Monday, May 6, 2024
Homeसाप्ताहिककोलाजत्यांचा जीव जातोय, तुम्हाला समजतंय का?

त्यांचा जीव जातोय, तुम्हाला समजतंय का?

  • मुक्तहस्त: अश्विनी पारकर

ते झाड ग्लानी येऊन मुर्च्छित पडलेल्या माणसासारखे दिसत होते. ते सुकलेले झाड पाहून एखादं घरातील माणूसच वेदनेनं विव्हळत असावं, असं वाटलं.

‘तारे जमींपर’ या चित्रपटात एका सीनमध्ये एक सुंदर गोष्ट सांगितली आहे. आपण त्याला गोष्टच म्हणू कारण त्यातील तथ्याबाबत अनेक मतमतांतरे आहेत. तो सीन असा आहे की, चित्रपटात अामिर खान इशान अवस्थीच्या वडिलांना त्यांच्या पाल्याची काळजी घेणं म्हणजे काय आहे हे समजावून सांगत असतो. त्यावेळी तो सोलमन आयलँडवरील आदिवासी जमातीचं उदाहरण देतो. वृक्षांना शेतीची कामं अथवा इतर गोष्टींसाठी कापण्याऐवजी त्या जमातीतील माणसं झाडाच्या भोवती गोळा होऊन त्याला शाप देतात आणि झाड मरून पडतं, असं याचं त्यात म्हणणं आहे. हे असंच असावं याला काही ठोस पुरावा नाही. पण थोर शास्त्रज्ञ जगदीश चंद्र बोस यांनी वनस्पतींमध्ये जीव आणि भावना असतात हे केव्हाच सिद्ध केलंय. याला अनेक शतके उलटूनही माणूस नावाच्या जीवाला यावर विश्वास नसावा किंवा फरकही पडत नसावा. बहुधा प्राण्यांना संवेदना आहेत पण माणसांना नाहीत, असं बोलण्याची वेळ आली आहे.

काहीच दिवसांपूर्वी उल्हासनगर परिसरात झाडांना विषारी इंजेक्शने टोचण्याचा प्रकार घडला. ते झाड एखाद्या ग्लानी येऊन मुर्च्छित पडलेल्या माणसासारखे दिसत होते. ते सुकलेले झाड पाहून एखादं घरातील माणूसच वेदनेनं विव्हळत असावं असं वाटलं. हे असे प्रकार उल्हासनगरातच घडतात असं नाही, तर अनेक शहरी भागांमध्ये अनेक व्यावसायिक हेतूंनी हे प्रकार घडवले जातात. पर्यावरणतज्ज्ञ अविनाश कुबल याच्यावर अधिक प्रकाश टाकतात. ते म्हणतात, विजिबलीटी हा एक प्रमुख मुद्दा यात आहे. जाहिरातींसाठी लावण्यात येणारे बिलबोर्ड्स नीट दिसावेत म्हणून झाडाचा काही भाग छाटला जातो. या पुढे जाऊन ते झाडच छाटायचं असेल, तर ते झाड विशिष्ट पद्धतींनी मारले जाते. पण यात मुळ मुद्दा असा आहे की, विषारी इंजेक्शन मारून झाड मरतं, हा खूप मोठा गैरसमज आहे. अनेकदा व्यावसायिक कारणांमुळे झाड मारायचं असेल, तर इंजेक्शजन देऊन झाड मारलं हा गैरसमज निर्माण करून पैसे उकळले जातात.

हे झाले प्रयोग करून वृक्षांना कसे संपवले जाते याबाबत. तसेच, शहरनजीकच्या जंगलात वणवे का लागतात, हे नव्याने सांगायला नको. व्यावसायिक वापरासाठी मग ती कारणं विविध असतात. पण, मानवी स्वार्थापायी हे वणवे पेटवले जातात हे नक्की. या अशा लावण्यात येणाऱ्या वणव्यांमुळे आपण वृक्षांची पिढीच नष्ट करतोय, ही बाब कोणी लक्षात घेत नाही, असं मत पर्यावरणतज्ज्ञ डॉ. श्वेता चिटणीस यांनी व्यक्त केलं आहे. ज्या पद्धतीने आनुवांशिक जनुकं माणसामध्ये येतात त्याच पद्धतीने झाडांमध्येही ती येतात. वनस्पतींमध्ये ही जनुके मागील पिढीकडून पुढच्या पिढीकडे येणं अत्यंत महत्त्वाचं आहे, ज्यावेळी तुम्ही झाडं नष्ट करता तेव्हा ती जनुकंही नष्ट होतात. तसंच वृक्षांच्या अशा जाती आहेत ज्या त्या विशिष्ट जागीच उगवतात. तिथंच मर्यादित असतात. वणवे लागल्यामुळे अशाप्रकारे त्या जातींचा आणि प्रजातींचा नाश होतो, असं डॉ. श्वेता चिटणीस सांगतात.

एखादी आई जेव्हा आपल्या पोटात बाळ वाढवते तेव्हा त्या बाळाबाबत ती किती संवेदनशील असते, हे तुमच्यातील पालकाला समजत असेलच. तुम्ही तुमच्या बाळासाठी जे काही करता त्यातील काही टक्के जरी झाडासाठी केलं तरी त्यामुळे तुम्ही शेवटी ज्या मातीत जाणार आहात, तिची सेवा केल्याचं समाधान तुम्हाला मिळेल. समजा ते जमत नसलं तरी त्यांना मारू तरी नका. मुकं असलं, बोलू शकत नसलं. एका जागी स्थिर असलं तरी झाडं म्हणजे जीव आहे. ते तुम्हाला जगवतं. त्याची फळं तुम्ही तोडता. त्याच्या प्रत्येक भागाचा वापर करता. मग कृतघ्न का होता?

जर तुमच्या परिसरात झाडांवर बिलबोर्ड्स लावले असतील किंवा झाडांचे विद्रुपीकरण केले असेल, तर ‘महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम १९९५’ अन्वये तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करू शकता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -