Sunday, April 28, 2024
Homeमनोरंजन‘कोण म्हणतं टक्का दिला?’ नव्याने रंगभूमीवर...

‘कोण म्हणतं टक्का दिला?’ नव्याने रंगभूमीवर…

राजरंग – राज चिंचणकर

काळ बदलला तरी समाजाच्या विचारसरणीत बदल झाला आहे का, असा प्रश्न अनेकदा उपस्थित होतो. याचे पडसाद रंगभूमीवरही पडत असतात. मध्यंतरी रंगभूमीवर पुन्हा आलेल्या ‘चारचौघी’ या नाटकामुळे हा प्रश्न नव्याने पटलावर आला होता. तब्बल तीन दशके उलटून गेली असली, तरी त्याकाळी या नाटकात मांडलेले विचार आजच्या काळालाही लागू होतात; हे या नाटकाने निदर्शनास आणले होते. तसाच काहीसा विचार, म्हणजे काळाच्या ओघात समाजात मतपरिवर्तन झाले आहे का, हा प्रश्न तीस वर्षांनंतर आता नव्याने रंगभूमीवर आलेल्या ‘कोण म्हणतं टक्का दिला?’ या नाटकानेही उपस्थित केला आहे. याचे कारण म्हणजे या नाटकमंडळींच्या म्हणण्यानुसार, तीन दशकांनंतरही या नाटकाच्या संहितेत काही बदल करावा लागलेला नाही.

त्याकाळी गाजलेले ‘कोण म्हणतं टक्का दिला?’ हे नाटक आता नव्याने आणि नव्या नटसंचात रंगभूमीवर आले आहे. अनिकेत विश्वासराव, प्रिया मराठे, सुबोध पंडे, संयोगिता भावे, राहुल पेठे, पल्लवी वाघ-केळकर या कलावंतांच्या महत्त्वाच्या भूमिका या नाटकात आहेत. सामाजिक विषयावर भाष्य करणाऱ्या या नाटकाद्वारे आजच्या आघाडीच्या कलावंतांना अनुभवण्याची संधी रसिकांना मिळाली आहे.

‘नवनीत प्रॉडक्शन’ निर्मित व ‘सुबोध पंडे प्रॉडक्शन्स’ प्रकाशित या नाटकाचा अलीकडेच मोठ्या उत्साहात शुभारंभ झाला आहे. ‘कोण म्हणतं टक्का दिला?’ या नाटकाचे लेखन संजय पवार यांनी केले असून, सुबोध पंडे यांनी हे नाटक दिग्दर्शित केले आहे. शीतल तळपदे यांची प्रकाशयोजना, संदेश बेंद्रे यांचे नेपथ्य, अजित परब यांचे संगीत आणि मंगल केंकरे यांची वेशभूषा या नाटकाला लाभली आहे. या नाटकाबद्दल बोलताना निर्माते व दिग्दर्शक सुबोध पंडे म्हणतात, ‘हे नाटक माझ्या अतिशय जवळचे आहे. कारण हे नाटक आम्ही १९९० मध्ये केले होते आणि त्यावेळी प्रायोगिक रंगभूमीवर त्याचे बरेच प्रयोगही झाले होते. या नाटकाच्या माध्यमातून आम्ही एक वेगळा विषय रंगभूमीवर सादर करत आहोत आणि प्रेक्षक निश्चितच त्याचे स्वागत करतील असा आम्हाला विश्वास आहे. हे नाटक व्यावसायिक रंगमंचावर यावे, अशी माझी इच्छा होती आणि ती आता पूर्ण झाली आहे’.

या नाटकातली भूमिका स्वीकारण्यासंबंधी अभिनेता अनिकेत विश्वासराव सांगतो, ‘ही संहिता आणि माझी त्यात असलेली भूमिका मला खूप आवडली. यात माझ्या व्यक्तिरेखेचा आलेख खूप चांगला आहे. हे जरी चर्चात्मक नाटक असले तरी सुद्धा त्यात अप्स आणि डाऊन्स खूप आहेत. नाटकाची सगळी टीम उत्तम आहे. लेखक संजय पवार यांचे संवाद रंगमंचावर बोलण्याची संधी या नाटकाच्या निमित्ताने मला
मिळाली आहे’.

जळगावच्या कलावंताचे एकलनाट्य ‘नली’…!

मराठी नाटक केवळ मुंबई-पुण्यापर्यंतच राहिले आहे, अशी चर्चा कायम होत असते. मात्र त्याचबरोबर महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांतही अनेक रंगकर्मी रंगमंचावर विविध ‘प्रयोग’ करत असतात. अनेकदा त्यांची दखल नाट्यसृष्टीत घेतली जाते; मात्र बरेचवेळा हे कलावंत नाट्यसृष्टीच्या मुख्य प्रवाहात येण्यापासून दूरच राहतात. जळगावचा एक युवा कलावंत मात्र जिद्दीच्या बळावर प्रायोगिक रंगभूमीवर एक अनोखा प्रयोग करण्यात मग्न आहे आणि हा कलाकार म्हणजे हर्षल पाटील! जळगावची वेस ओलांडून हर्षल पाटील याने त्याच्या ‘नली’ या एकलनाट्याच्या माध्यमातून थेट मुंबईपर्यंत धडक दिली आहे. इतकेच नव्हे; तर आतापर्यंत महाराष्ट्र, गोवा, मध्यप्रदेश आदी राज्यांत मिळून या नाट्याचे त्याने नव्वद प्रयोग केले आहेत.

गावखेड्यातल्या एका मुलाची व मुलीची मैत्री आणि त्यांच्यातल्या अव्यक्त प्रेमाची कथा ‘नली’ या एकलनाट्यातून हर्षलने मांडली असली, तरी कुटुंब व शिक्षणव्यवस्थेत दबलेल्या, जातीव्यवस्थेत अडकलेल्या स्त्रियांचे प्रश्न त्याने या एकलनाट्यातून सादर केले आहेत. वास्तविक, ही कहाणी खान्देशातल्या एका शेतकरी मुलीची आहे; परंतु त्यासोबतच एकूणच गावखेड्यातल्या स्त्रियांचे जीणे या नाट्यातून रंगमंचावर आले आहे. श्रीकांत देशमुख यांच्या ‘पडझड वाऱ्याच्या भिंती’ या पुस्तकातल्या नलिनी देवराव या व्यक्तिरेखेला हाताशी धरत, शंभू पाटील यांनी या व्यक्तिचित्राचे नाट्यरूपांतर केले आहे. योगेश पाटील यांनी या एकलनाट्याचे दिग्दर्शन केले आहे. या नाट्यामागची वास्तव कथा आणि व्यथा रंगभूमीच्या माध्यमातून, महाराष्ट्रदेशी फिरून सांगण्याचे महत्त्वाचे कार्य हर्षल पाटील हा युवा कलाकार बजावत आहे. त्याचे हे ‘नली’ एकलनाट्य आता शंभराव्या प्रयोगाच्या टप्प्यावर येऊन पोहोचले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -