Friday, April 26, 2024
Homeमहामुंबईमुंबई महापालिकेच्या ११ पब्लिक स्कूलना सीबीएसईची मान्यता

मुंबई महापालिकेच्या ११ पब्लिक स्कूलना सीबीएसईची मान्यता

मुंबई : मुंबई महापालिकेच्या ११ पब्लिक स्कूलना केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) मान्यता दिली आहे. या संदर्भात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे.

मान्यता मिळालेल्या शाळा

मुंबई पब्लिक स्कूल चिकूवाडी, मुंबई पब्लिक स्कूल जनकल्याण, मुंबई पब्लिक स्कूल प्रतीक्षा नगर, मुंबई पब्लिक स्कूल पूनम नगर, मुंबई पब्लिक स्कूल मिठागर, मुंबई पब्लिक स्कूल हरियाली व्हिलेज, मुंबई पब्लिक स्कूल राजावाडी, मुंबई पब्लिक स्कूल अजीजबाग, मुंबई पब्लिक स्कूल तुंगा व्हिलेज, मुंबई पब्लिक स्कूल भवानी शंकर, मुंबई पब्लिक स्कूल काणे नगर.

भविष्यात आयसीएसई, केंब्रिज मंडळाचा अभ्यासक्रम शिकविला जाईल

ठाकरे यांनी म्हटले आहे की, मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. या विद्यार्थ्यांना पालिका शाळेत दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी आदित्य ठाकरे आणि पालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू होते. त्याचाच एक भाग म्हणून पालिकेच्या ११ पब्लिक स्कूलना सीबीएसईची मान्यता मिळाली आहे. आता पालिका शाळांमध्ये राज्य मंडळ आणि सीबीएसई मंडळाचा अभ्यासक्रम शिकविला जात आहे. भविष्यात आयसीएसई, केंब्रिज आणि आयव्ही मंडळाचा अभ्यासक्रम शिकविला जाईल. या माध्यमातून पालिका शाळांमध्ये विविध प्रकारचे दर्जेदार मोफत शिक्षण उपलब्ध करण्याचा मानस आहे, असेही ठाकरे म्हणाले.

मराठी भाषेतून गुणात्मक शिक्षण द्यावे!

मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये कार्यरत सर्व शिक्षण मंडळांनी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी, मराठी भाषेतून गुणात्मक शिक्षण देण्याची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची ओढ निर्माण व्हावी, त्यांना उच्च दर्जाचे मोफत शिक्षण मिळावे, मराठी भाषेची शिकवण मिळावी, मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि प्रत्येकाला आपले स्वप्न साकार करण्याचे बळ मिळावे हेच आमचे उद्दिष्ट आहे, असे आवाहनही ठाकरे यांनी केले आहे.

दर्जेदार शिक्षण देण्याच्या स्वप्नाला आणखी बळकटी मिळणार

मुंबई महापालिकेच्या ११ मुंबई पब्लिक स्कूल्सना सीबीएसईची संलग्नता मिळाली, ही खरोखरच अतिशय आनंदाची बातमी आहे. यामुळे महापालिकेच्या शाळांमध्ये मोफत दर्जेदार शिक्षण देण्याच्या आपल्या स्वप्नाला आणखी बळकटी मिळणार आहे. या ध्येयासाठी काम करणाऱ्या महापालिकेच्या शिक्षण विभागातील सर्वांचे मी अभिनंदन करतो. शिक्षण क्षेत्रातील बदलाची ही सुरुवात असून या प्रगतीपथावरील वाटचाल आपल्याला अशीच सुरू ठेवायची आहे. या शाळा जागतिक दर्जाच्या असतील याची खात्री आहे. सहकार्यासाठी सीबीएसई बोर्डाचे अध्यक्ष मनोज आहुजा यांचेही आभार मानतो, असे ते म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -