Saturday, April 27, 2024

बालपण

प्रा. प्रतिभा सराफ

‘मुले म्हणजे फुले’, असे म्हटले जाते. निष्पाप, निरागस मुलांची बालबुद्धीही तल्लख असते. विचार करण्याची क्षमता, ताकद त्यांच्यात असते. कधी कधी तरी या लहान मुलांकडून नकळतपणे शाब्दिक, प्रासंगिक विनोद घडतात. विनोद हा आपल्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. विनोद क्षणिक आनंद जरी देत असला तरी जीवनातील मोठी मोठी दुःखे कमी करण्यासाठी त्याचा नक्कीच उपयोग होतो. ताणतणाव अधूनमधून कमी होणे मानसिक स्वस्थ्यासाठी फार आवश्यक आहे!

यासाठी मी माझ्या मुलीची निकिताची गोष्ट सांगते. ती साधारण दोन वर्षांची होती. आम्ही तिला विविध प्राण्यांचे, पक्ष्यांचे आवाज शिकवले. तिला खूप मजा वाटली. एकदा आमच्या घरी मित्रमंडळी जमली. आपल्या मुलीचं कौतुक दाखवावे म्हणून मी
तिला म्हटले,
‘निकिता कावळा कसा बोलतो?’ ती तत्परतेने उत्तरली,
‘कावऽऽ काऊऽऽ’, ‘चिमणी कशी बोलते?’ ‘चीव ऽऽ चीव ऽऽ’, ‘पोपट कसा बोलतो?’, ‘पोवऽऽ पोवऽऽ’ सगळे खो-खो हसू लागले. लहान मुले कधी कधी अशी बालबुद्धी वापरतात. या उत्तराला चूक तरी कसे म्हणायचे?
निकिता तीन वर्षांची झाली तेव्हाची गोष्ट, माझ्या पतीला मी नावाने हाक मारायची आणि साहजिकच त्याचे आई-वडीलही! त्यामुळे निकितासुद्धा त्याला ‘प्रवीण’ अशीच हाक मारायची. आम्ही अनेकदा तिला समजावलं की, तू ‘प्रवीण’ म्हणायचे नाही, ‘बाबा’ म्हणायचे. कशीतरी तिला बाबा म्हणायची सवय झाली. शाळा प्रवेशाच्या मुलाखतीसाठी तिला घेऊन गेलो. तिला पहिला प्रश्न विचारण्यात आला,
‘तुझे पूर्ण नाव काय?’
‘निकिता बाबा सराफ’
तिने शांतपणे उत्तर दिले. मुलाखत घेणाऱ्या बाईने आमच्याकडे विचित्र नजरेने पाहिले. त्या बाईने दुसरा प्रश्न विचारला, ‘तुझ्या बाबांचे नाव काय?’
‘बाबा…’ आणि ती पुढे लगेच म्हणाली, ‘प्रवीण म्हणायचं नाही, बाबा म्हणायचं.’
आम्हीच शिकलेली गोष्ट अशा तऱ्हेने तिने समजून घेतली. त्यामुळे तिथे आम्ही तोंडघशी पडलो. तिचे काहीच चुकले नव्हते.
आम्ही नवीन सोसायटीत राहायला आलो. तेव्हा निकिता साधारण चार वर्षांची असेल. पहिल्याच दिवशी ती खेळायला गेली. पंधरा-वीस मिनिटांनी एक मुलगा, वय साधारण आठ-नऊ असेल. तो आमच्या घरी आला. सोबत निकिता होतीच. खूप उत्साहाने… आनंदाने तो मला म्हणाला,
‘आँटी आपकी ये लडकी बहोत हुशार है!’
मी मनात म्हटलं काय अकलेचे तारे तोडले पोरीने माहीत नाही. इतक्यात तोच
पुढे बोलला,
‘मै इतना बडा हो गया लेकिन मुझे मराठी नही आती. आपकी बेटी कितनी ग्रेट है… बढीयाँ मराठी बोलती है… कितनी ग्रेट है!’
मी हसू लागले. त्या मुलाची चूक नव्हती. आमच्या सोसायटीत फक्त दोनच मराठी कुटुंबीय होते. निकिताला मराठीशिवाय दुसरी भाषा येत नव्हती. झाला प्रकार माझ्या लक्षात आल्यावर मी त्या मुलाला सांगितले की, आमची मातृभाषा मराठी आहे म्हणून… पण ते त्याला कळले की नाही माहीत नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -