यु टर्न म्हणजे उद्धव ठाकरे; प्रवक्ते आमदार नितेश राणे यांची टीका

कणकवली : यु टर्नचा आता नवीन अर्थ उद्धव ठाकरे. जिथे यू टर्न दिसेल तिथे उद्धव ठाकरे असं उच्चारलं जातं. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये एक पण दिलेला शब्द पाळला नाही. सोमवारी काहीतरी बोलायचं आणि बुधवारी काहीतरी वेगळंच बोलायचं. यालाच म्हणतात उद्धव ठाकरे आणि यु टर्न. म्हणून यु टर्नची भाषा संजय राजाराम राऊत यांनी करू नये. वचननाम्याच्या मुखपृष्ठावर आदित्य ठाकरे यांचा फोटो आहे. ते महिला सबलीकरणची भाषा कशी करू शकतात? देशाची आणि महाराष्ट्राची बेरोजगारी दूर करणे म्हणजे स्वतःच्या मुलांना वाईनची कंपनी उघडून देण्यासारखे नाही. अडीच वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या तरुणांची बेरोजगारी दूर झालेली नाही. फक्त राऊतांच्या दोन मुलींची आणि उद्धव ठाकरेंच्या दोन मुलांची एवढीच बेरोजगारी दूर झालेली आहे. त्यामुळे याला बेरोजगारी मिटवणे म्हणत नाही, असा सणसणीत टोलाही भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना लगावला. ते कणकवली येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

‘इंडी’ आघाडीला सरळ सरळ आपला पराभव दिसू लागला आहे. वातावरण पूर्ण मोदीमय झालेले आहे. संजय राजाराम राऊत ईव्हीएमच्या नावाने नाक रगडत बसले होते. त्या ईव्हीएम वर कोर्टाने देखील शिक्कामोर्तब केलेला आहे. भारत देशात निवडणुका या ईव्हीएम वरच होणार आहेत. असे स्पष्ट शब्दात कोर्टाने सांगितले आहे. देशाच्या जनतेने ठरवलेले आहे की, पंतप्रधान म्हणून तिसऱ्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करायचे आहे आणि एनडीएचे ४०० पेक्षा जास्त खासदार निवडून आणायचे आहे.

उबाठा सेनेचा जाहीरनामा जाहीर झाला. ज्याला साधा जाहीरनामा हातात धरता येत नाही ते लोक देशाचे नेतृत्व करण्यासाठी हिम्मत कशी करतात? अशा नेत्यांचे खासदार निवडून देऊन देशाच्या किंवा महाराष्ट्राच्या जनतेच काय भलं होणार आहे? जे उद्धव ठाकरे स्वतःच्या वडिलांचे विचार पुढे घेऊन जाऊ शकले नाहीत, सत्तेसाठी हिंदुत्व पणाला लावलं, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सत्तेच्या लाचारीसाठी गमावून टाकले, त्यांच्या शब्दावर महाराष्ट्राच्या जनतेला विश्वास नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध होणार आहे, असे वक्तव्य नितेश राणे यांनी केलं.

Yuvraj Singh: टी-२० वर्ल्डकपसाठी सिक्सर किंग युवराज सिंहला मिळाली मोठी जबाबदारी

मुंबई: आयसीसी पुरुष टी-२० वर्ल्डकप २०२४ची(icc t-20 world cup 2024) सुरूवात होण्यास आता जास्त वेळ नाही. आगामी टी-२० वर्ल्डकप १ जून पासून ते २९ जूनपर्यंत वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये खेळवला जाणार आहे. या आता या वर्ल्डकपबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मोठा निर्णय घेतला आहे. आयसीसीने टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर युवराज सिंहला टी-२० वर्ल्डकप २०२४चा अॅम्बेसिडेर म्हणून नियुक्त केले आहे. युवीच्या आधी आयसीसीने उसेन बोल्टला अॅम्बेसिडेर म्हणून नियुक्त केले होते.

युवराज सिंहने निर्णयावर व्यक्त केला आनंद

युवराज सिंहने टी-२० वर्ल्डकप २०२४चा अॅम्बेसिडेर बनवल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. युवराज म्हणतो की टी-२० वर्ल्डकपच्या माझ्या काही प्रेमळ आठवणी आहेत. यात एका ओव्हरमध्ये सहा षटकारांचाही समावेश आहे. यासाठी आगामी वर्ल्डकपचा भाग घेणे खूपच भारी आहे. युवराजने २००७च्या टी-२० वर्ल्डकपमध्य इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या ओव्हरमध्ये सहा षटकार ठोकले होते.

युवराजने पुढे सांगितले की वेस्ट इंडिज क्रिकेट खेळण्यासाठी शानदार जागा आहे. येथे चाहते क्रिकेट पाहण्यासाठी येतात आणि एक वेगळाच माहौल बनवतात. यूएसएमध्येही क्रिकेटचा विस्तार होत आहे आणि टी-२० वर्ल्डकपमच्या माध्यमातून मी त्याल डेव्हलपमेंटचा भाग हिस्सा होण्यासाठी उत्साही आहे.

४२ वर्षीय युवराज सिंगने सांगितले, न्यूयॉर्कमध्ये पाकिस्तान आणि भारत यांच्यात सामना रंगत आहे. जो या वर्षीचा जगातील सर्वात मोठ्या सामन्यांपैकी एक आहे. याचा भाग होणेआणि जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंना नव्या स्टेडियममध्ये खेळताना पाहणे सौभाग्याची गोष्ट आहे.

हा देश शरियतवर नाही, युसीसीवर चालेल

गृहमंत्री अमित शहांचा काँग्रेसवर हल्लाबोल

गुना : ‘पंतप्रधान मोदींनी या देशाच्या विकासात एससी, एसटी आणि ओबीसींना प्राधान्य दिले. दुसरीकडे या देशातील संपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. काँग्रेसचा हेतू आम्ही पूर्ण होऊ देणार नाही. हा देश समान नागरी कायद्यावर (युसीसी) चालेल. हा आपल्या राज्यघटनेचा आत्मा आहे. आम्ही उत्तराखंडमध्ये यूसीसी आणले, आता देशभरात लागू करू. काँग्रेसला देशात मुस्लिम पर्सनल लॉ आणायचा आहे. पण, हा देश शरियतवर नाही, युसीसीवर चालेल, असे प्रतिपादन करत गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.

लोकसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाले. आता तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारांचा प्रचार सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी गुना लोकसभा मतदारसंघात सभा घेत काँग्रेसवर जोरदार टीका केली.

‘काँग्रेस ओबीसीविरोधी पक्ष आहे. अनेक वर्षांपासून ओबीसी प्रवर्गातील लोकांना केंद्रीय संस्थांमध्ये आरक्षण दिले जात नव्हते. काँग्रेसने ७० वर्षे आपल्या मुलाप्रमाणे कलम ३७० वाढवले, तर पंतप्रधान मोदींनी हे कलम ३७० रद्द केले, असे अमित शहा म्हणाले.

‘पंतप्रधान मोदींनी या देशातून दहशतवाद आणि नक्षलवाद संपवला. आता ही निवडणूक देशाला तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनवण्याची निवडणूक आहे. पंतप्रधान मोदींनी देशात १ कोटी लखपती दीदी निर्माण केल्या, आता ही निवडणूक ३ कोटी मातांना लखपती दीदी बनवण्याची निवडणूक आहे. मोदींनी १० वर्षात देशातील कोट्यवधी गरीब जनतेसाठी खूप कामे केली आहे’, असेही शहा यावेळी म्हणाले.

उत्तर मुंबईत काँग्रेसला उमेदवार मिळेना! भाजपा आणि वंचितने घेतली प्रचारात आघाडी

मुंबई : लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरायला शुक्रवारपासून सुरू झाली आहे. मात्र अजूनही अनेक जागांवर उमेदवारांची घोषणा बाकी आहे. मुंबईतल्या उत्तर मध्य मुंबईसाठी गुरुवारी सायंकाळी वर्षा गायकवाड यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. मात्र उत्तर मुंबईत काँग्रेसला उमेदवार मिळत नाही, अशी चर्चा सुरू आहे.

उत्तर मुंबईत भाजपाने याआधीच पियुष गोयल यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या प्रचारालाही चांगलाच वेग आला आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीतर्फे बिना रामकुबेर सिंह यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांनीही प्रचारात आघाडी घेतली आहे. भाजपा आणि वंचितचा जोरदार प्रचार सुरु असताना इकडे काँग्रेसला मात्र योग्य उमेदवार मिळत नसल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते देखिल गळीतगात्र झाले आहेत.

दरम्यान, काँग्रेसतर्फे उत्तर मुंबईसाठी भाई जगताप, काँग्रेस जिल्हाध्यक्ष कालू बुधेलिया यांच्या नावाची चर्चा आहे. तसेच तेजस्वी घोसाळकर यांनी जर काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर त्यांना उमेदवारी दिली जाईल, अशा नावांची यादी पक्षश्रेष्ठींकडे पाठवलेली आहे. मात्र उत्तर मुंबईत घोसाळकर परिवाराचा अद्याप निर्णय होत नाही आणि उरलेले दोन उमेदवार निवडून येईलच याची शाश्वती नाही. त्यामुळे उत्तर मुंबईत काँग्रेस योग्य उमेदवाराच्या शोधात असल्याचे पाहायला मिळते.

Crime : भांडण सोडवायला गेला आणि जीवाला मुकला!

अलिबाग : अनेकदा लोक दुसऱ्यांची मदत करायला जातात. मग त्यात भांडण सोडवण्यासाठीची मदत असो वा इतर काही गरजेची मदत असो, मात्र अनेकांना त्यांनी केलेल्या मदतीची परतफेड वाईट स्वरुपात मिळते. अशीच एक धक्कादायक बातमी अलिबाग येथे घडली आहे. अलिबाग तालुक्यातील बुरूमखाण आदिवासी वाडी येथे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग तालुक्यातील वरसोली ग्राम पंचायत हद्दीतील बुरूमखान आदिवासी वाडी येथे संतोष बाळू वाघमारे, वय ४५ वर्षे आणि राहुल उदय वाघमारे, वय २२ वर्षे यांच्यामध्ये जुन्या वादावरून भांडण झाले. हे भांडण सोडविण्यासाठी संतोष यांचा मुलगा अजय तिथे गेला. याचा राग धरून राहुल वाघमारे याने दोन्ही हाताने त्याचा गाळा पकडुन त्याला खाली पाडले आणि त्याच्या छातीवर बसून पुन्हा गळा दाबला तसेच गुडघ्याने छातीवर आणि पोटावर मारहाण केली. या मारहाणीत अजय जागीच बेशुद्ध पडला. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात नेले असता, वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला मृत घोषित केले.

दरम्यान, या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात आरोपी राहुल वाघमारे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे.

Loksabha Election : मेळघाटातल्या चार गावांनी मतदानावर टाकला बहिष्कार

मतदारांना आणण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न ठरले असफल

अमरावती : मतदान हे प्रत्येक सुजाण नागरिकाचं कर्तव्य असतं. पण मतदारापर्यंत साध्या सुविधा पोहोचवण्यात सरकार अपयशी ठरत असेल तर मतदान केल्याचा नेमका उपयोग काय असा प्रश्न उपस्थित होतो. अशीच गंभीर परिस्थिती मेळगाव येथील चार गावांमध्ये उद्भवली आहे. या ठिकाणी मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकल्यामुळे मतदान केंद्रे ओस पडली. मतदारांना केंद्रापर्यंत आणण्यासाठी प्रशासनाने केलेले प्रयत्न देखील असफल ठरले.

मेळघाटातील रंगूबेली धोकडा, कुंड आणि खामदा या चार गावांमध्ये एकही मतदार मतदान केंद्राजवळ फिरकला नाही. ग्रामस्थांनी मतदान करावे, यासाठी प्रशासनाकडून बरेच प्रयत्न करण्‍यात आले. त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.

मेळघाटात अतिदुर्गम भागात वसलेल्या या चारही गावांना जोडणाऱ्या रस्‍त्‍यांची दुर्दशा झाली आहे. या गावात कुठले वाहन देखील पोहोचू शकत नाही, अशी अवस्था आहे. यासह वीज पुरवठा या चारही गावांमध्ये नाही, पिण्याचे पाणी देखील नाही. यासह आरोग्य सेवा देखील या गावांमध्ये उपलब्ध नाही. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी आणि निवेदने सादर करून देखील गावाच्या कुठल्याही प्रश्नांसंदर्भात कोणी दखल घेतली नाही. त्यामुळे या चारही गावातील ग्रामस्थांनी आम्ही मतदान करणार नाही, आमचा निवडणुकीवर बहिष्कार आहे, अशी भूमिका घेतली.

Deepak kesarkar : उत्कृष्ट खोटे कसे बोलावे याचा जीवंत नमुना आदित्य ठाकरे

दीपक केसरकर यांचा खोचक टोला

४०० खासदारांमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्गचे नारायण राणे असतील : उदय सामंत

मुंबई : सध्या देशात लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु असून राजकीय नेते एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातच आता पालकमंत्री व शिवसेना नेते दीपक केसरकर (Deepak kesarkar) यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. उत्कृष्ट खोटे कसे बोलावे याचा जीवंत नमुना आदित्य ठाकरे आहेत’, असा खोचक टोला त्यांनी लगावला. याउलट केंद्रीय मंत्री नारायण राणे (

) मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, खोटे उत्कृष्ट कसे बोलावे याचा जीवंत नमुना आदित्य ठाकरे आहेत. खोटे बोलणाऱ्यांमध्ये भारतात नंबर काढला तर हे राजपुत्र एक नंबरला जातील, याची मला खात्री आहे. आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची बदनामी करण्याच्या फंदात पडू नये. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या अटकेचा डाव निश्चितच करण्यात आलेला होता, असेही दीपक केसरकर म्हणाले.

वैभव नाईकांनाही लगावला टोला

पत्रकारांशी बोलताना दीपक केसरकर यांनी वैभव नाईक यांच्यावरही टीका केली. प्रत्येक गोष्टीत कुत्सित बोलून विकास होत नाही. जर्मनीबाबत लेखी करार झालेला आहे. वैभवजींचा स्थानिक पातळीवर गावागावात काम करण्यावर भर असतो. त्यामुळे नोकऱ्या, मोठ्या इंडस्ट्री यांबाबत ते फारशी माहिती घेत नसतील, असा टोला दीपक केसरकर यांनी लगावला.

नारायण राणे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील

केसरकर म्हणाले, महाराष्ट्राचे इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्यात खूप मोठा वाटा देवेंद्र फडणवीस यांचा राहिलेला आहे, त्यांच्या खांद्याला खांदा लावून एकनाथ शिंदे यांनी काम केलेले आहे. चिन्ह कुठलेही असले तरी महायुती म्हणून मतदान होत असते. त्यामुळे नारायण राणे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

४०० खासदारांमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्गचे नारायण राणे : उदय सामंत

दरम्यान, मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनीदेखील कोकणात नारायण राणे निवडून येतील, अशी खात्री व्यक्त केली आहे. ते म्हणाले, नारायण राणे यांनी कोकणाला न्याय दिलेला आहे. ४०० खासदारांमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्गचे नारायण राणे असतील हा शब्द देतो. पुढच्या वर्षी रत्नागिरी विमानतळावरून टेक ऑफ होईल. स्वतःची निवडणूक आहे, असे समजून प्रत्येकाने कामाला लागले पाहिजे, असे आवाहन करत, उद्योग परराज्यात गेले हे पाप ठाकरे गट आणि त्यांच्या प्रमुखांचे आहे, अशी टीका त्यांनी केली. नरेंद्र मोदी विरुद्ध कमकुवत राहुल गांधी अशी ही लढाई आहे. सर्वच्या सर्व जागा या महायुतीच्या निवडून येतील ही खात्री आहे, असंही उदय सामंत म्हणाले.

Devendra Fadnavis : महायुतीला मोदीसाहेबांचे जगातील पॉवरफुल इंजिन

या विकासाच्या गाडीमध्ये सगळ्यांना बसवून ‘सबका साथ… सबका विकास’… करत ही गाडी पुढे जातेय – देवेंद्र फडणवीस

पेण : आपल्या महायुतीला मोदीसाहेबांचे इंजिन असून हे इंजिन देशातील नव्हे तर जगातील पॉवरफुल इंजिन आहे. या इंजिनाला आपल्या वेगवेगळ्या अनेक घटक पक्षांचे डब्बे लागले आहेत. अशा डब्यांमध्ये दीन-दलित, गोरगरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, भटके विमुक्त, सगळ्यांना बसण्याची जागा आहे. ही विकासाची गाडी आहे. त्या गाडीमध्ये सगळ्यांना बसवून ‘सबका साथ… सबका विकास’… करत ही गाडी पुढे जाते आहे, असे स्पष्ट करतानाच तुम्ही सुनिल तटकरेंच्या घड्याळाचे बटन दाबताक्षणी रायगडची बोगीदेखील आमच्या मोदीसाहेबांसोबत लागते आणि रायगडच्या जनतेला विकासाकडे घेऊन जाते असे उद्गार भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पेण येथील विराट सभेत काढले.

या निवडणुकीत केवळ दोनच पर्याय : एकीकडे महायुती आहे तर दुसरीकडे राहुल गांधी यांच्या नेतृत्वात २६ पक्षांची खिचडी

ही निवडणूक ग्रामपंचायतींची… जिल्हा परिषदेची… नगरपंचायतीची… महानगरपालिकेची… विधानसभेची नाही… तर देशाच्या लोकसभेची आहे… देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे… कोणाच्या हातात देश सुरक्षित राहिल… कोण देशाला विकासाकडे नेऊ शकेल… कोण आमच्या येत्या पिढ्यांचे भाग्य आणि भवितव्य बदलू शकेल, याचा फैसला करणारी निवडणूक आहे… आणि या निवडणुकीत केवळ दोनच पर्याय आपल्यासमोर दिसत आहेत… पहिला पर्याय आहे विश्वगौरव… विकासपुरुष नरेंद्र मोदी आणि मोदींजींच्या नेतृत्वामध्ये आपली महायुती एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजितदादांची राष्ट्रवादी असेल आता मनसेही सोबत आहे. रिपाईसुध्दा आहे, अशी भव्य महायुती आहे आणि दुसरीकडे राहुल गांधी यांच्या नेतृत्वात २६ पक्षांची खिचडी आहे. असे दोन पर्याय आपल्यासमोर आहेत असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

दुसरीकडे काय अवस्था आहे. तिथे डब्बेच नाहीत. प्रत्येकजण सांगतोय मीच इंजिन आहे. राहुल गांधी म्हणतात मी इंजिन… पवारसाहेब म्हणतात मी इंजिन, उध्दव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे… मात्र आपल्याकडे बसायला ट्रेन आहे आणि बसायला जागाही आहे. परंतु इंजिनमध्ये किती लोकांना बसायला जागा असते. इंजिनमध्ये केवळ ड्रायव्हर बसू शकतो. सामान्य माणूस इंजिनमध्ये बसू शकत नाही आणि त्यांचे इंजिन कसे आहे. राहुल गांधी यांच्या इंजिनमध्ये फक्त सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांना जागा आहे तर शरद पवारांच्या इंजिनमध्ये सुप्रिया सुळेच बसू शकतात आणि उध्दव ठाकरे यांच्या इंजिनमध्ये आदित्य ठाकरेच बसू शकतात. इतर कुणालाही त्यांच्या इंजिनमध्ये बसायची जागा नाही… यांचे इंजिन कसे आहे तर राहुल गांधी दिल्लीकडे ओढतात… शरद पवार बारामतीकडे ओढतात आणि उध्दव ठाकरे मुंबईकडे ओढतात… त्यामुळे यांचे इंजिन जागेवरून हालतही नाही डुलतही नाही फक्त ठप्प पडलेले आहे. त्यामुळे एकच पर्याय आहे तो म्हणजे नरेंद्र मोदींचा… ज्यांनी या देशाला विकासाकडे नेले आहे असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

दहा वर्षांत देशातील २५ कोटी लोक हे गरीबी रेषेच्या वर आले

या देशात मोदींनी काय किमया केलीय तर दहा वर्षांत देशातील २५ कोटी लोकं हे गरीबी रेषेच्या वर आले. दहा वर्षात २० कोटी लोकं जे झोपडीत रहायचे त्यांना पक्के घर मिळाले. देशामध्ये ५० कोटी घरांमध्ये मोदींनी गॅस पोहोचवला. ५५ कोटी लोकांना शौचालयाची व्यवस्था केली. ६० कोटी लोकांच्या घरी पिण्याचे शुद्ध पाणी पोहोचवले. ५५ कोटी लोकांना ५ लाखांपर्यंत उपचार आयुष्यमान भारत माध्यमातून मोफत दिला. ६० कोटी तरुणांना मुद्राचे दहा लाखापर्यंत कर्ज विनातारण दिले. यात ३१ कोटी महिला आहेत की ज्या आज आपल्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. ८० लाख बचत गटांना ८ लाख कोटी रुपये दिले आणि महिलांना स्वतःच्या पायावर उभे केले.

महिलांना अधिकार देण्याचे काम मोदींनी केले

मोदी म्हणतात एक पुरुष पायावर उभा राहिला तर केवळ पुरुष उभा रहातो पण महिला पायावर उभ्या राहिल्या तर संपूर्ण कुटुंब पायावर उभे राहते. आता बचत गटांच्या महिलांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बसस्थानक, सरकारी जागा परिसरात विक्री केंद्र उभी करायला सांगितले आहे आणि आता २०२६ नंतर विधानसभेतही आणि लोकसभेतही महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे महिलांना अधिकार देण्याचे काम मोदींनी केले आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आणली जाणार

वेगवेगळ्या योजना शेतकऱ्यांसाठी आणण्यात आल्या आहेत. सगळे प्रश्न सोडवत आहोत, काळजी करू नका. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला जाणार आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान पुन्हा झाले तर अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आणली जाणार आहे. देशात आणि राज्यात रस्त्यांचे जाळे निर्माण होत आहेत. मोदींनी या देशातील भ्रष्टाचार संपवला आणि जनतेचा पैसा जनतेपर्यंत पोहोचवला आहे. कोरोना काळात या देशातील जनतेला लस तयार करून जिवंत ठेवण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केले, असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला.

त्यावेळी अनंत गीते यांना गुदगुल्या होत होत्या

अनंत गीते आमची मते घेऊन निवडून येत होते त्यावेळी त्यांना गुदगुल्या होत होत्या आणि आज आमच्यावर टिका करत आहेत. पण लक्षात ठेवा अनंत गीते, याठिकाणी खरी शिवसेना आमच्यासोबत आहे. हिंदूहदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारे एकनाथ शिंदे आमच्यासोबत आहेत. ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा विचार सोडला त्यांच्यासोबत जनता कधीही जाणार नाही, असेही देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.

अख्खा पेण सुनिल तटकरे यांच्या पाठीशी असेल. तटकरेंना चिंता करण्याचे कारण नाही. पुढील पाच वर्षे मोदींच्या हाती सत्ता देणार आहोत. त्यामुळे सुनिल तटकरे यांची निशाणी घड्याळ असून त्यावरील बटन दाबणार तेव्हा ते थेट मत मोदींना मिळणार आहे, असे आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.

UP News : परिक्षेत लिहिले फक्त ‘जय श्री राम’ अन् विद्यार्थी झाले ५६ टक्क्यांनी पास!

प्राध्यापकांवर होणार कठोर कारवाई

लखनऊ : सध्या देशभरात निवडणुकांचे वारे वाहत असताना राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या टीका-टिप्पणी हा चर्चेचा विषय ठरतो. त्याशिवाय देशभरात होणाऱ्या बाकी घडामोडीदेखील चर्चेचा चांगलाच विषय ठरत आहे. अशातच उत्तर प्रदेशात घडलेला एक अजब प्रकार समोर उघडकीस येत आहे. उत्तर प्रदेशामधील फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी परीक्षेत फक्त ‘जय श्री राम’ लिहले असून ते चक्क ५६ टक्क्यांनी पास झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याबाबत विद्यापीठाकडून संबंधित प्राध्यापकांची कसून चौकशी करत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं सांगितले जातं.

नेमकं प्रकार काय?

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार हा अजब प्रकार उत्तर प्रदेशमधील वीर बहादूर सिंह पूर्वांचल विद्यापीठात घडला आहे. विद्यापीठाच्याच एका माजी विद्यार्थ्याने दाखल केलेल्या माहिती अधिकार अर्जातून हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या विद्यापीठात फार्मसीच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या चार विद्यार्थ्यांनी फार्मसीच्या परीक्षेत पेपरमध्ये फक्त ‘जय श्री राम, आम्ही पास होऊ देत’ आणि रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्या अशा काही भारतीय क्रिकेटपटूंची नावं लिहिली.

परीक्षेचे निकाल आल्यानंतर हे विद्यार्थी तब्बल ५६ टक्क्यांनी उत्तीर्ण झाल्याची बाब समोर आली. दिव्यांशू सिंह नावाच्या एका विद्यार्थ्यानं परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या संशयामुळे एकूण १८ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका मिळाव्यात व त्यांची पुनर्तपासणी करण्यासाठी आरटीआयअंतर्गत अर्ज दाखल केला. या विद्यार्थ्याला अर्जाच्या उत्तरादाखल मिळालेल्या उत्तर पत्रिकांपैकी चार विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकांमध्ये हा सगळा मजकूर असल्याचं दिसून आलं.

प्राध्यापकांविरोधात पैसे खाल्ल्याचे आरोप

दरम्यान, विद्यापीठातील प्राध्यापक पैसे घेऊन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करत असल्याची तक्रार याआधीही समोर आली होती. यासंदर्भात संबंधित विद्यार्थ्याने उत्तर प्रदेशच्या राज्यपालांनाही पत्र लिहून तक्रार केली होती. त्यांनी २१ डिसेंबर २०२३ रोजी चौकशीचे आदेश दिले होते. अखेर यासंदर्भातला अहवाल सादर झाला असून संबंधित प्राध्यापक दोषी आढळून आले आहेत. हा प्रकार उघड झाल्यानंतर प्राध्यापकांवर लवकरच कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

Pune Accident : पुण्यात चारचाकी वाहनाची धडक लागून सात ते आठ गाड्यांचे नुकसान

चालकाला फिट आली आणि…

पुणे : पुण्यातून (Pune news) गेल्या काही दिवसांत अनेक धक्कादायक बातम्या समोर येत आहेत. गुन्हेगारीसोबतच (Crime) पुण्यात अपघाताच्या घटनांमध्येही (Pune Accident) प्रचंड वाढ झाली आहे. आज पुण्यातील सर्वात जास्त रहदारी असलेल्या एम जी रोडजवळ (M G Road) एक अपघाताची घटना घडली आहे. एका चारचाकी वाहनाची सात ते आठ गाड्यांना जोरदार धडक बसली. यामुळे या गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात एकजण किरकोळ जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एक चार चाकी पुण्यातील एम जी रोड जवळील एका रस्त्यावरून जात होती. गाडी चालवत असताना त्या चालकाला अचानक फिट आली आणि त्याचे गाडीवरचे नियंत्रण सुटले. त्यामुळे समोर असलेल्या ७ ते ८ दुचाकी गाड्यांना ही धडक बसली. या अपघातात एक जण किरकोळ जखमी झाला.

या अपघातामुळे रस्त्यावर चांगलीच वाहतूक कोंडी झाली होती. काही वेळ वाहतूक थांबवावी लागली होती. या अपघाताप्रकरणी पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतलं आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. पोलीस सगळ्या गाड्यांची पाहणी करत आहेत. मात्र यात गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने अनेक चालक संतापलेले आहेत. शिवाय नागरिकांनी देखील पाहण्यासाठी गर्दी केली आहे.