Saturday, April 27, 2024
Homeसाप्ताहिककोलाजसाक्षर व्हा... काळ बदलतोय!

साक्षर व्हा… काळ बदलतोय!

अनुराधा दीक्षित

शाळेत संस्कृत शिकताना काही गंमतीशीर श्लोक पाठ केले होते. काही कोड्यासारखे, काही विनोदनिर्मिती करणारे, काही एकाच ओळीतून दोन अर्थ निर्माण करणारे श्लेष अलंकार असलेले. त्यातला एक अजून आठवतो…

साक्षरा विपरितश्चेत् राक्षसा एव केवलम्|
सरसो विपरितश्चेत् सरसत्वं न मुञ्चति||

याचा अर्थ ‘साक्षरा’ शब्द उलट केला, तर तो ‘राक्षसा’असा होतो. पण ‘सरस’ शब्द उलट केला, तरी आपला सरसपणा सोडत नाही!

बघा दोन्ही शब्द उलटसुलट करून खरं आहे ना! पण शब्द नुसते वरवर गंमत म्हणून बघण्यापेक्षा त्यातला दडलेला आशय शोधणं जास्त महत्त्वाचं आहे. नुसती अक्षरओळख असून उपयोग नाही. तर त्या अक्षरांपासून तयार होणारे शब्द, त्यांचा सरलार्थ आणि लक्ष्यार्थ दोन्ही ओळखता आले पाहिजेत. त्यातला सरसपणा कशात आहे, हे ओळखता आलं पाहिजे. नाहीतर ‘काला अक्षर भैंस बराबर!’ अशी गत व्हायची!

आताच्या काळात केवळ अक्षरं लिहिता-वाचण्यापुरतीच साक्षरता असून चालणार नाही. तर आता तंत्रज्ञान खूप पुढं गेलं आहे. आज घरोघरी नवनवीन गॅजेट्स वापरात येत आहेत. प्रत्येकाच्या हातात खेळण्यासारखा दिसणारा मोबाइल ही अत्यावश्यक वस्तू झाली आहे. पण ती हाताळायची कशी, हे आमच्या पिढीतल्या कित्येकांना अवगत नसतं. तिथे एवढी एवढीशी बाळंही ती लीलया हाताळताना दिसतात. आम्ही रडतकडत त्याचा उपयोग फोन करण्यासाठी वगैरे शिकतो. पण इतर अॅप्स कशी वापरायची हे आम्हाला कळत नाही, ते पहिली-दुसरीतली पोरंही सांगतात. याचं कारण म्हणजे त्यांना जन्मापासूनच टी.व्ही., फ्रीज, टेलिफोन, मोबाइल, संगणक आणि घरातली इतर आधुनिक यंत्रसामग्री हाताळायला आणि वापरायला मिळते. आमच्या पिढीतल्या लोकांना आम्ही संसारात पडल्यावर एकापुढे एक एखाद्या चमत्काराप्रमाणे भासणाऱ्या नवीन वस्तू घरी आणल्यावर प्रथम हात लावायलाही भीती वाटायची. उगीच काही बिघडलं तर? अशी भावना असायची. मुख्य म्हणजे एवढे पैसे घालून विकत घेतलेली वस्तू बिघडली, तर फुकट जाईल म्हणून मुळातच जपून वापरायची!

आता पेनपासून पियानोपर्यंत कोणीही बिघडलेली वस्तू दुरुस्त करून घ्यायच्या फंदात पडत नाही. उलट ‘यूज अॅन्ड थ्रो’ असा साधासुधा फंडा वापरतात. बिघडली की भंगारात जाण्याच्याच लायकीची!

कारण अलीकडच्या या वस्तू बहुतांश चिनी बनावटीच्या असतात. काही तर स्वस्त आणि मस्त वाटतात. त्यामुळे बिघडली तरी फेकून देण्याचंही दु:ख नसतं. हा आमच्या आणि पुढच्या पिढीतल्या फरक आहे. आम्ही ‘जुनं ते सोनं’ म्हणत एखादी वस्तू किती वर्षांपूर्वीपासून आपण जपून वापरतो, हे अगदी अभिमानाने सांगत असतो. पण नवीन पिढीला त्याचं काही अप्रूप नसतं! हां, आता एखाद्या सेलिब्रिटींनं तशी वस्तू ‘ट्रॅडिशनल’ म्हणून वापरली, तर मात्र फॅशन म्हणून ती सर्वांची ट्रॅडीशन होऊन जाते! असो. थोडं विषयांतर झालं.

हां, तर अनेक गोष्टीत आपण साक्षर होणं ही काळाची गरज आहे. उदा. बँकेचे व्यवहार आता बरेचसे ऑनलाइन होतात. एटीएम् कार्डचा वापर, ऑनलाइन विविध प्रकारची बिलं भरणं, पैसे ट्रान्स्फर करणं, वस्तू खरेदी करणं अशा अनेक गोष्टी घरबसल्या केवळ फोनवरील अॅपच्या माध्यमातून करता येतात. आम्हालाही (जुन्या पिढीला) शिकून घेणं आवश्यक आहे, हे अगदी मान्य केलं पाहिजे. तरुण पिढी घरात नसेल, तर आपलं अडता कामा नये, म्हणून काळाबरोबर चालायला शिकलं पाहिजे. सुरुवातीला थोडं समजून घेणं कठीण जाईल, हे खरं, पण अशक्य नाही!

खरंतर या आधुनिक यंत्रसामग्री किंवा तंत्रज्ञानाने आपल्या कित्येक गोष्टी सोप्या केल्यात. आपला वेळ वाचवलाय, कामाचा वेग वाढवलाय, घरबसल्या जगाच्या कानाकोपऱ्यात संपर्क करणं सोपं झालंय, शिवाय त्या टीचभर पडद्यावर समोरची व्यक्ती आपल्याशी प्रत्यक्ष बोलताना दिसते, संवाद करते, एकमेकांची ख्याली-खुशाली कळते. इतकंच नव्हे, तर गेल्या दोन वर्षांच्या कोरोना काळात लहान मुलांना शाळेत न जाताही शिक्षक विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकवू शकत होते, त्यांच्या परीक्षा घेऊ शकत होते, कोणी सुशिक्षित तरुण नोकरीसाठी ऑनलाइन इंटरव्ह्यू देऊन नोकऱ्याही मिळवू शकत होते. त्यामुळे काही प्रमाणात तरी, त्यांचं नुकसान कमी होण्यासाठी उपयोग झाला.

या पुढेही विज्ञान आणि तंत्रज्ञान यांची प्रगती होत राहणारच आहे. त्यामुळे जीवन इतकं वेगवान होईल की, त्याच्याशी जुळवून घेताना दमछाक होईल. त्यामुळे आजच्या युगात विविध प्रकारच्या साक्षरतांचा अभ्यास करण्याशिवाय पर्याय नाही.

माणूस हा परिवर्तनशील प्राणी आहे. त्यामुळे जुन्यातलं चांगलं कायम ठेवून, नवीन काळाशी ते कसं जुळवून घेता येईल याचाही त्याने विचार केला पाहिजे. पूर्वी कुठेही जायचं, तर पायी मैलोनमैल चालावं लागे. आजही अगदी दुर्गम भागात तीच परिस्थिती आहे. पण, सर्वसामान्यपणे कोणताही माणूस वाहनाशिवाय फिरत नाही. ती काळाची गरज आहे. अर्थात कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच! वाहनं वापरणं, चालवणं यासाठीचे नियम, शिस्त याचीही साक्षरता होणं अत्यावश्यक आहे. कारण अनेक अपघात, दुर्घटना या वाहतुकीचे नियम, शिस्त न पाळल्यानेच घडताना दिसतात. सार्वजनिक ठिकाणी वावरताना तिथेही रांगा लावणे, स्वच्छता पाळणे, ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देणे इ. बाबतही प्रबोधन होणे किंवा साक्षर असणे आवश्यक आहे.

एकूणच जीवन जगताना आपला विविध क्षेत्रांशी, संस्थांशी संबंध येतो. तिथे व्यवहार करताना लागणारी कागदपत्रे, आपल्याकडे असणारी विविध प्रकारची ओळखपत्रं यांचा वापर कसा आणि कुठे करायचा किंवा करायचा नाही याचीही साक्षरता असणं आवश्यक आहे. त्यासाठी आपण काही तज्ज्ञ मार्गदर्शकांची मदत घेऊ शकतो. आता कित्येक गोष्टी गुगल किंवा यू ट्यूबवर उपलब्ध असतात. अशा माहितीसाठी त्यांचाही वापर करणं शिकलं पाहिजे. आज साक्षरतेची व्याख्या ‘ग म भ न’ एवढंच शिकण्यापुरती न राहता तुम्ही जेवढं जास्तीत जास्त शिकाल तेवढेच तुम्ही ह्या विज्ञानयुगात पाय रोवून टिकाल, अशी करावी लागणार आहे. तेव्हा नित्यनूतन तंत्रज्ञानाच्या आविष्कारांना न घाबरता त्याला सामोरं जाणं, त्याच्याशी मैत्री करणं हाच आजच्या आधुनिक जगाचा मंत्र आहे! तर मग चला आपणही तो आत्मसात करूया! बरोबर ना?

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -