Saturday, April 27, 2024

दानात दान

अनुराधा दीक्षित

शाळकरी वयात असताना ‘दोस्ती’ नावाचा सिनेमा पाहिला होता. १९६५ ते ७० च्या दरम्यान. शालेय मुलांसाठी तो सवलतीच्या दरात होता. त्याची कथा होती एका अंध आणि पायांनी अपंग असणाऱ्या दोन मित्रांची. त्यांच्या दिव्यांग असण्यामुळे आणि दोघेही अनाथ असल्याने त्यांची समाजाकडून उपेक्षा, अवहेलना होत असे. अंध मुलगा गाणं म्हणत असे, तर त्याचा मित्र माऊथ ऑर्गन वाजवून लोकांचं मनोरंजन करून एक प्रकारे भीक मागून पैसे कमवत. त्यात जे काही मिळेल ते खाऊन सार्वजनिक ठिकाणी… बस स्थानक, रेल्वे स्थानके इ. ठिकाणी राहून कसंबसं आयुष्य जगत होते. पण त्यांना शिकायची इच्छा होती. खूप निंदा सहन करीत त्यांना एका शाळेत प्रवेश मिळाला. लहान मुलांच्या वर्गात हे दोन मोठ्ठे विद्यार्थी! पण त्यांनी जिद्द सोडली नाही. योगायोगाने त्यांची एका अतिशय गोड अशा श्रीमंत लहान मुलीशी ओळख होते. ती त्यांच्याशी दोस्ती करते. त्या मित्रांना ती तिच्या बालबुद्धीने जमेल तशी मदत करते. त्यांच्यात अतिशय निर्मळ, सुंदर असे मैत्रीचे भावबंध निर्माण होतात. पण त्या छोट्या मुलीला दुर्धर आजार होऊन त्यात तिचा अंत होतो. पण शेवटच्या क्षणीही तिला त्यांनाच भेटायची ओढ असते. घरच्या आई, वडील, भाऊ यांच्या विरोधाला न जुमानता ती आपली मैत्री कायम ठेवते. अशी हृद्य कथा होती ती.

आजही अशा दिव्यांग किंवा विशेष मुलांची काही असंवेदनशील लोकांकडून हेटाळणी होताना आपण पाहतो. एखादा अवयव जरी निकामी झाला असला, तरी त्याची शक्ती दुसऱ्या कोणत्या तरी अवयवाद्वारे वाढत जाते. उदा. एखाद्याला अंधत्व आलं असेल, तर त्याचे कान तीक्ष्ण होतात. त्यामुळे नुसत्या थोड्याशा हालचालीवरूनही अशी माणसं आपल्या आसपास कुणीतरी आहे, हे जाणू शकतात. वरील सिनेमाच्या कथेत ते दोन मित्र एकमेकांची शक्ती झाले होते. तरीही आपला जो अवयव निकामी आहे, तो जर इतर सर्वसामान्य माणसांसारखा अस्तित्वात असता, काम करीत असता, तर त्यापासून मिळणारा आनंद आणखी वेगळा असता.

माझ्या मनात विचार आला की, त्या सिनेमाच्या काळात जर अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याचे प्रगत तंत्र तेव्हा असते, तर त्या छोट्या मुलीचे डोळे त्या अंध मित्राला मिळाले असते. त्याद्वारे तो हे सुंदर जग आपल्या डोळ्यांनी स्वतः पाहू शकला असता. त्याच्या डोळ्यांच्या रूपात ती जिवंत राहिली असती.

काही दिवसांपूर्वी वृत्तपत्रात बातमी वाचली. एका महिलेने मृत्यूपूर्वी आपले अवयव दान करण्याची इच्छा व्यक्त केली होती. काही दिवसांतच ती हे जग सोडून गेली. पण कोणाला डोळे, कोणाला हृदय, कोणाला किडनी असे अवयवदान करून तिने सहाजणांना जीवदान दिलं. त्या सहाजणांच्या रूपात ती आजही जिवंत आहे! माणसाकडे देण्यासाठी कोणत्याही भौतिक वस्तू नसल्या, तरी त्याच्याकडे त्याच्या हक्काचं शरीर असतं. त्याद्वारे तो रक्तदान करू शकतो, तर जिवंत अथवा मृत्यूनंतरही तो आपल्या शरीरातील एखादा अवयव दान करून ते इतरांच्या आयुष्यात आनंद, प्रकाश आणू शकतो.

आज तर एखाद्या अपघातात हात अथवा पाय गमावलेल्यांना दुसऱ्याचे हातपायही प्रत्यारोपण करून बसवता येतात. त्यांचं अपंगत्व दूर होऊ शकतं. इतकं विज्ञान पुढे गेलंय. काहीजणांना व्यसनामुळे, डायबेटिसमुळे किडन्या गमवाव्या लागतात. जोपर्यंत डायलेसिससारखी खर्चिक उपाययोजना चालू असते, तोपर्यंत अगदी फार तर एखाद्या वर्षाचा काळ आयुष्य वाढण्याची शक्यता असते. पण जर वेळीच योग्य त्या रक्तगटाची किडनी देणारा दाता मिळाला आणि ती गरजू व्यक्तीला मॅच झाली, तर तो पूर्ववत सामान्य आयुष्य जगू शकतो. पण असं भाग्य फार थोड्यांच्याच वाट्याला येतं. कारण आजकाल किडनीची तस्करी होण्याचं… किंबहुना साऱ्याच मानवी अवयवांची तस्करी होण्याचं प्रमाण वाढलंय. धनदांडगे लोक हवा तेवढा पैसा ओतून असे अवयव विकत घेऊन आपलं धोक्यात आलेलं जीवन मार्गी लावू शकतात. गरीब किंवा सामान्य माणसाकडे असे अवयव खरेदी करण्यासाठी पैसा नसतात. मग बिचारा अगतिक होऊन एक दिवस मृत्यूला सामोरं जायला तयार होतो. माझ्याच आजूबाजूला एका आईने आपल्या रुग्ण तरुण मुलाला आपली किडनी दिली. पण ती मॅच होऊनही दुर्दैवाने तो मुलगा वर्षभराने गेला. किडनी गेल्याचं दुःख नव्हतं. पण तो जगला असता तर त्यांच्या आयुष्यात किती आनंद आला असता!

दुसऱ्या एका तरुण मुलीने आपल्या नवऱ्याला मोठं धाडस करून आणि मोठा त्याग करून किडनी दान केली. तिच्या सुदैवाने आज त्यांचा संसार उत्तम चाललाय. माझ्या एका भाचीनेही मोठ्या प्रमाणात मधुमेह असणाऱ्या आपल्या नवऱ्याचे आपली किडनी देऊन प्राण वाचवले. त्यांचाही संसार त्यामुळे वाचला आहे. या साऱ्या आधुनिक काळातल्या सती सावित्रीच आहेत. त्यांच्या या हिंमतीला दाद द्यावीशी वाटते.

अशी हिंमत दाखवणारे समाजात आजही खूपच कमी लोक आहेत. त्यासंबंधात मोठ्या प्रमाणात अजूनही जागृती होण्याची गरज आहे. समाजकार्य म्हणजे आणखी काय असतं? दुसऱ्याच्या कामी येणं! मग ते पैसाअडका, वस्तू, जमीन-जुमला या मार्गाने उपयोगी पडता येऊ शकतं. सगळ्यांकडे या गोष्टी असतात असं नाही. पण सर्वांकडे स्वत:चं शरीर तर असतंच. त्याचा जर आपल्या पश्चात कुणाला उपयोग झाला, तर समर्थ रामदासांनी म्हटल्याप्रमाणे ‘मरावे परी कीर्ती रूपे उरावे’ हे बोल अक्षरशः खरे होतील!

आजकाल विविध माध्यमांतून, सरकारी जाहिरातींद्वारे देहदान, अवयवदान यांचा प्रचार केला जातो. त्याला सर्वांनीच आपलं एक राष्ट्रीय कर्तव्य समजून जर प्रतिसाद दिला, तर कितीतरी ‘दुरितांचे तिमिर’ नाहीसे होईल. खरंतर सर्वचजण सुखी, निरोगी, धडधाकट असावेत अशी इच्छा असते. तरीही एखाद्याच्या वाट्याला असं दुर्दैव आलं, तर अकाली आयुष्यातून उठून जाणाऱ्यांच्या संख्येत घट होईल आणि आपलं पुढील आयुष्य बराच काळ सुखासमाधानाने जगू शकतील, असं नाही का वाटत तुम्हाला? मला तर वाटतंय. मग वाट कसली पाहताय? आताच नेत्रदान, अवयवदानाचा अर्ज भरून टाकूया आणि समाजासमोर एक आदर्श निर्माण करूया!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -