Wednesday, May 8, 2024
Homeमहत्वाची बातमीनाराज आशिष देशमुख यांचा काँग्रेस सरचिटणीस पदाचा राजीनामा

नाराज आशिष देशमुख यांचा काँग्रेस सरचिटणीस पदाचा राजीनामा

मुंबई (प्रतिनिधी) : काँग्रेस पक्षाने ‘युपी’चा नेता इम्रान प्रतापगढी यांना राज्यसभेचे तिकीट दिल्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची खदखद समोर आली आहे. विदर्भातील काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे देशमुखांनी राजीनामा पाठवला आहे. राज्यसभेवर पाठवायला महाराष्ट्रात दुसरा कुणी नेता नव्हता का? असा सवाल त्यांनी केला आहे.

राज्यात अनेक नेते असताना काँग्रेस पक्षाने उत्तर प्रदेशातील ३४ वर्षीय इम्रान प्रतापगढी यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. त्यानंतर राज्यातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी तसेच तरुण नेत्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. याच नाराजीतून आशिष देशमुख यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. ‘अनेक कर्तृत्ववान नेते असूनही पक्षाने येथील नेत्यांचा विचार केला नाही. मला राज्यसभेचं आश्वासन देऊनही पक्षाने ते पूर्ण केलं नाही’, अशी खंत आशिष देशमुख यांनी बोलून दाखवली. प्रतापगढी हे काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात. लोकसभेतील पराभवानंतर राज्यसभेवर प्रतापगढींचे पुनर्वसन होताना दिसत आहे.

मोहम्मद इम्रान प्रतापगढी हे उर्दू भाषिक कवी आहेत. ते उत्तर प्रदेशमधील काँग्रेसचे नेते आहेत. भारत आणि जगाच्या इतर भागांतील मुस्लिम अनुभव आणि अस्मिता यांचे वर्णन करणाऱ्या निषेधात्मक काव्यासाठी इम्रान प्रतापगढी ओळखले जातात. ते विशेषतः ‘मदरसा’ आणि ‘हाँ मै कश्मीर हूं’ या उर्दू नझ्मसाठी लोकप्रिय आहेत. इम्रान प्रतापगढी हे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मुरादाबाद मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार होते. मात्र त्यांचा दणकून पराभव झाला होता. समाजवादी पक्षाचे उमेदवार ६ लाख ४९ हजार ५३८ मतांनी विजयी झाले, मात्र प्रतापगढी तिसऱ्या क्रमाकांवर फेकले गेले. त्यांना केवळ ५९ हजार १९८ मतांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर ३ जून २०२१ रोजी अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -