावी लागली. पक्षातील अनेक नेते त्यांच्यावर नाराज होते. बसवराज बोम्बई यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपविण्यात आले. याआधी उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर तिरथ सिंह रावत यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवण्यात आले. पण काही महिन्यांतच तिरथ सिंह रावत यांच्याकडून खूर्ची काढून घेत पुष्कर सिंह धामी यांना पदावर बसवण्यात आले. याआधी भाजपने आसाममध्ये नव्या नेतृत्वाला सोबत घेऊन निवडणूक लढवली आणि त्यानंतर मुख्यमंत्री बदलले. पाच वर्षानंतर सर्बानंद सोनेवाल यांच्या जागी हेमंत बिस्व सरमा यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्यात आले.

पंजाब काँग्रेसमध्ये अमरिंदर सिंग, सिद्धू आणि चन्नी यांची चर्चा

पंजाबमध्ये राज्य सरकार आणि सत्ताधारी काँग्रेस पक्ष हे २०२१ च्या शेवटच्या काही महिन्यांमध्ये राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी होते. पंजाब सरकारमध्ये फूट पडली आणि याचा मोठा परिणाम राज्यातील सरकारवर दिसला. तत्कालीन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि माजी क्रिकेटपटू आणि राजकारणी नवज्योत सिंग सिद्धू यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध पहायला मिळाले. त्याचा परिणाम म्हणजे पक्षात फूट पडली. काँग्रेस नेतृत्वाने प्रयत्न करुनही हा गुंता सुटला नाही आणि परिस्थिती अजूनच बिघडली. अखेर अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसमधील सदस्यत्व आणि मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पंजाब काँग्रेसमधील आमदारांमध्येच फूट पडलेली दिसली. चरणजीत सिंग चन्नी यांना मुख्यमंत्री केले असता सिद्धू यांचा त्यांच्यासोबतही वाद सुरु झाला आणि त्यांनी राजीनामा देऊन टाकला. पण नंतर त्यांचं मन वळवण्यात य़श आले.

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा ऐतिहासिक विजय

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने २०० हून अधिक जागा जिंकल्या. यासोबतच ममता या तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री झाल्या. भाजपने तृणमूलला चांगली लढत दिली. मात्र, ममता बॅनर्जी आणि त्यांचे राजकीय रणनीती सल्लागार प्रशांत किशोर यांनी बाजी मारलेली दिसली.

आसाम, पुद्दुचेरी भाजपमय

पश्चिम बंगालसोबत देशात २०२१ मध्ये चार अन्य राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक पार पडली. राजकीय दृष्टीकोनातून सर्व राजकीय पक्षांसाठी निवडणुका महत्वाच्या होत्या. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, पुद्दुचेरी आणि तामिळनाडूमध्ये झालेल्या या निवडणुकांमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पहायला मिळाले. आसाममध्ये भाजप सरकारने पुनरागमन केले. पुद्दुचेरीत पहिल्यांदा भाजपचे सरकार आले. केरळमध्ये डाव्यांचे सरकार पुन्हा आले तर तामिळनाडूत स्टॅलिन मुख्यमंत्री झाले.

शंभर कोटी नागरिकांचे लसीकरण

कोरोनावर कायमस्वरूपी मात करावयाची असेल तर प्रत्येक नागरिकाचे लसीकरण आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना प्रभावी राबवताना देशात शंभर कोटी लसीकरण पूर्ण झाल्याबद्दल देशातील नागरिकांचे अभिनंदन केले आहे. विक्रमी लसीकरणाच्या दृष्टीने २१ ऑक्टोबर हा दिवस महत्त्वपूर्ण ठरला. भारताने अवघ्या नऊ महिन्यांत हा टप्पा गाठला. हे यश संपूर्ण भारताचे आहे, भारतातील प्रत्येक नागरिकाचे आहे. आपण १३३ कोटी भारतीयांच्या सामूहिक भावनेचा, भारतीय उद्योग आणि विज्ञानाच्या विजयाचे साक्षीदार आहोत. या यशाबद्दल मी देशातील सर्व लस उत्पादक कंपन्या, लस वाहतुकीमध्ये गुंतलेले कामगार, आरोग्य क्षेत्रातील कर्माचारी या सर्वांचे मी कृतज्ञता व्यक्त करतो, असे मोदी यांनी यावेळी सांगितले.

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला कॅबिनेट विस्तार

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला मंत्रिमंडळ विस्तारदेखील २०२१ मधील मुख्य राजकीय घटनांपैकी एक होता. जुलै महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात ३६ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली, त्यात १५ कॅबिनेट आणि २८ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. सात राज्यमंत्र्यांना बढती मिळाली. नव्या विस्तारात महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह चौघांना मंत्रीमंडळात स्थान मिळाले. १५ कॅबिनेट आणि २८ राज्यमंत्री सहभागी होते.

पेगॅसस हेरगिरी प्रकऱणावरुन संसद ठप्प

केंद्र सरकारसाठी २०२१ हे वर्ष संमिश्र होते. एकीकडे पश्चिम बंगाल निवडणुकीत पराभव झालेला असताना दुसरीकडे पेगॅसस हेरगिरी प्रकऱणावरुन सरकारला विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागले. पेगॅसस स्पायवेअरचा वापर करत देशातील अनेक मोठे पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्यांचे मोबाईल हॅक करुन हेरगिरी करण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. गोपनीयतेचे हनन असल्याचं सांगत विरोधकांनी या मुद्दायावरुन संसदेचं कामकाज बंद पाडण्यात धन्यता मानली. शेवटी प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं आणि एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली.

सर्वात जुना पक्ष काँग्रेसची वाईट स्थिती

२०२१ वर्षात राजकारणात अनेक चढ-उतार पहायला मिळाले. दुसरीकडे देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेससाठी हे वर्ष फारच वाईट ठरले. निवडणुकांमध्ये काँग्रेसला निराशाजनक निकालाला सामोरे जावे लागले आणि दुसरीकडे अनेक महत्वाच्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग, उत्तर प्रदेशचे जितीन प्रसाद, सोनिया गांधींचा मतदारसंघ रायबरेलीमधील आमदार अदिती सिंह, प्रियंका गांधींचे निकटवर्तीय ललितेश त्रिपाठी, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष राहिलेल्या सुष्मिता देव, किर्ती झा आझाद, केरळमधील पीसी चाको अशा नेत्यांनी काँग्रेसपासून फारकत घेतली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -