Monday, May 6, 2024
Homeमहत्वाची बातमीविकासाच्या दिशेने निघालेय मीरा - भाईंदर

विकासाच्या दिशेने निघालेय मीरा – भाईंदर

महापालिका निवडणुकीचे वाजणार पडघम

अनिल खेडेकर

कोरोना संसर्गामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशाला अतिशय खराब गेलेले २०२० हे वर्ष उलटून गेल्यावर मावळत्या २०२१ चा प्रारंभीचा काळही लॉकडाऊन मध्ये सरला. त्यानंतर लॉक डाऊनचे शिथिल झालेले नियम, लसीकरणाला मिळालेला उत्तम प्रतिसाद यामुळे नागरिकांचे जनजीवन हळूहळू पूर्व पदावर आले आणि वर्षाचा शेवटचा कालखंड बऱ्यापैकी सुरळीत आणि आनंदात गेला. शहरातील ठप्प झालेली विकासकामे पुन्हा गतिमान झाली. शहरातील सिमेंट रस्ते, मेट्रोच्या कामांना गती मिळाली. ऑक्टोबरमध्ये जाणवू लागलेल्या पाणी टंचाईमुळे नागरिकांच्या तोंडाला फेस येण्याची पाळी आली होती. कोरोना नियमांचे उल्लंघन करत आंदोलने झाली.

अखेर मंजूर वाढीव पाणी पुरवठा शहराला मिळाल्याने पाणी टंचाई दूर झाली आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. महापालिकेकडून या वर्षी मालमत्ता कराची विक्रमी वसुली झाली. महापालिका अर्थसंकल्पात मालमत्ता कर उत्पन्नाचे मोठे साधन आहे. त्यामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. देशभरात सुरू असलेल्या केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्व्हेक्षण अभियानात मीरा – भाईंदर महानगरपालिकेने राज्यात दुसरा तर देशात आठवा क्रमांक पटकावला आहे. शहरातील नागरिकांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे. महापालिका परिवहन सेवेने सरत्या वर्षात अनेक बस मार्ग सुरू केले. त्यामुळे मीरा – भाईंदरमधून ठाणे, अंधेरी, बोरिवली येथे जाण्यासाठी प्रवाशांची चांगली सोय झाली आहे. वर्ष अखेरीस दीड वर्षे बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना आनंद झाला आहे.

सरत्या वर्षात काही अप्रिय घटनासुद्धा घडल्या आहेत. महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता दीपक खांबीत यांच्यावर गोळीबार झाला. सुदैवाने ते यातून बचावले गेले. तसेच अतिक्रमण विरोधी पथक कारवाईसाठी गेले असताना त्यांच्यावर फेरीवाल्यांनी हल्ला चढवला. अशा चार घटना घडल्या. त्यात अधिकारी व काही कर्मचारी जखमी झाले. सरत्या वर्षात पोलिस उपायुक्त कार्यालय, गुन्हे अन्वेषण विभाग यांना नविन इमारती मिळाल्या. पोलिसांना वाहने मिळाली. त्यामुळे त्यांच्या कामाचा वेग वाढणार आहे. मीरा – भाईंदर, वसई – विरार पोलीस आयुक्तलयाचे पाहिले सहाय्यक पोलिस आयुक्त विलास सानप यांनी सांगितले की, ‘या वर्षात अनेक ठिकाणी कारवाई करण्यात माझी टीम यशस्वी झाली. या भागात मोठ्या प्रमाणावर बार, लॉज असून वेश्या व्यवसाय चालतो. अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचे प्रकार वाढले होते. माझ्या टीमने वर्षभरात बार व लॉज वर धाडी टाकून कारवाई केली.

तसेच गावठी दारू, जुगार, अंमली पदार्थ, गुटखा यांच्या साठ्यावर कारवाई केली आहे. तसेच अनेक गुन्हेगार पकडले. बार, तसेच ऑर्केस्ट्रा बारच्या आड चालणारा वेश्या व्यवसाय, मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या गमनासाठी पुरविल्या जाणाऱ्या मुलींची सुटका करून संबंधितांवर पिटा कायदा नुसार कारवाई केली गेली. सामाजिक बांधिलकी जपत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले गेले. तसेच पोलिसांचे मनोबल वाढविण्याच्या दृष्टीकोनातून मदत केली. या वर्षात चांगले काम करण्याची संधी मिळाली. तसेच माझ्या पोलिस सहकाऱ्यांच्या मदतीने उत्तम कामगिरी बजावता आली याचे समाधान वाटते’.

मीरा – भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी सांगितले की, ‘सरत्या वर्षात महिलांसाठी अनेक उपक्रम राबविण्यात आले. दिव्यांगांना स्वयं रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी रिक्षा वाटप करण्यात आले. शहरातील नागरिकांना वाढीव पाणी पुरवठा उपलब्ध करून देऊन पाणी समस्या दूर करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या घोडबंदर येथील किल्ल्याच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तसेच शहरातील धरावी भागातील चिमाजी आप्पा याच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या धारावी किल्ल्याजवळ चिमाजी आप्पा यांच्या पुतळ्याचे अनावरण सरत्या वर्षाच्या काही दिवस अगोदर झाले’.

मीरा – भाईंदर महानगरपालिका परिवहन सेवेचे सदस्य अविनाश जागुस्टे यांनी सांगितले की, ‘सरत्या वर्षात शहराच्या परिवहन सेवेला चांगले दिवस आले. तोट्यात चाललेली परिवहन सेवा पुन्हा सुस्थितीत आली आहे. शहरातील प्रवाशंसाठी ठाणे, बोरिवली, अंधेरी तसेच शहरातील विविध भागात प्रामुख्याने नव्याने निर्मिती झालेल्या भागांतील कानाकोपऱ्यात बससेवा उपलब्ध करून देण्यात परिवहन सेवेला यश मिळाले आहे. येणाऱ्या नवीन वर्षात यापेक्षा अधिक चांगल्या सोयी – सुविधा उपलब्ध करुन देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे’.
आता सरत्या वर्षात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाली असून मृत्यूदर शून्यावर आला आहे. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या५० च्या आत आहे. हळूहळू शहर कोरोना मुक्त होण्याच्या मार्गावर आहे. येणारे नवीन वर्ष हे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे वर्ष आहे. नवीन वर्ष शहरासाठी समृद्धी, शांतता, विकास कामे, नागरिकांच्या आरोग्यासाठी चांगले जावो, अशी अपेक्षा शहरवासीय करत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -