Saturday, April 27, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सCareer : संकल्पनेचं महत्त्व!

Career : संकल्पनेचं महत्त्व!

  • करिअर : सुरेश वांदिले

बारावीतील विद्यार्थ्यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाच्या असलेल्या बोर्डाच्या परीक्षेची तारीख नुकतीच जाहीर झाली. १२ वीनंतर वेगवेगळ्या शाखेतील प्रवेशासाठीच्या कॉमन एंट्रस टेस्ट (सीईटी)च्या तारखेचीही घोषणा झाली आहे. नीट (नॅशनल इलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट) आणि जेईई(जॉइंट एन्ट्रन्स एक्झा मिनेशन) परीक्षेची घोषणा झाली आहे. याचा अर्थ, घोडा मैदान अगदी जवळ आलं आहे.

विद्यार्थ्यांचा अभ्यास जोरात सुरू असलेच. या क्लासमधून त्या क्लासमध्ये सारखी धावाधाव सुरू असणार. ही टेस्ट, ती टेस्ट अशा वेगवेगळया चाचणी परीक्षा त्यांना द्याव्या लागत असणार. हे चक्र स्वत:हून स्वीकारलं असल्यानं त्यातून शेवटच्या क्षणी बाहेर पडणं शक्य नाही आणि रडत बसणंही योग्य नाही. त्यामुळे पुढील काळात अधिकाधिक लक्ष अभ्यासावर केंद्रित केलं पाहिजे.

पूर्ण सत्य नाही…
शिकवणी वर्गांमध्ये तर त्याचसाठी जातो ना, असा प्रश्न अनेकांच्या मनात आला असणार. ते काही अंशी खरं असलं तरी पूर्ण सत्य नाही. शिकवणी वर्गामध्ये, अभ्यासासाठी कमी आणि अधिकाधिक गुण कसे मिळवता येतील याचे ट्रिक्स आत्मसात करण्यासाठी जातो, हे वास्तव स्वीकारायला हवे. सीईटीमध्ये अधिकाधिक गुण मिळवून मनाजोगती शाखा आणि महाविद्यालय मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. पण फार कमी विद्यार्थ्यांना यात यश मिळतं. अधिकाधिक गुण मिळवण्यासाठी लाखो रुपये खर्च करून लावलेले शिकवणी वर्गच अधिकाधिक गुण मिळण्याच्या वाटेत काटेरी कुंपण तयार करतात. हे कसं? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला असेल.

मूळ अभ्यासाकडे दुर्लक्ष
अधिकाधिक गुण मिळवण्याच्या ट्रिक्स सांगण्याच्या भरात बहुतेक सगळ्या शिकवणी वर्गांमध्ये मूळ अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं. याचा अर्थ असा की, पाठ्यपुस्तकातले संपूर्ण धडे नीट समजावून सांगितले जात नाहीत. धड्यात येणारे कठीण शब्द, संकल्पना समजावून सांगितल्या जात नाहीत. पाठांतरावर भर द्या, असं सारखं सांगितलं जातं. पाठांतराने व्याख्या मेंदूत पक्की कोरली जाईल. मात्र त्या व्याख्येच्या दोन ओळींमध्ये नेमका काय अर्थ दडलाय हे कळत नाही. हे न कळणं म्हणजे संकल्पना स्पष्ट नं होणं.

संकल्पना स्पष्ट नसेल, तर गुण मिळवण्यासाठी झगडावं लागतं. वस्तुनिष्ठ म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह पद्धतीचे प्रश्न सीईटीमध्ये विचारले जातात. हे प्रश्न काही सरधोपट असत नाहीत. मुलांच्या बुद्धीचा कस लागेल असेच ते प्रश्न असतात. या प्रश्नांच्या उत्तराचे चार पर्याय समोर असले तरी संकल्पना स्पष्ट नसल्यास या उत्तरांमधून अचूक उत्तर शोधणं कठीण जाऊ शकतं. आता चार पर्यायांपैकी ३ चूक आणि एक बरोबर असे पर्याय राहतीलच असे नाही. चारही पर्याय बरोबर राहू शकतात. त्यातून सर्वाधिक अचूक पर्याय निवडायचा असतो. संकल्पना स्पष्ट नसेल, तर मग या सर्वाधिक अचूक उत्तराच्या जवळ जाणं कठीण जातं. शिकवणी वर्गातील शेकडो चाचण्या, त्यातील गुण, अधिकाधिक गुण मिळवण्यासाठी सांगितलेल्या ट्रिक्स सारे काही कुचकामी ठरतात.

संकल्पना स्पष्ट हव्यात
सीईटीमध्ये अधिकाधिक गुण मिळवायचे असेल तर, शिकवणी वर्गातील ट्रिक्सपेक्षा अभ्यास घटकातील संकल्पना स्पष्टपणे समजणं महत्त्वाचं ठरतं. संकल्पना स्वयंस्पष्ट समजणं याचा अर्थ, कोणतीही शंका मनात नसणं, या संकल्पनेवर आधारित कसाही आडवा तिडवा प्रश्न विचारला गेला तर तो सोडवता येणं, उत्तर शोधताना किंवा काढताना कोणताही गोंधळ न उडणं, असा होतो.

संकल्पना समजून घेण्यासाठी अभ्यासातील सर्व घटक वाचायला हवेत. हा महत्त्वाचा, तो कमी महत्त्वाचा किंवा तो बिन महत्त्वाचा असे करू नये. सीईटी पेपर काढणाऱ्यांसाठी सगळे विषय घटक हे महत्त्वाचे असतात. गेल्या वर्षी एखाद्या घटकावर प्रश्न विचारले म्हणून यंदा त्याच घटकावर प्रश्न विचारले जाणार नाहीत असं समजू नये. सीईटी पेपर काढणारे तज्ज्ञ मंडळी गेल्या वर्षी किंवा त्याच्या गेल्या वर्षी, असं काही बघत नाहीत. विद्यार्थ्यांची सर्वांगीण आकलन क्षमता तपासण्यासाठी ते प्रश्नपत्रिका तयार करतात. त्यामुळे ते कोणत्याही घटकावर प्रश्न विचारू शकतात. ही बाब कायम लक्षात ठेवायला हवी. या चाळणी परीक्षेच्या गुणांवर आधारित प्रवेश मिळत असल्याने एक एक गुण सुद्धा अतिशय महत्त्वाचा ठरतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -