Friday, April 26, 2024
Homeताज्या घडामोडीआरोग्य सेवा बळकट करण्याच्या दिशेने केंद्राचा प्रयत्न

आरोग्य सेवा बळकट करण्याच्या दिशेने केंद्राचा प्रयत्न

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांचे प्रतिपादन

नाशिक :‘कोरोना महामारीच्या संकटाने देशातील आरोग्य सेवा बळकट करण्याची गरज अत्यंत ठळकपणे आपल्यासमोर मांडली आहे आणि याच दिशेने केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु आहेत’, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले. नाशिकमधील गांधीनगर येथील सीजीएचएस म्हणजेच केंद्र सरकारी आरोग्य योजनेच्या स्वास्थ्य केंद्राचे उद्घाटन केल्यानंतर त्या उपस्थितांना संबोधित करत होत्या.

‘देशभर २२ नवे एम्स अर्थात अखिल भारतीय वैद्यकीय संस्था उभारण्याचे काम सध्या सुरु आहे. त्याशिवाय संपूर्ण देशात सुमारे दीड लाख स्वास्थ्य केंद्रांची उभारणी करण्यासाठी संपूर्ण क्षमतेने प्रयत्न केले जात आहेत’, असे त्यांनी सांगितले. यावेळी, खासदार हेमंत गोडसे, नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे तसेच सरोज अहिरे, नगरसेवक दिनकर पाटील, राहुल दिवे यांच्यासह नवी दिल्ली येथील सीजीएचएसचे संचालक निखिलेश चंद्र आणि मुंबई येथील सीजीएचएसच्या अवर संचालक डॉ. डी.एम.देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

केंद्र सरकारने गेल्या वर्षी देशभरात १६ नवी सीजीएचएस स्वास्थ्य केंद्रे उभारण्यास मंजुरी दिली होती. त्यापैकी पहिले केंद्र सोमवारी नाशिक येथे सुरु झाले आहे अशी माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली. ‘मुंबई, पुणे आणि नागपूर यानंतर नाशिक येथे सुरु झालेले हे महाराष्ट्रातील चौथे सीजीएचएस केंद्र आहे’, असेही त्या म्हणाल्या. यावेळी डॉ. पवार म्हणाल्या की, ‘पंतप्रधान मोदी हे देशाच्या कुठल्या भागात कोणत्या प्रकारच्या सोयींची आवश्यकता आहे याकडे स्वतःच लक्ष देतात आणि त्या भागांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम स्वतःहून हाती घेतात.

आजपासून देशभरात वय वर्षे १५ ते १८ या वयोगटातील मुलांचे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण सुरु झाले आहे याबद्दल डॉ. भारती पवार यांनी आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या की आतापर्यंत, या लसीकरण कार्यक्रमात १४५ कोटींहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत आणि हा जागतिक पातळीवरील एक विक्रम आहे. कोरोना विरोधातील लढाईत केंद्र सरकारच्या बाजूने प्रयत्नांमध्ये कोणतीही कसूर बाकी राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. कोरोनाचे संकट अजून संपलेले नाही, त्यामुळे सर्वांनी लसीकरणासोबतच, योग्य प्रकारे मास्क घालणे आणि स्वच्छता राखणे याकडे नीट लक्ष द्यावे अशी विनंती त्यांनी जनतेला केली.

या कार्यक्रमात बोलताना संसद सदस्य हेमंत गोडसे म्हणाले की दीर्घ काळ संघर्ष करून, अनेक प्रयत्नांती नाशिकसाठी हे सीजीएचएस स्वास्थ्य केंद्र सुरु झाले आहे. सुमारे २६ हजार कार्ड धारक आणि त्यांच्या एक लाखांहून अधिक कुटुंबियांना या केंद्रांमुळे फायदा होणार आहे. सीजीएचएसचे संचालक निखिलेश चंद्र आणि आमदार देवयानी फरांदे यांनी देखील या कार्यक्रमात त्यांचे मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमात मुंबई येथील सीजीएचएसच्या अवर संचालक डॉ.डी.एम.देसाई यांनी स्वागतपर भाषण केले. अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि केंद्र सरकारच्या निवृत्तीवेतन योजनेचे सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -