नवी दिल्ली : प्रतापगडावरील अफजल खानाच्या कबरी जवळील अनधिकृत बांधकामावरील कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.
अफझल खान स्मारक समितीच्यावतीने अॅड. निजाम पाशा यांनी सुप्रीम कोर्टात गुरूवारी याचिका दाखल केली आहे. काल घटनापीठासमोर प्रकरण आले असले तरी घटनापीठाने शुक्रवारी सुनावनी करू असे सांगितले होते. यावर आज काय सुनावनी होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
या याचिकेत कबरीसमोरील अनधिकृत बांधकाम पाडताना स्मारकाला कोणताही धक्का लागणार याची काळजी घ्यावी, असे आदेश देण्यात यावे, अशी मागणी पाशा यांनी केली आहे.
महसूल विभाग आणि वनविभागाने काल पहाटे ४ वाजेपासूनच हे बांधकाम पाडण्यास सुरुवात केली. सुमारे १५०० पोलिसांच्या कडक बंदोबस्तात हे बांधकाम हटवण्यात येत आहे.
विशेष म्हणजे १० नोव्हेंबर १६५९ रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता. या दिनाचे औचित्य साधत राज्य सरकारने या शिवप्रताप दिनापासून ही कारवाई सुरु केली आहे.