Friday, April 26, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखखराखुरा ‘शिवप्रताप दिन’ साजरा...

खराखुरा ‘शिवप्रताप दिन’ साजरा…

हिंदवी स्वराज्याचे आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुघल साम्राज्य, गोवळकोंड्याची कुतुबशाही, विजापूरची आदिलशाही आणि युरोपियन वसाहतवादी शक्तींशी सदोदीत लढा दिला, अहोरात्र संघर्ष केला. त्यांचे जीवन म्हणजे पराक्रमाची शर्थच जणू. औरंगजेब बादशहाने शिवाजी महाराजांना आवर घालण्यासाठी अफजल खानाला धाडले. त्या कावेबाज अफजल खानाचा कोथळा बाहेर काढून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी गाढला. औरंगजेबाला मारले तो दिवस ‘शिवप्रताप दिन’ म्हणून ओळखळा जातो. ‘मेल्यावर वैर संपते’ या हिंदूंच्या सहिष्णू तत्त्वाप्रमाणे महाराजांनी अफजल खानाची कबर बनवण्यास त्यावेळी परवानगी दिली. मात्र या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊन काही नतद्रष्ट लोकांकडून इतिहासात बदनाम असलेल्या क्रूरकर्म्या अफजल खानाचे उद्दात्तीकरण सुरू होते. गेल्या काही वर्षांपासून एखाद्या महात्म्याची कबर असावी, अशा थाटात काही लोक तिथे फुलं चढवत होते. तसेच उरूस भरविण्यास सुरुवात झाली होती. हे प्रकार रोखण्याची मागणी अनेकांनी अनेक दिवसांपासून केली होती, तर अफझल खानाची प्रतापगडावरील ही कबरच पाडण्यात यावी, अशी मागणी काही संघटनांनी केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार प्रतापगडावरील कबरीच्या ठिकाणी केलेले अनधिकृत बांधकाम पाडण्यात यावे, असे आदेश देण्यात आले. परिसरामध्ये असणारे वाढवलेले बांधकाम, वाढवलेली जागा आणि वाढवलेलं काम हे अनधिकृत आहे, असे सर्वोच्च न्यायालयानेच मान्य केलेले आहे. न्यायालयाने अतिरिक्त बांधकाम हटवण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. त्यानुसार सातारा प्रशासनाने हे बांधकाम हटवण्याच्या कारवाईला सुरुवात केली. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याला औरंगजेबाची कबर स्थापित केलेली आहे. मात्र कालांतराने या कबरीच्या आसपास अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. कबरीशेजारी अनधिकृत बांधकाम केल्यानंतर औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्यात येत होते. कबरीजवळील हे अनधिकृत बांधकाम वन विभागाच्या हद्दीत येत होते. या कबरीजवळ तब्बल १९ खोल्यांचे बांधकाम करण्यात आले होते. त्यावर अनेकांनी आक्षेप घेतला होता. काही हिंदुत्ववादी संघटनांनी हे अनधिकृत बांधकाम हटविण्याची मागणी केली होती. अफजल खानाच्या कबरीसमोरील अनधिकृत बांधकामावरून अनेकदा वाद झाले आहेत. हिंदुत्ववादी संघटना आणि शिवप्रेमींकडून या वादाला तोंड फोडण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. अफजल खानाच्या कबरीसमोरील अनधिकृत बांधकाम पाडावे अशी शिवप्रेमींची मागणी होती. त्याचबरोबर इतिहास चुकीच्या पद्धतीने सांगण्यात येत होता, त्यावरून देखील अनेकदा वाद झाले होते. या सर्व पार्श्वभूमीवर हा परिसर २००६ पासून पूर्णपणे सील करण्यात आला होता.

तथापि छत्रपती शिवरायांचा इतिहास हा इतिहासप्रेमी, शिवप्रेमींसमोर यावा यासाठी हा परिसर खुला करावा, अशी मागणी अनेकांकडून करण्यात आली होती. अखेर हा वाद न्यायालयात गेला. न्यायालयाकडून अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र सरकारकडून या संदर्भात कोणतीही अंमलबजावणी करण्यात येत नव्हती. अखेर राज्यात फडणवीस – शिंदे सरकार सत्तेवर येताच खानाच्या कबरीभोवतीच्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा टाकण्याचा धाडसी निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, शिवप्रतापदिनाच्या दिवशीच या अनधिकृत बांधकामांवर हातोडा पडला. शिवप्रतापदिनाचे औचित्य साधत कबरीसमोरील अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात केली आहे. १० नोव्हेंबर म्हणजे आजच्या दिवशीच प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाचा वध करण्यात आला होता आणि याच दिवशी अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात केली आहे. शिवप्रेमींकडून या कारवाईबद्दल आनंद व्यक्त करण्यात येत आहे. शिवभक्तांसाठी ही अभिनानाची गोष्ट आहे. अफजल खानाच्या कबरीसमोरील परिसर सील असल्याने कबरीबाबतचा खोटा इतिहास लोकांसमोर येत होता. या कारवाईनंतर हा खरा इतिहास शिवप्रेमींसमोर येईल, अशी भावना शिवप्रेमी व्यक्त करत आहेत. शिवप्रताप दिन हा दिवस मोठ्या उत्साहात म्हणून साजरा केला जातो. शिवप्रताप दिनादिवशी शिवभक्त मोठ्या प्रमाणात प्रतापगडावरती माथा टेकण्यासाठी येत असतात. मात्र आज कारवाईमुळे संपूर्ण परिसर बंद करण्यात आला. या कारवाईसाठी सातारा, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली ग्रामीण या चार जिल्ह्यांतील १८०० हून अधिक पोलीस वाईत दाखल झाले होते. पोलीस, महसूल विभाग आणि वनविभागाकडून बांधकाम पाडण्यास सुरुवात करण्यात आली.

पहाटे साडेपाच वाजल्यापासून अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात करण्यात आली. सध्या हे काम सुरू असून मोठा पोलीस बंदोबस्त या परिसरात तैनात करण्यात आला होता. कबर उद्ध्वस्त करण्याची मागणी काही लोक करत आहेत. पण कबर उद्ध्वस्त केल्यास छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्षही उद्ध्वस्त होऊ शकते. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचा मोठा प्रभाव आहे. शिवाजी महाराज हे मराठी अस्मितेचा एक अविभाज्य भाग आहेत. त्यामुळे त्यांचा पराक्रम आणि पराक्रमाची साक्ष देणाऱ्या स्थळांबरोबरच गडकिल्ल्यांचे संरक्षण व डागडुजी करून ते टिकवून ठेवणे हे सरकारबरोबरच आपले सर्वांचे आद्य कर्तव्य आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -